विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लक्ष्मी - एक देवी. 'लक्ष्मी' हा शब्द वेदांमध्यें वैभव या अर्थी आलेला आढळतो. अथर्वकाळीं लक्ष्मी ही वैभवाची देवता असें मानण्यांत येंऊ लागलें. तैत्तिरीय संहितेंत आदित्याच्या लक्ष्मी व श्री अशा दोन बायका होत्या असें म्हटलें आहे. उत्तरकालीन वाङ्मयांत लक्ष्मीचा विष्णूची बायको, संपत्तीची देवता, व कामाची माता या स्वरूपांत उल्लेख आला आहे. समुद्रमंथनाच्या वेळीं ती समुद्रांतून वर आली असें रामायणांत म्हटलें आहे. सृष्टीच्या आरंभी कमलपत्रावर ती तरंगत होती अशीहि एक आख्यायिका आहे. समुद्रांतून ती वर आली म्हणून तिचें क्षीराब्धिजा असें नांव पडलें. तिच्या हातांत कमल असतें म्हणून तिला कमला म्हणतात. भृगु व ख्याति यांच्यापासून ती झाली असें एका पुराणांत म्हटलें आहे. विष्णुपुराणांतहि तसें म्हटलें असून वामन, परशुराम, राम, कृष्ण या आवतारांत, पद्मा, धरणी, सीता, व रूक्मिणी असे लक्ष्मीनें अवतार घेतले व ज्या ज्या वेळीं विष्णु अवतार घेतो त्या त्या वेळीं तीहि विष्णूची सहचरी होण्याकरितां अवतार घेते असें म्हटलें आहे. लक्ष्मीचें असें खास देवालय नाहीं. तिचीं चंचला, लोकमाता, इंदिरा अशीं नांवें आहेत.