विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लगोर्या - एक महाराष्ट्रीय खेळ. हा खेळण्यास फार सोपा असून त्याबद्दल कांही खर्च करावा लागत नाही. या खेळामुळें अचुक नेम मारण्याचा चांगला सराव होतो. पुण्याच्या डेक्कन जिमखान्यानें ज्या कांही महाराष्ट्रीय खेळांस व्यवस्थित सामन्याचें स्वरूप देण्याचा स्तुत्य उद्योग केला आहे त्यांपैकी हा एक खेळ आहे. या खेळाची माहिती व तो उत्तम तर्हेने खेळण्याचें नियम डे. जिमखान्यानें प्रसिद्ध केलल्या टिपणांच्या आधारानें देत आहों. एक मध्य बिंदु धरून दोन वर्तुळें काढावी. लहान वर्तुळाचा व्यास ६ फूट असावा व मोठया वर्तुळाचा व्यास १०० फूट असावा एक (अ आ) रेषेनें वर्तुहाचे दोन भाग सारखे करावे. या रेषेला समांतर व तिजापासून २५ फूट अंतरावर अशी एक (प फ) ज्या काढावी. गडयांच्या दोन बाजू कराव्या. प्रत्येक बाजूस ५ गडी असावेत. ज्या बाजूचे गडी लगोर्या पाडण्याचा व त्या पुन्हां रचण्याचा प्रयत्न करतात त्या पक्षास ''खेळणारा पक्ष'' व विरूद्ध बाजूस ''मारणारा पक्ष'' असें म्हणावें. वर्तुळाच्या मध्यबिंदूवर लगोऱ्या रचून ठेवाव्या. लगोर्या ६ व कळस एक मिळून सात लगोर्या असाव्यात. सर्वांत खालची लगोरी ६ इंच व्यासाची असावी व कळसासह सर्व लगोर्यांची उंची १ फूट असावी. लगोरी कळसाकडे निमुळती होत जावी. प्रत्येक लगोरी १॥ इंच जाड असावी व कळस ३ इंच उंच असावा. या खेळास घेतलेला चेंडू टेनिसच्या चेंडूएवढा कापडाचा असावा. या खेळास घेतलेला चेंडू टेनिसच्या चेंडूएवढा कापडाचा असावा. खेळणार्या पक्षांतील गडयांनीं प्रथम प फ या रेषेवर अगर तिच्या मागें उभें राहून चेंडू फेंकून लगोरी पाडण्याचा प्रयत्न करावा. व मारणार्या पक्षांतील गडयांनीं 'अ आ' रेषेच्या पलीकडे व धाकटया वर्तुळाच्या बाहेर आपल्या बाजूस उभें राहून चेंडू झेलावा. चेंडूचा पहिला टप किंवा टप पडण्यापूर्वीचा चेंडू झेलला पाहिजे. दुसरा अगर त्याच्या मागूनचा टप झेलला तर चेंडू झेलला असें धरलें जाणार नाहीं. खेळणार्या पक्षांतील जिवंत असलेल्या प्रत्येक गडयास लगोरी पाडण्याकरितां तीन वेळां चेंडू फेंकण्याचा हक्क आहे परंतु त्यानें फेंकलेला चेंडू विरूद्ध बाजूच्या गडयानें झेलला तर त्याचा चेंडू फेंकण्याचा हक्क गेला असें समजावें. याप्रमाणें खेळणार्या पक्षाच्या सर्व गडयांचा चेंडू फेंकण्यांचा हक्क गेला म्हणजे डाव पुरा झाला असें समजावें. खेळणार्या गडयानें चेंडू फेंकून लगोरी पाडली म्हणजे लागलीच विरूद्ध बाजूच्या गडयापैकीं एकानें धाकटया वर्तुळांत येऊन सर्व लगोर्या विसकटून टाकाव्या; परंतु कोणतीहि लगोरी धाकटया वर्तुळाच्या बाहेर त्यानें टाकतां कामा नये.
