विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाबॉन - हें मलायाद्वीपसमूहाचें बोर्निओच्या वायव्येकडील एक बेट आहे. या बेटाचें क्षेत्रफळ ३०.२३ चौ. मैल आहे. येथें तांदूळ व साबूदाणा पिकतो. १८४६ सालीं इंग्रज लोकांस हें बेट सर जेम्स ब्रूक व सारावाकचा पहिला राजा यांच्या खटपटीने मिळाले व यांच्याकडे नंतर तें २ वर्षे होतें. १९०१ सालीं येथील लोकसंख्या ८४११ होती. मलाया जातीचे कोळी, चिनी, तामिळ व कदयन लोकांनी भटकणारी जात, टुलोंग इत्यादि लोक येथील रहिवाशी आहेत. येथील कोळसा बर्याच कंपन्यांनी खणला परंतु त्यांस फायदा झाला नाहीं. येथें उत्तम बंदर आहे. आजकाल लाबॉन बोर्निओच्या जवळच्या समुद्रकिनार्यावरील रहिवाश्यांचें व्यापाराचें ठिकाण असून हे लोक येथें मधमाशांच्या पोळ्याचें मेण, पक्ष्याची घरटी, कापूर, रबर, ट्रेपांग या वस्तू आणून चिनी दुकानदारांस विकतात व हे लोक सिंगापूर येथें हा माल विकतात. साबुदाण्याचाहि येथें मोठा व्यापार चालतो. येथें नारळ फार होतात. येथून नारळ, खोबरें बाहेरगांवी पाठवितात. येथील हवा उष्ण व सर्द आहे. स. १८९० च्या १ ल्या जानेवारीपासून १९०६ च्या पहिल्या जानेवारीपावेतों ब्रिटिश नॉर्थ बोर्निओ कंपनीच्या गव्हर्नरकडे या वसाहतीचा अधिकार दिला होता, परंतु वसाहतींतील लोकांनी बरेच अर्ज व निषेध प्रगट केल्यामुळें लाबॉनचा कारभार स्ट्रेट सेंटलमेंटच्या अधिकार्याकडे सोंपविण्यांत आला.