विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लायलपूर - पंजाब, मुलतान भागांतील एक नवा जिल्हा. क्षेत्रफळ ३१५३ चौरस मैल. १९०४ सालीं लायलपूर जिल्हा नवा बनविला. चिनाब व रावी या दोन नद्यांमधील प्रदेश यांत सामाविष्ट होत असून चिनाब नदीचा कालवा जिल्ह्यामधून गेलेला आहे. जिल्ह्माची हवा उष्ण असून पाऊस फार थोडा पडतो. १९२१ सालीं लायलपूरची लोकसंख्या ९७९४६३ होती. वायव्य रेल्वेचा वजिराबाद-खाजेवाल फांटा जिल्ह्मामधून जातो. यांत लायलपूर, समुंद्री, तोबातेकसिंह या तीन तहशिली असून प्रत्येकीवर एक एक तहशिलदार व नायब तहशिलदार असे दोन अधिकारी आहेत. चिनाब कालव्यावर देखरेख ठेवणारे ५ इंजिनियर लायलपुरास रहातात. लायलपूर तहशिलीचें क्षेत्रफळ १२४७ चौ. मैल असून लोकसंख्या ३९८२४४. लायलपूर हें तहसिलीचें मुख्य ठिकाण आहे. लायलपूर गांव नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवर स्टेशन आहे. याची लोकसंख्या १९११ साली १९५७८ होती. येथें म्युनिसिपालिटीची स्थापना १८९८ सालीं झाली. येथून गव्हाची निर्गत बरीच होते व चिनाब वसाहतींतील सर्व प्रकारचे शेतकी जिन्नस लायलपूर येथें जमा होतात. येथें सरकी काढण्याचे व कापूस दाबण्याचे कारखाने आहेत.