विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लक्ष्मण - दशरथाच्या सुमित्रेपासून झालेल्या दोन मुलांतील ज्येष्ठ. याचें रामावर फार प्रेम असून हा रामाबरोबर वनवासास गेला. वनवासी असतां तो सीतेशी इतक्या मर्यादेनें वागत असे की, त्यास सीतेची बाहुभूषणें परिचयाची नव्हती, पादभूषणें मात्र होतीं. रावणाचा मुलगा इंद्रजित यास त्यानें मारलें. रावणवधानंतर राम परत आल्यावर त्यास यौवराज्य देत होता पण त्यानें तें स्वीकारलें नाहीं. हा वैराग्यशील व ज्ञानाधिकारी असल्यामुळें रामानें यास ब्रह्मविद्या कथन केली. सीरध्वज जनकाची औरस कन्या उर्मिळा ती याची स्त्री असून तिच्याठायी यास अंगद व चित्रकेतु असे दोन मुलगे होते. राम निजधामास जाण्यापूर्वीच हा योगधारणेनें देहविसर्जन करून स्वर्गलोकास गेला.