विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लखेरा - किंवा लहेरी. लाखेचा धंदा करणार्या धंदा करणार्या लोकांची जात. यांची संख्या सुमारें २५ हजार; पैकीं राजपुताना व मध्यहिंदुस्थान इकडेच बहुतेक हे लोक आहेत. हे लोक स्वत:ला रजपूत व कायस्थ म्हणवून घेतात. यांची कुलनामें पशु, पक्षी, झाडें व इतर पदार्थांवरून पडलीं आहेत. यांच्यात झाडावर लाख पेरण्याचा एक विधि आहे. तो बहुधां आश्विनांत करतात. लखेरा हा लाखेचे कीटक एका द्रोणांत घेऊन रात्रीं नागव्यानें ते झाडावर पेरतो, नंतर त्या झाडाभोंवती कुंपण घालून त्याला कोणास शिवूं देत नाही. एखाद्या विधवेस जर लाख पेरायची असली तर ती आपल्या मुलास कडेवर घेऊन द्रोण त्याच्या डोक्यावर ठेवून तेथें नेते व एका काडीनें ते कीटक झाडांस लावते. लखेर लोक पायावर अलक्तक रंग देण्याकरितां माहुरकी गुलेली म्हणून लाखेंत भिजविलेला कापूस विकतात. हा पायास लावला म्हणजे लाल रंग होतो. हे लोक बायका व पुरूषांस घालण्याचे कटिदोरे, राखी व अनंत विकतात.