विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाख - लाख देणारा एक किडा असतो. हा कॅस्सिडी वर्गांतला आहे. हा किडा मूळचा हिंदुस्थानांतील असून अद्यापहि तो हिंदुस्थानाबाहेर फारसा आढळत नाहीं. अथर्ववेदांत लाख शब्दाचा उपयोग, ज्यावर सामान्यत: लाखेचा किडा आढळतो असें पळसाचे झाड दर्शविण्याकरितां केला असून अलीकडील संस्कृत ग्रंथकार त्या झाडाला लाक्षातरू असें म्हणतात. सोनेरी, सुवासिक, कंसाळ, व पाण्याजवळ रहाणारा असें लाक्षा किडयाचें वर्णन वेदांत आढळतें. यावरून हिंदुस्थानांत फार प्राचीन काळापासून लाखेविषयीं माहिती होती हें दिसून येतें. परंतु ग्रीस, रोम, ईजिप्त, इराण व आफ्रिका, देशांतील सर्वसामान्य प्राचीन ग्रंथांत लाखेचे मुळींच उल्लेख आढळत नाहींत. लाखेची माहिती युरोपला प्रथम अरबी व्यापार्यांकडून झाली. या लाखेच्या किडयापासून रंगद्रव्य व राळ असे दोन पदार्थ मिळतात.
हिंदी लाखेचे गुणधर्म व उपयोग यांचे परीक्षण करून त्यांविषयीं सविस्त माहिती देणारा पहिला यूरोपियन गृहस्थ गॅशिया डी ओटा हा होय. पोर्तुगीज गव्हर्नरचा वैद्य, या नात्यानें हा हिंदुस्थानास १७३४ त आला होता. त्यानें १६ व्या शतकांत लिहिलेली माहिती आज विसाव्या शतकांतहि वाचण्यासारखी आहे. त्याच्यामागून हिंदुस्थानांत आलेल्या बहुतेक यूरोपियन प्रवाश्यांनी लाखेविषयी नवीन असें काहीं लिहिलें नाहीं. इटालियन लोक रेशीम रंगविण्याकरितां लाखेचा उपयोग करीत; व त्या कामाकरितां सुमात्री लाख उत्तम समजली जात असे. सुमात्री लाख, ही वास्तविक सुमात्रा बेटांत झालेली नसून, पेगूहून मिर्यांच्या बदला तिकडे पाठविण्यांत येत असे.
कोचिनीलच्या रंगाची मागणी वाढली तेव्हां लाखेचा रंग काढण्याकडे लोकांचे लक्ष विशेष वेधलें. कारण लाखेचा रंग कोचनीलच्या पेक्षां हलक्या प्रतीचा असला तरी त्याचा उपयोग कोचनीलच्या रंगाप्रमाणेंच होत असून शिवाय तो स्वस्तहि असे. त्यानंतर, रंग देण्याला एकदम उपयोगी पडतील, अशा लाखी रंगाच्या वडया तयार करण्याची कृति शोधून काढण्यांत आली. व लाखेपासून फक्त रंगच काढण्याचा धंदा इतका वाढला कीं, लाखीराळ ही रंगाच्या कारखान्यांत केवळ दुय्यम प्रतीचें आड उत्पन्न म्हणूनच तयार होत असे. रंगापासूनच कारखानदारांनां फायदा मिळत असे, यामुळें, लाखेंतील रंग द्रव्य वाढविण्याच्या दृष्टीनें लाखेची लागवड करणें, ती गोळा करणें व लाख तयार करणें, वगैरेसंबंधी नवीन पद्धती शोधून काढण्यांत आल्या व त्या अद्यापहि चालू आहेत. परंतु मध्यंतरीं सर डब्ल्यू. एच.पर्किन यांनी लावलेल्या अनिलीनच्या शोधामुळें मेक्सिकोंतील कोचिनीलचा रंग, व हिंदुस्थानांतील लाखी रंग या दोहोंचेहि धंदे ठार बुडालें.
