विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लॉक जॉन (१६३२-१७०४) - एक इंग्लिश तत्त्ववेत्ता. हा ब्रिस्टलजवळ रिंग्टन येथें जन्मला. १६४६ सालीं वेस्टमिनिस्टर व १६५२ सालीं ऑक्सफोर्ड येथील विद्यालयांत गेला. ऑक्सफोर्ड येथील विद्यालयांत गेला. ऑक्सफोर्ड शिक्षकाची अभ्यासक्रम संपवून यानें लॉर्ड अॅशले यांजकडे शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढें अॅशलेच्या मरणानंतर (१६८३) हा हॉलंड देशांत राहण्यास गेला. येथें स. १६८९ पर्यंत राहिला. नंतर इंग्लंडमध्यें विल्यम ऑफ ऑरेंज याजबरोबर परत आला. १७०४ साली इसेक्स परगण्यांत ओटस् या गांवी हा मरण पावला.
लॉकची मतें.- सर्व ज्ञान इंद्रियदत्त निर्दिष्टापासून होतें. प्रारंभी मन अगदी कोरें म्हणजे विचाररहित असतें. त्यावर इंद्रियदत्त संवेदना नोंदल्या जातात. मनाच्या मानसिक कार्याचा यांत कांहीच भाग नसतो. मन ज्ञानपूर्ण होण्याच्या या क्रियेंत असंख्य वैयक्तिक संवेदना असतात. सारख्या गोष्टीच्या व वारंवार न बदलणार्या पुनरागमनानें नियम उत्पन्न होतात. हे नियम म्हणजे साहचर्यानें मिळालेल्या अनुभवाची लेखी विधानें होत. या विधानांत ''पाहिजेच'' हा निश्चयदर्शक शब्द येऊं शकत नाहीं. वरील प्रकारची मतें यानें प्रस्थापित केलीं. या वादास ''अनुभवजन्यज्ञानवाद'' (पहा) असें नांव आहे. ज्ञानप्राप्तीकरितां संवेदना क्षणिक असल्यामुळें ग्रहणशक्तीहून भिन्न मानसिक क्रियांची जरूर नसते असें याचें मत आहे. ''फिलॉसफी ऑफ लँग्वेज'' (भाषेचें तत्त्वज्ञान) या पुस्तकांत यानें म्हटलें आहे कीं, जगांतील वस्तू नांवावरून किंवा शब्दावरून व्यक्त होत नाहींत. अमुक पदार्थ व्यक्त करण्याकरितां आपण जे शब्द वापरतों त्या त्या शब्दांचें त्या त्या अर्थी त्यांचें वापरलें जाणें हें वापरणारावर अवलंबून असतें.
लॉकचे ग्रंथ. - (१) एसे कन्सर्निग ह्मूमन अंडरस्टॅंडिंग (मानवी आकलनशक्तीवर निबंध), थॉट्स कन्सर्निग एज्युकेशन (शिक्षणावरचे विचार); टू ट्रीटायजेस ऑन गव्हर्नमेंट (राज्यकारभारावर दोन निबंध), रीझनेबलनेस ऑफ ख्रिश्चेंनिटी (ख्रिस्ती संप्रदायाची विचारसुसंगतता). या चार पुस्ताकांत यानें आपलीं मतें व्यक्त केलीं आहेत. याच्यानंतर न्यूटननें याचीं मतें वाचून या मतांत बरीच सुधारणा केली.