विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाठी संस्थान - मुंबई, काठेवाड पो. एजन्सींतील एक संस्थान. याचें क्षेत्रफळ ४२ चौरस मैल आहे. काठेवाडांत सदर संस्थान ४ थ्या दर्जाचे आहे. लाठीचे संस्थानिक, भावनगर पालिठाणा व लाठी या घराण्यांचा साधारण मूळ पुरूष जो गोहेल शेजकजी त्याच्या वंशांतील आहे. लाठीच्या ठाकूरांपैकीं एकाची मुलगी दमाजी गायकवाडास दिली होती व त्यास चंबारिया अथवा दामनगर हें तिजबरोबर अंदण दिलेलें होतें व गायकवाडांनी ठाकुराला खंडणी माफ केली होती. हल्लीं गायकवाडाला दरसाल एक घोडा देण्याची वहिवाट आहे. संस्थानांत शांतता राखली जाईल अशाबद्दल १८०७ सालीं गायकवाड लाठीच्या ठाकूरकरितां जामीन राहिले होते. संस्थानाची राजधानी लाठी शहर आहे.