विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लारखाना, जिल्हा.- मुंबई, सिंधमधील एक जिल्हा. लोकसंख्या (१९२१) ५९७९६० असून क्षेत्रफळ ५०९१ चौरस मैल आहे. या जिल्ह्मांत, लारखाना, कंबर, रेतोदेरा, शेवान, मेहेरा वगैरे ११ तालुके आहेत. पश्चिम भागाखेरीज बाकीचा भाग सपाट असून त्याच्यामधून कालवे गेलेले आहेत. पश्चिम नार हा लारखाना जिल्ह्मांतील सर्वांत मोठा कालवा आहे. हा कालवा व सिंधुनदी यांच्यामधील प्रदेश सुपीक असून तेथें लोकवस्ती बरीच दाट आहे. पश्चिमेकडील पहाडांतून पुष्कळ लहान नद्या वाहतात. धारा टेंकडीच्या पायथ्यापासून धारातीर्थ नांवाची एक लहान नदी वहाते. तीत स्नान केल्यास सर्व प्रकारचे त्वप्रोग व संधिवात हे बरे होतात. हौद वगैरे बांधून येथें पाण्याची पुष्कळ सोय केलेली आहे. निंब, बाभूळ, पिंपळ व आंबे, केळी, लिंबें, डाळिबें वगैरे फळझाडेंहि विपुल आहेत. कालव्याच्या दोन्ही बाजूंस खजूरीच्या झाडांच्या राया आढळतात. चित्तो, काळी अस्वलें, डुकरे, काळवीट, कोल्हे, लांडगे, जंगली मेंढया व बोकड वगैरे प्राणी आढळतात. उष्णतेचें प्रमाण ११५० पर्यंत असून पावसाचें प्रमाण अतिशय थोडें असतें, तरी सिंधुनदाला महापूर येऊन शेतीची व वस्तीची नुकसानी झाल्याशिवाय राहात नाही. १८४४ सालीं महापुरानें एक लक्ष एकर जमीन वाहून जाऊन पिकांचे नुकसान झालें. त्याबरोबरच ५३ खेडींहि वाहून गेली. आतां धरणें वगैरे बांधून बराच बंदोबस्त केलेला आहे.
इतिहास:- येथील इतिहास फारसा महत्त्वाचा नाही. लारखाना येथें शहा बहार याचें थडगें व फत्तेपूरला शहा महंमदाचें थडगें ही प्रसिद्ध असून पाहण्यासारखी आहेत. सेहबान येथें एक किल्ला असून लाल शाहबाझ येथें थडगें आहे. दादू तालुक्यांत खुदाबाद येथें यार महंमदचें थडगें असून तेथील जुम्मामशीद ही फार उत्कृष्ट इमारत आहे. खुदाबाद एके काळीं फार मोठें भरभराटीस आलेले शहर होतें.
जिल्ह्मांत लारखाना, शेवान, कंबर, रातोदेरो व बुबक अशीं ५ मोठीं शहरें आहेत. लारखान्याची वस्ती अति दाट आहे. जिल्ह्माची भाषा सिंधी. लोकसंख्येत शें. ८५ मुसुलमान आहेत. मुसुलमानांत बहुधा सिंधी, बलुची व ब्रुही लोक येतात. लारखाना जिल्हा मध्यभागी कालवा असल्यामुळें फार सुपीक आहे. मुख्य धान्य तांदूळ, गहूं व ज्वारी. कंबर तालुक्यांतील तांदुळ अत्युकृष्ट समजतात. सेहवान तालुक्यांत गव्हाचें पीक उत्कृष्ट असतें. ऊंस, तंबाखू व नीळ हीं लारखाना व मेहर तालुक्यांत चांगली पिकतात. सिंधप्रांतांत पाळीव पशूंत उंट अतिशय उपयुक्त आहे. १९०३ साली सरकारी कालवे २३१ चौ. मै.; खाजगी कालवे ७५७ चौ. मै. असून मोठया विहिरी ७ होत्या. जाडें सुती कापड, सतरंज्या, रग, चटया, चीट धातूंची भांडी, जोडे, घोडयाची जीनें, व इतर कातडी सामान तयार होतें. रंग देणें हाहि धंदा महत्त्वाचा आहे. सतरंज्या व तोबरे बलुची व ब्रुही बायका तयार करीत असून ते जोही व सीवान तालुक्यांत विक्रीस पाठवितात. भात सडण्याचे कारखाने पुप्कळ आहेत. सिंधप्रांतांत लारखान्याएवढें व्यापारी शहर दुसरें कोणतेंहि नाही. जिल्ह्मातून नार्थवेस्टर्न रेल्वे गेलेली आहे. सिंधु नदावर व पश्चिम नार नदीवर सरकारी होडया व नावा चालतात. लारखान्यापासून शिकारपूरपर्यंत एक मोठी पक्की सडक गेलेली आहे.
