विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाइपझिग - जर्मनी, सॅक्सनींतील एक शहर. लोकसंख्या (१९१९) ६३६४८५. या शहरांतून व शहरांभोवतीं ३ लहान नद्यांचे निरनिराळे प्रवाह वहात जाऊन त्यांचा थोडयाच अंतरावर संगम होतो, व सर्व मिळून झालेली ही एल्स्टर नदी सालेनदीस जाऊन मिळते. येथील हवा उन्हाळ्यांत उष्ण व हिवाळ्यांत फार थंड असते. व्यापार व उद्योगधंद्यांत लाइपझिगचा नंबर जर्मनीत तिसरा लागतो. येथें जर्मन साम्राज्यांतील वरिष्ठ न्यायकचेरी असून येथील विश्वविद्यालयाचा दर्जा बर्लिन व म्युनिचच्या खालोखाल आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी बांधलेल्या कित्येक नवीन सार्वजनिक इमारतींमुळें या शहराचा देखावा फार भव्य दिसतो. येथें गॉथिक पद्धतीची एक इमारत आहे. तिच्यांत सॅक्सनीच्या राजांचे पूर्ण आकाराचे पुतळे ठेवलेले आहेत. नवें नाटकगृह, पदार्थसंग्रहालय वगैरेंच्या भव्य इमारती आहेत. यूरोपांतील धार्मिक सुधारणेचें स्मारक व लूथरचा ब्राँझ धातूचा एक पुतळा येथें आहे. विश्वविद्यालयाशिवाय येथें अनेक विषयांच्या शिक्षणसंस्था आहेत. संगीतकलेकरितां लापइझिंग हें सर्व जगांत प्रसिद्ध आहे. पुस्तकांचे व वर्तमानपत्रांचे प्रकाशक येथें पुष्कळ असल्यामुळें मोठमोठे विद्वान लेखक येथें येऊन राहातात. येथें ५०० च्या वर मासिकें व वर्तमानपत्रें प्रसिद्ध होतात व त्यांपैकीं कांहीचा जर्मनींत फार मोठा खप आहे. लाइपझिग व्यापारांत इतकें पुढें येण्याचें कारण, येथें दरवर्षी भरण्यार्या तीन मोठया जत्रा होत. यांच्याकरितां यूरोपखंडांतूनच नव्हें तर इराण, अमेंनिया व आशियाखंडांतील इतर देशातूनहि व्यापारी येतात. शहराबाहेर झेपेलिन विमानें ठेवण्याचा एक प्रचंड तबेंला आहे; त्यांत ४५० फूट लांब व ५० फूट उंच एवढया आकाराची विमानें पहाण्यास मिळतात.