विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाँबॉक - डच ईस्ट इंडीजपैकीं लेसरसुन्डाद्वीपसमूहांतील एक बेट. क्षेत्रफळ ३१३६ चौरस मैल. लाँबाँक शिखर (११८१० फूट) हें मलेद्वीपसमूहांतील अत्युच्च असून त्यावर ज्वालामुखी आहे. याच्या सभोवतीं ८२०० फूट उंचीचा डोंगरपठाराचा प्रदेश आहे. येर्थं सेगारा आनक नांवाचें मोठें सरोवर आहे. दक्षिणश्रेणी ३००० फुटांपेक्षा कांहीशी उंच आहे. दोन्हीं पर्वतश्रेणींच्या मधील प्रदेशांत लहान लहान ज्वालामुखींच्या टेंकडया आहेत. वृक्षाच्छादित पर्वत व कांटेरी जंगलामध्यें कोठें कोठें बागाइती व सुपीक जमीन आहे. तांदूळ, कॉफी, नीळ, मका, साखर, कटियांग (एतद्देशीय कडधान्यें), कापूस व तम्बाखू हा माल बाहेरगांवी पाठवितात. प्राणिशास्त्रवेत्तयांस ऑस्ट्रेलियाच्या सरहद्दीचें बेट या दृष्टीनें लाँबॉक हें फार महत्त्वाचें आहे.
ससक लोक येथील मूळ रहिवाशी असावे, कारण या पूर्वीची कोणतीच जात आढळत नाहीं. हे लोक मुसुलमान असून हिंदु बॅलिनीज व हे यांत पुष्कळ बाबतींत फरक आहे. अगॉङ्दाहरणाच्या विजयापासून (१९ व्या शतकाच्या आरंभापासून) यावर बॅलिनीज लोकांचें वर्चस्व स्थापन झालें. १८९४ त डच लोकांनी बलिनीज सुलतानाच्या माताराम राजधानीवर हल्ला केला. या हल्ल्याचा उद्देश माताराम शहराच्या लोकांस शिक्षा करून ससक लोकांस बलिनीज लोकांच्या छळापासून मुक्त करण्याचा होता. परंतु ही स्वारी व्यर्थ झाली, म्हणून पुन्हां मोठया प्रमाणावर स्वारी करून सुलतानाचा पराभव करण्यांत आला व तो आणि इतर कांही सरदार यांनां कैद करण्यांत आलें. यानंतर या बेटावर डच-इंडियन अम्मल राहिला व एक असिस्टंट रेसिडेन्ट अम्पनममध्यें ठेवण्यांत आला. आतां लॉम्बॉकचा कारभार बली येथील डच रेसिडेन्ट पाहतो. स.१८९८ नंतर लॉम्बॉकचे पश्चिम, मध्य व पूर्व असे विभाग करण्यांत आले असून माताराम, प्रया व सिसी हीं मुख्य शहरें आहेत. पश्चिम किनार्यावर अम्पनम बंदर आहे. ससक लोकांची लोकसंख्या ३२००००, बलिनीज यांची ५००००, यूरोपीयन सुमारें ४०, चिनी ३००, व अरबी १७० अशी एकंदर लोकसंख्या आहे.