लाखेची उत्पत्ति.- लाखेचा किडा आपल्या शुंडेनें झाडांतील रस शोषून घेऊन त्यावर जगतो. वयांत आलेल्या मादीला हलण्याची शक्ति नसते; परंतु नरांनां पंख फुटून ते माद्यांकडे उडून जातात. व लवकरच मरण पावतात. अळ्या (कोसले) च्या रूपानें नवीन किडे जुलै व डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यांत मादीच्या अंगांतून बाहेर येतात; व भक्ष्य शोधार्थ इकडे तिकडे फिरतात. ह्मा वेळीं ते अगदीं लहान व नांरिगी-तांबूल रंगाचे असून त्यांचे डोके, पोट वगैरे अवयव ओळखतां येत नाहीत; त्यांच्या मिशांची वाढ पूर्ण झालेली असून त्यांचे पायहि मजबूत असतात; परंतु ह्मा स्थितींत नर किंवा मादी ओळखण्याला कांही साधन नसतें. कोसल्यांची (आळ्यांची) लांबी सुमारें १/४० इंच असते. यांतून आळ्या कित्येक दिवस निघत असतात. व अखेर त्यांच्या योगानें फांद्या गजबजून जातात; तांबडया दिसूं लागतात. त्यां पैकीं बर्याच नाश पावतात व सुदैवानें, कांही वाऱ्याबरोबर, व मधमाशा, खारी, अथवा पक्षी यांच्या बरोबर अथवा स्वत:च्या प्रयत्नांनी स्थानांतर करतात. तेथें त्या एकाच जागीं चिकटल्यामुळें त्यांचे पाय निरूपयोगी होऊन गळून पडतात. अखेर त्यांच्या शरीराभोंवती राळयुक्त विष्टेचें आवरण जमूं लागते; व त्यायोगानें कधी कधी सर्व फांदीवर एक नवीन कवच तयार होतें. कवचाच्या वरचा भाग काढून पाहिल्यास आंत वर्तुळाकृति व दीर्घवर्तुळाकृति असे दोन प्रकारचे खण आढळतात; वर्तुलाकृति खण मोठे असून संख्येनेंहि पुप्कळ असतात; पैकीं पहिले म्हणजे वर्तुलाकृति खण माद्या असून दुसरे म्हणजे दीर्घवर्तुळाकृति खण नर होत.
कोसेले (आळ्या) बाहेर पडल्यानंतर सुमारें अडीच महिन्यांनी, नरांनां वर सांगितल्याप्रमाणें पंख फुटून. ते उडून माद्यांकडे जातात. नंतर लवकरच माद्यांकडे शरारें मोठीं होऊन त्यांनां तांबडा चकचकीत रंग चढतो; योग्य वेळीं आंळ्यांची वाढ होते. यापुढें मादी जिवंत रहात नाही; तिचें शरीर हें तिच्या (सुमारे १०००) संततीचें वसतिस्थान होतें; व त्यांतून ठरलेल्या वेळीं आळ्या बाहेर येतात. याप्रमाणें वर्षांतून दोन किंवा क्कचित तीन वेळांहि या किडयांच्या जन्ममरणाच्या फेर्या होतात.
ज्या फांद्यावर लाख चांगली बनलेली असते अशा फांद्या, आळ्या बाहेर येण्याच्या वेळेपूर्वी कापून, दुसर्या झाडावर अथवा त्याच झाडाच्या दुसर्या फांद्यांवर बांधतात. आळ्या बाहेर आल्यानंतर, त्या साहजिकच या नव्या फांद्यांवर जातात व तेथेंच चिकटतात. रंगाकरितां लाख गोळा करावयाची असल्यास आळ्या बाहेर येण्यापूर्वी लाखेच्या कांडया गोळा कराव्या; परंतु त्या राळेसाठीं पाहिजे असल्यास नंतर गोळा करणें चांगलें. कारण, राळेंत रंग रहाण्यापासून फायदा नसून तोटाच असतो, व शिवाय आळ्या आंत राहिल्यास, त्या कुजून कारखान्यांत दुर्गंधि सुटते. लाखेचा रंग काढीत असत त्यावेळी लाख गोळा करण्याचे हंगाम मेपासून जूनपर्यंत व आक्टोबरपासून नोव्हेंबरपर्यंत असत. यापुढें एक किंवा दीड महिन्यांत कोसले बाहेर पडतात.
ज्या झाडांवर लाखेचा किडा वाढूं शकतो अशा पुष्कळ झाडांत पिंपळ, जांभूळ, बोर, वड, नांदरूख, साल, कुसुम, खेर, पळस हीं मुख्य आहेत. हीं सर्व मूळची हिंदुस्तानांतील असून त्यांपासून मिळणार्या लाखेला जंगली अथवा रानटी लाख म्हणतां येईल. परंतु कांही ठिकाणीं केवळ लाख उत्पन्न करण्याकरितां, बाभूळ व तूर या झाडांची मुद्दाम लागवड करतात, म्हणून त्यांवरील लाखेला लागवड केलेली लाख म्हणण्यास हरकत नाही. लागवडीची लाख विशेष फायदेशीर पडत नाही; कारण लाखेची पैदास अथवा लाखेचें उत्पन्न आणि तिला येणारी किंमत हीं दोन्हीं नेहमीं अनिश्चित असतात.
