विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लाटव्हिया - रशिया, एक नवीन स्वतंत्र लोकसत्ताक राज्य. १९१८ सालीं नोव्हेंबरच्या १८ व्या तारखेस लाटव्हिया हें स्वतंत्र लोकसत्ताक संस्थान झालें; व १९२१ सालीं दोस्तराष्ट्रांच्या सुप्रीम कौन्सिलनें त्याला मान्यता दिली. लाटव्हियाचें क्षेत्रफळ २५०९६ चौरस मैल असून त्यांत लिव्होनियाचे चार जिल्हे, कूरलंड, लाटगालिया इत्यादि प्रदेशांचा अंतर्भाव होतो. रशियाच्या ताब्यांत जे बाल्टिक समुद्राच्या टापूंतील प्रांत होते त्यांचा लाटव्हिया बनला आहे असें थोडक्यांत म्हणतां येईल. लाटव्हियाची राजधानी रिगा शहर आहे; लोकसंख्या (१९२४) १९०९७००.

लाटव्हियांतील लोकांनां लेट अशी संज्ञा आहे. १३ व्या शतकापासून यांच्यामध्यें व जर्मनीमध्यें झटापटी होत असत. त्यांत जर्मनीचा जय झाल्यामुळें जर्मनीनें या भागांतील एस्टोनिया, लटगेल, लिव्होनिया, कूरलंड व लाटव्हिया यांचें एक संयुक्त लोकसत्ताक संस्थान आपल्या देखरेखीखालीं बनविलें. १७९५ सालीं लाटव्हिया हें रशियन सरकारच्या ताब्यांत गेलें. व १९१७ पर्यंत तें रशियाच्या सत्तोखालींच नांदत होतें.

महायुद्ध सुरू होतांच लाटव्हियाला स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याची आपली महत्त्वाकांक्षा फलद्रुप होण्याची संधि मिळाली असे वाटलें व रशियाप्रमाणेंच जर्मनीच्या विरूद्ध जरी हें राष्ट्र होतें तरी रशियन झारशाहींतून आपली मुक्तता करून घेण्याचा त्यांनी उद्योग आरंभिला. खुद्द महायुद्धाच्या धुमधडाक्यांत लाटव्हियाचें बरेंच नुकसान झालें व तें नुकसान सोसूनहि आपलें स्वातंत्र्य मिळविण्याचा लाटव्हियानें चंग बांधला. 'फार्मर्स पोलिटिकल लीग' नांवाची संस्था स्थापन करून स्थानिक व परदेशीय लेट लोकांचें एकत्रीकरण करण्याचा उलमानिस यानें प्रयत्‍न केला व तो बराच साध्यहि झाला. रशियांतील बंडामध्यें जर्मनीनें रशियाच्या सरहद्दीवरील प्रांताचा ताबा घेतला असतांहि लाटव्हियानें आपलें स्वातंत्र्य पुकारले. उलमानिस हा लाटव्हियाच्या स्वायत्त संस्थानचा अध्यक्ष झाला. तथापि बोल्शेव्हिकांनी थोडक्याच काळांत रिगावर स्वारी करून लाटव्हियाचा बराच मुलूख आपल्या ताब्यांत घेतला. तथापि जर्मन सैन्याच्या मदतीनें लाटव्हियानें तो मुलूख लवकरच पुन्हां आपल्या ताब्यांत आणला. जर्मनीनें रशियाच्या सरहद्दीवरील प्रांतांत आपले स्तोम माजविलें असें पहातांच तें स्तोम कमी करण्याचा दोस्तराष्ट्रांनी उद्योग आरंभिला. उलमानिसलाहि तेंच हवें होतें. तेव्हां त्यानें दोस्तांच्या मदतीनें जर्मनीचा पाडाव करून आपलें स्वातंत्र्य निर्धोक केले. तथापि अद्यापि लाटव्हियांतील कांहीं भाग बोल्शेव्हिकांच्या ताब्यांत होताच, तेव्हां तो परत मिळविण्यासाठीं बोल्शेव्हिकांवर स्वारी करण्याचें उलमा निसनें ठरविलें. पुढें बोल्शेव्हिकांमध्यें व लेटिश लोकांमध्यें बर्‍याच चकमकी उडून लेटिश लोकांनी बोल्शेव्हिकांचें वर्चस्व झुगारून दिलें. बोल्शेव्हिकांनी लाटव्हियाशी तहाचें बोलणें सुरू केलें. १९२० सालीं तह झाला. या तहानें रशियानें लाटव्हियाला युद्धांत मिळविलेला सर्व मुलूख परत दिला; व लाटव्हियाची जी जबाबदारी होती तिजपासून मुक्तता इत्यादि सवलती दिल्या.

घटना.- १९२२ साली लाटव्हियांतील मतदारसभेनें राज्यघटना मुक्रर केली. त्याअन्वयें लाटव्हिया हें स्वतंत्र व लोकसत्ताक संस्थान बनलें. राज्यकारभाराकरितां सेइमा (पार्लमेंट) सभा स्थापन करण्यांत आली. यासभेंत १०० प्रतिनिधी घ्यावयाचे असून, दर तीन वर्षांनी निवडणूक व्हावयाची असें ठरविण्यांत आले. संस्थानचा अध्यक्ष सेइमानें निवडावयाचा असतो. कार्यकारीमंडळ अध्यक्षानें निवडावयाचें असून न्यायखातें अगदीं स्वतंत्र ठेवण्यांत आलें आहे.

धर्म व शिक्षण.- लाटव्हियांत प्रॉटेस्टंट लोकांचे आधिक्य आहे. १९२२-२३ सालीं, प्राथमिक शिक्षणाच्या १८७१ शाळा होत्या. १९१९ त लाटव्हियन विश्वविद्यालय स्थापन करण्यांत आलें. याशिवाय लाटव्हियांत ३४ धंदेशिक्षणाच्या शाळा व संगीत व इतर कलांच्या शिक्षणसंस्था आहेत.

सैन्य व आरमार.- सैन्याची संख्या १७८३२ आहे. २१ वर्षांपासून लष्करी शिक्षण सक्तीचे आहे. आरमारांत ४ विनाशिका, ४ पाणबुडया व २ सुरूंगनाशक बोटी आहेत.
व्यापार व धंदा.- लाटव्हियाचा मुख्य धंदा शेतकीचा आहे. तथापि अलीकडे बरेच उद्योगधंदे निर्माण झाले आहेत. लाटव्हियांतून मुख्यत: ताग व साग हे जिन्नस निर्गत होतात. खनिज संपत्तीचा अभाव आहे. रिगा, टीपज व व्हेंटस्पिल्स अशी ३ प्रमुख बंदरे असून त्यांतून बराच व्यापार चालतो. १९२४ सालीं २५६३६४७३४ व १७०५२३७६२ लाटाच्या मालाची आयात व निर्गत झाली. १९२४-२५ सालीं लाटव्हियाचें उत्पन्न १९३७२६९७५ लाट व खर्च तितकाच होता.