मारणार्या पक्षाचा जो गडी धाकटया वर्तुळांत येईल त्यास 'गोलंदाज' म्हणावें. 'मारणार्या' पक्षापैकीं एकटया गोलंदाजानेंच धाकटया वर्तुळांत यावें. दुसरे गडी आल्यास ते मेले असें समजावें. मारणार्या पक्षाच्या इतर गडयांनी चेंडू गोंलदाजानेंच धाकटया वर्तुळांत यावें. दुसरे गडी आल्यास ते मेले असें समजावें. मारणार्या पक्षाच्या इतर गडयांनीं चेंडू गोंलदाजाकडे फेंकावा किंवा तो गोंलदाजाजवळ आणून द्यावा. मात्र चेंडू आणून देतांना त्यांनी धाकटया वर्तुळाच्या आंत पाय टाकूं नये; टाकल्यास ते मेले असें समजलें जाईल. गोलंदाजास चेंडू मिळाल्याबरोबर त्यानें धाकटया वर्तुळांत चेंडू फेंकून विरूद्ध बाजूच्या गडयास मारावा. गडयास चेंडू लागला तर तो मला असें समजावें. चेंडू अधांतरी असतांनाच लागला पाहिजे; टप खाऊन लागलेला उपयोगी नाही. चेंडूनें जमिनीस स्पर्श केल्यावर तो पुन्हा गोंलदाजाच्या हातांत जाईपर्यंत (त्याचा-चेंडूचा) मारण्याच्या कामीं कांही उपयोग नाही. गोलंदाजानें धाकटया वर्तुळाच्या बाहेर चेंडू आणण्यास वाटेल तर जावें; परंतु चेंडू फेंकून मारतांना तो धाकटया वर्तुळाच्या आंत असला पाहिजे. गोलंदाजानें मारलेला चेंडू त्याच्या बाजूच्या गडयांनी पुन्हां त्याजकडे आणून द्यावा; व खेळणार्या पक्षाच्या गडयांनीं संधि सांपडल्यास मध्येंच चेंडू अडवून तो गोलंदाजास लवकर मिंळू नयें म्हणून पायानें दूर लाथाडून द्यावा; मात्र चेंडू अडवणें तो मोकळा असतांना आडवावा. विरूद्ध पक्षाच्या गडयास धक्का देऊं नये, दिल्यास तो गडी मेला असें समजावें. खेळणार्या पक्षाच्या गडयांनी लगोरी पाडल्यावर चेंडूस हातानें स्पर्श करूं नये; केल्यास ते गडी मेले असें समजावें. लगोरी पाडल्यावर खेळणार्या पक्षाच्या गडयांनी मोठया वर्तुळांत मर्यादेच्या आंत राहिलें पाहिजे. मर्यादेच्या बाहेर कोणी गेल्यास तो गडी मेला असें समजलें जाईल. खेळणार्या पक्षाच्या गडयांनी गोलंदाजाजवळ चेंडू नाही अशी संधि पाहून लगोर्या रचण्याचा प्रयत्न करावा. लगोर्या रचणें त्या अनुक्रमानें रचल्या पाहिजेत. कळसासह सर्व लगोर्या रचून झाल्या म्हणजे खेळ संपला.
लगोर्याच्या सामन्याचे सामान्य नियम.- प्रत्येक डावास ८ मिनिटें वेळ द्यावा. प्रत्येक बाजूचे दोन डाव व्हावेत. खेळणार्या पक्षास पुढें दिल्याप्रमाणें गुण मिळावे:- (अ) लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५. (आ) लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५. मारणार्या पक्षास पुढें दिल्याप्रमाणें गुण मिळावे:- (अ) गडी मारण्याबद्दल प्रत्येक गडयास ५. (आ) ८ मिनिटांच्या आंत विरूद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५. नियामोल्लंघन केल्यास प्रत्येक नियमोल्लंघनाबद्दल ५ गुण कमी करावे. सामान्याकरितां एक पंच व एक हिशेबनीस असावा. पंचानें डाव चालू असतांना गडी मेल्याबद्दल किंवा नियमोल्लंघन झाल्याबद्दलचा व इतर तक्रारींचा निकाल द्यावा व नियमाप्रमाणें सामना पुरा करून घ्यावा. (डेक्कन जिमखाना न्युज, आक्टोबर १९२५.)