लाखेचा पुरवठा होण्याचीं ठिकाणें.- हिंदुस्थानच्या बहुतेक उष्ण भागांत, परंतु विशेषत: मध्यप्रांत, बंगाल, आसाम व ब्रह्मदेश या भागांत लाख होते. सिंध व गुजराथमध्यें बाभळीच्या झाडांवर लाखेचा किडा होतो. परंतु, बंगाल्यांत बाभळीच्या झाडें व लाखेचे किडे पुष्कळ असूनहि येथील बाभळीच्या झाडांवर मात्र ते क्वचित दिसतात. बंगाल्यांत लाखेचे मुख्य कारखाने रांची, मानभूम, बांकुरा व बिरभूम जिल्ह्मांत आहेत. परंतु तेथें हा धंदा खालावत चालला आहे. मध्यप्रांतांत लाखेचा किडा सर्व ठिकाणी आढळतो; परंतु जबलपूर, सागर, दमो, नागपूर, रायपूर, बिलासपूर, संबळपूर, चांदा व मंडळा या जिल्ह्मांत लाख विशेष जमा होते. मध्यप्रांतांतील लाखेच्या धंद्याच्या संपूर्ण माहिती 'एक नोट ऑन दि लॅक इंडस्ट्री ऑफ दि सेंट्रल प्रॉव्हिन्सेस' (बुले. १९०२ नं. ८) मध्यें दिली आहे.
लाखेचे बहुतेक कारखाने बंगाल व संयुक्तप्रांतांतच आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. १९१८ त हिंदुस्थानांत एकंदर ७१ कारखाने होते. काडी लाख, दाणे लाख, कपरी लाख, याकुती लाख, गुंडी लाख वगैरे लाखेचे प्रकार तिच्या तयार करण्याच्या कृतीवरून झाले आहेत.
लाखेचे उपयोग- शेतकरी व जंगली भागांतील गरीब लोकांचा जीवनक्रम लाखेपासून मिळणार्या उत्पन्नामुळें थोडा बहुत सुखकर झालेला आहे. प्रत्येक गांवांत सुतार, गाडीवान, चांभार, वगैरे लोक असतातच, व त्यांनां कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत लाख लागत असते. लांकडांतील भेगा व खळगे लाखेनें भरून काढितात; खेळणीं, पेटया, पानदानें, कलमदानें, हुक्क्याच्या नळ्या, व इतर कित्येक लांकडी जिनसांनां लाखेचेंच रोगण व रंगहि दिला जातो. सोन्याच्या पोकळ दागिन्यांत लाख भरलेली असते; लाख भरल्याशिवाय पोकळ दागिन्यांवर चांगलेसें नक्षीकाम करतां येत नाहीं. तांब्यापितळेच्या भांडयांवर, व हस्तिदंतावरहि लाखेनें रंगीत नक्षी काढतात. जवाहिरे लोक, वाळू व लाख एका ठिकाणी मिसळून घांसण्या अथवा चरक्या तयार करतात, लाखेनेंच तरवारींच्या व सुर्यांच्या मुठी बसवितात. कुभांर, बुकें बांधणारे व चिलमी करणारे यांनां जिनसांवर रोंगण देण्याकरितां किंवा पदार्थ कठिण व्हावेत म्हणून आंत घालण्याकरितां लाखेची जरूर असते. लाखेचीं खेळणींहि करतात.
लाखी रंग तयार करण्याकरितां कपरी लाख साधारण नरम करून तींत रंगाची पूड टाकतात व लाख आणि रंग यांचा एक जीव होईपर्यंत कुटतात; या लाखेच्या सुमारें बोटाएवढया जाड व ५।६ इंच लांबीच्या कांडया करून विकतात. लांकडी जिनसांनां रंग देण्याकरितां याच कांडयांचा उपयोग केला जातो. यूरोपांत व अमेरिकेंतहि लाखेचा पुष्कळ उपयोग केला जातो; त्यांपैकी महत्त्वाचे उपयोग म्हणजे, वारनिशें (फ्रेंच पॉलिश), व सीलिंग वॅक्स (सील करण्याच्या कांडया), शिळाछापाची शाई, फोनोग्राफच्या बांगडया अथवा तबकडया, वैद्युतिक उपकरणांतील प्रतिरोधक वगैरे जिन्नस करणें हे होत. वैद्युतिक उपकरणांत लाखेची जरूर लागल्यामुळेंच हिंदुस्थानांतील लाखेची निर्गत अलीकडे वाढली आहे.
लाखेचा व्यापार.- हिंदुस्थानांतून परदेशांत बरीच लाख जाते. या लाखेपैकीं शेंकडा ५० वर लाख अमेरिकेंत व शें. ३० पर्यंत युनायटेड किंगडममध्यें जाते. १९१५-१६ सालीं अमेरिकेंने १०८ लक्ष रुपये किंमतीची लाख विकत घेतली व त्याच सालीं युनायटेड किंगडमनें ४३ लक्ष रूपये व फ्रान्सनें ६ लक्ष रूपये किंमतीची लाख हिंदुस्थानापासून खरेदी केली होती.