विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लायकर्गस (ख्रि.पू. ८ वे शतक) - हा ग्रीक इतिहासांत स्पार्टन राज्यघटनेचा मूळ संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या जन्म, मृत्यु, प्रवास, कायदे यांबद्दल भिन्न भिन्न गोष्टी प्रचलित आहेत. स्पार्टामध्यें दोन राजे जोडीनें राज्य करीत होते त्यांपैकी युनोमस राजाचा हा धाकटा मुलगा होय. पुतण्याच्या अज्ञानीपणांत हा त्याचा रीजंट होता. पुढें राजमातेनें याच्यावर बालराजाच्या खुनाच्या गुप्तकटाचा आरोप केला. तेव्हां स्वदेश सोडून तो क्रीट, ईजिप्त, आयोनिया, स्पेन, लिबी, हिंदुस्थान वगैरे देशांत गेला व तेथें त्यानें निरनिराळ्या राज्यव्यवस्था, कायदेकानू यांचा अभ्यास केला; व त्यावरून स्पार्टाकरितां उत्तमोत्तम राज्यव्यवस्था कोणती, याची योजना ठरवून तो स्वदेशी परत आला. मध्यंतरीच्या त्याच्या पुतण्याच्या कारकीर्दीत राज्यांत बरीच अव्यवस्था माजली होती. तिला कंटाळल्यामुळें लोकांनी लायकर्गसच्या आगमनाबद्दल मोठा आनंदोत्सव केला. ही संधि साधून यानें राज्यसूत्रें हाती घेतली व आपल्या सुधारणा अमलांत आणण्यास सुरवात केली. त्याच्या सुधारणा फारच चमत्कारिक व आमूलाग्र नवीन असल्यामुळें त्याला लोकांनी प्रथम जोराचा विरोध केला; व अशा एका बखेडयाच्या प्रसंगी एका माथेफिरू तरुणानें त्याच्या डोळ्याला इजा केली. तथापि न डगमगतां त्यानें आपल्या सर्व सुधारणा अमलांत आणल्या. हिरॉडोटस म्हणतो कीं, लायकर्गसनें सर्व जुनी पद्धति बदलून लष्करची पुनर्घटना केली व वृद्धांचें एक (कायदे) कौन्सिल शिवाय लोकसभा, पांच जणांचे एक कार्यकारी मंडळ व जोडीनें राज्य करणारे दोन राजे अशी राज्यघटना केली; सोन्याचांदीचीं नाणी बंद करविली; सर्व जमीन सारखी विभागून लोकांत वांटून दिली, व विशिष्ट स्पार्टन शिक्षणपद्धति सुरू केली. तथापि या वरील विधानांपैकीं कांही नि:संशय खोटी आहेत. उदाहरणार्थ नाण्याबद्दलेंच. कारण इतक्या प्राचीन काळीं ग्रीसमध्यें लोकांना नाणी माहीतच नव्हती. तसेंच जमीनविभागणीचें; ही जमीन विभगणीची विषमपद्धती फार प्राचीन काळापासून ग्रीसमध्यें सुरू होती. इतकें मात्र खरें कीं, या सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीनें त्यानें एकदम सुरू केल्या. स्पार्टामध्यें सर्वत्र दुही व अंदाधुंदी पसरली होती, ती नाहींशी करून त्यानें सर्वत्र एकी व व्यवस्थित कारभार सुरू स्पार्टाला बलाढय राष्ट्र बनविलें. मुख्यत: त्यानें लष्करी व्यवस्था, लष्करी शिक्षण व राहणी सुरू करून स्पार्टन सैन्य सर्व ग्रीसमध्यें पहिल्या प्रतीचे करून सोडिलें.