विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लायबेरिया - पश्चिम आफ्रिकेंतील नीग्रो लोकांचें प्रजासत्ताक राज्य. हें वायव्येस सेरालेनी ही ब्रिटिश वसाहत व आग्नेय दिशेस आयव्हरी कोस्ट ही फ्रेंच वसाहत या दोन वसाहतींच्या मध्यें आहे. लायबेरीया समुद्रकिनार्याचा बराच मोठा भाग भीतिप्रद आहे, कारण त्याच्या पृष्ठभागावर सुळकेदार खडक आहेत. सबंध लायबेरिया डोंगराळ किंवा खडकाळ आहे म्हटलें तरी चालेल. याच्या प्रत्येक भागांत पाण्याचा पुरवठा चांगला आहे. देशाच्या पश्चिमकडील अर्धभागांत दरसाल १५० इंच पाऊस पडतो व पूर्वेकडील अर्धभागांत सुमारें १०० इंच पडतो. जवळ जवळ प्रत्येक नदीतील वाळूंत थोडयाफार प्रमाणांत सोनें सांपडतें. शिवाय इंद्रनीलमणी, जस्त, कुरूंद दगड वगैरे मौल्यवान वस्तू सांपडतात. मन्नोव्हिया हें राजधानीचें शहर व प्रसिद्ध बंदर आहे. याशिवाय लायबेरियांत १४ बंदरे आहेत; त्यांपैकी वेवो, सायवोल, जेने, मारशल हीं मुख्य आहेत.
यूरोपीयनांनी लायबेरियन किनारा प्रथम १४ व्या शतकांत पाहिला अशी दंतकथा आहे. १४६१ सालीं पीड्रोडी सिंट्री या पोर्तुगीज प्रवाश्यानें केपमाउंटचें भूशीर व जंक नदीचें मुख शोधून काढलें. कांही वर्षानंतर पोर्तुगीजांनी लायबेरियाचा सबंध किनारा शोधून काढला. १६ व्या शतकापासून इंग्रज, डच, जर्मन, फ्रेच व इतर यूरोपीय व्यापार्यांत व पोर्तुगीज व्यापार्यांत चुरस सुरू झाली व पोर्तुगीजांनां लायबेरिया सोडून पळावें लागलें. १८२१ सालीं अमेरिकन कॉलनायझेशन सोसायटीनें केप मेसुराडो हें मुक्त केलेल्या अमेरिकन नीग्रो लोकांच्या पहिल्या टोळीचें निवासस्थान म्हणून निवडलें. तेव्हांपासून नीग्रो लोक लायबेरियाच्या किनार्यावर वसाहती करूं लागले.
सन. १८२२-१८२८ च्या दरम्यान अमेरिकन जेहुडी आशमन यानें ही वसाहत खरोखर स्थापिली. १८२४ सालीं तिला लायबेरिया हें नांव देण्यांत आलें. १८४७ सालीं अमेरिकन वसाहतवाल्यांनी लायबेरिया स्वतंत्र प्रजासत्तक राज्य आहे असें जाहीर केलें व १८४८-४९ त युनायटेड स्टेट्स सोडून बहुतेक मोठया राष्ट्रांनी याला संमति दिली. १८५७ सालीं लायबेरियांत दोन प्रजासत्तक राज्यें होतीं; एक लायबेरियाचें व दसरें मेरीलँडचें. १८८५ व १८९२ च्या फ्रेंच-इंग्लिश तहानें लायबेरियाचा मुलूख पश्चिमेस मॅनोनदी व पूर्वेस काव्हाला नदी या दोन नद्यांच्या मध्यें मर्यादित केला गेला. १९०३ सालीं सेरालेनी व लायबेरियामधील सरहद्द आंखण्यां आली. व पुढे आयव्हरीकोस्ट व लायबेरियामधील सरहद्दीबद्दल फ्रान्ससी वाटाघाट होऊन हिंटरलँडचा कांही भाग लायबेरियाकडून काढून घेण्यांत आला. १९१० साली लायबेरियन प्रजासत्तक राज्यांतील जमाबंदी, लष्कर, शेती, व मर्यादा वगैरेसंबंधीच्या सर्व बाबी अमेरिकन सरकारनें आपल्या ताब्यांत घेतल्या.
लायबेरियाच्या प्रजासत्ताक राज्यांत जे मोठाले सुप्रसिद्ध असे अध्यक्ष होऊन गेले त्यांपैकीच जे. जे. राबर्ट्स हा एक होत. प्रेसिडेंट आर्थर बारक्लेसारखा मुत्सद्दी या प्रजासत्ताक राज्यांत अद्याप एकहि झाला नाही. हा शुद्ध नीग्रो रक्ताचा मनुष्य होता. सध्यां या ठिकाणचा अध्यक्ष चार वर्षांकरितां निवडलेला असतो. आठ सिनेटर व तेरा प्रतिनिधींचें मिळून एक कायदेमंडळ आहे. येथील राज्यपद्धति बहुतेक संयुक्त संस्थानांच्या धर्तीवर आहे. शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्यांत येतें. येथील एतद्देशीयांची संख्या सुमारें २०००००० आहे. मॅनो व सेंटपाल नद्यांमधील घनदाट जंगली भागांत गोरा नांवाची बलवान जात राहते. जंगली भागांतील कांही जाती अजून नरभक्षक आहेत. कित्येक जातींच्या स्त्रिया अद्यापि नग्नावस्थेंत राहतात. कांही जातींच्या लोकांची अंगलट फारच सुंदर आहे. १९२३-२४ सालीं लायबेरियाचें उत्पन्न ३८००७८ व खर्च ३७१६५२ डॉलर होता. आयात १३६१७०० व निर्गत ११६६७३५ डॉलर किंमतीची होती. लायबेरियांत कांही शिक्षणाच्या संस्था, सरकारी व कांही मेथॉडिस्ट मिशनच्यातर्फे चालल्या आहेत. मन्नोव्हिया येथें मिशनचें एक कॉलेज व शिवाय सरकारी कॉलेजहि आहे. सैन्याची संख्या ५००० आहे. १६-५० वर्षामधील प्रत्येक माणसाला लष्करी नोकरी करावी लागते.