विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाड - ही मूळची एक राष्ट्रजात असावी असा पुष्कळांचा तर्क आहे. लाटदेश (दक्षिण गुजराथ) हें तिचें वसतिस्थान असून लाट या नांवाचाच लाड हा अपभ्रंश असावा. आज लाडांची स्वतंत्र जात राहिली नसून अहिरांप्रमाणेंच वाणी, कुंभार, सोनार, वंजारी वगैरे जातीत यांचा पोटवर्ग म्हणून समावेश झालेला दिसतो. लाडसुलेमानी म्हणून एक मुसुलमान कसाबांचीहि जात आहे. गुजराथेंत दुर्गादेवीचा दुष्काळ पडला तेव्हां लाड लोक खालीं दक्षिणेंत येऊन निरनिराळे धंदे करून राहिले अशी कथा सांगतात. लाट देशांत लाडी (लाठी) नांवाची भाषाहि होती, तिचें पुढें गुजराथींत रूपांतर झालें.