राज्यव्यवस्था:- जिल्ह्मांत ३ पोटविभाग असून त्यांपैकी दोन पोटविभाग असि. कलेक्टराच्या व एका डेप्युटी कलेक्टरच्या हाताखाली आहे. पोटविभाग लारखाना यांत ता. लारखाना, रातोदेरो, लवदर्या, व कंबर (४ तालुके); पोटवि. मेहर यांत ता. काकर, मेहर, व नसीराबाद (३ तालुके); पोटवि. सेहवान यांत ता. काकर, मेहर, जोही. दादू लारखान्याचा जिल्हा व सेशन जज्ज सक्कर येथें राहतो. ४ सबजज्ज लारखान्याचें दिवाणी काम करूं शकतात. फौजदारी कामाकरितां प्रत्येक पोटविभागावर माजिस्ट्रेट असतो, गुरांची चोरी हा साधारण गुन्हा होय. सन १८४३ त सिंधप्रांत इंग्रजांनी आपल्या राज्यांत सामील केला पण त्याच्या पूर्वीसिंधप्रांतांत जमिनीच्या साऱ्याच्या बाबतींत चांगली व्यवस्था मुळींच नव्हती. जमिनीचे मालक जमीनदार, त्यांनी कुळांकडून धान्याच्या रूपानें वसुली करावी. पहिली पाहणी १८४७ झाली. पुढें १८५५-५६ सालांत फेरपहाणी झाली. अखेर पाहणी १८१३ त होऊन बंदोबस्त दर एकरी मळा रू.३।१०।०; तांदूळ, रू. ३।९।०; कोरडी जमीन रू. २।११।० असा झाला. १९०४ सालांत जिल्ह्माचें काळीचे उत्पन्न २४५०००० रू. व एकंदर उत्पन्न २९००००० रू होतें.
लारखाना, कंबर, रातोदेरो, शेवान व बुबक या ठिकाणी म्यु. कमिटया आहेत. या बाहेरची स्थानिक कामें जिल्हा बोर्ड पाहतें. १९०३-०४ साली जिल्हासभांचें उत्पन्न व खर्च सरासरी दोन लक्ष रूपये होता. शिक्षणबाबतींत मुंबई इलाख्यांत २४ जिल्ह्मांत लारखान्याचा नंबर २२ वा आहे. एकंदर लो. संख्येत शें. २-३ लोकांनां लिहितांवाचतां येतें. १९०३०४ साली शाळांची संख्या ५७४ असून १६५२७ विद्यार्थी शिकणारे होते. व त्यांत १८५० मुली होत्या. १९०३-०४ सालीं सरकारनें शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च १ लक्षाहून जास्त केला असून फीचें उत्पन्न ९१०० रूपये झालें होतें. लारखाना जिल्ह्मांत ८ दवाखाने आहेत.
पोटविभाग.- मुंबई, सिंधप्रांत, लारखाना जिल्ह्मांतील एक पोटविभाग. यांत लारखाना, लवदर्या, कंबर, व रातोदेरो हे तालुके येतात.
तालुका.- लारखाना जिल्ह्मांतील एक तालुका. याचें क्षेत्रफळ २६७ चौ. मै. असून १९२१ सालीं लोकसंख्या ७८८८३ होती. तालुक्याचें मुख्य शहर लारखाना. तालुक्यांत ७२ खेडीं आहेत. १९०३-०४ सालीं काळीचे उत्पन्न ४.२ लक्ष होते. तालुका सपाट असून धार कालवा बरोबर तालुक्यामधून गेलेला आहे. नैऋत्य बाजूला पश्चिम नार कालवा असून येथें पिकणारा तांदूळ सिंधप्रांतांत उत्कृष्ट समजला जातो. सिंधू नदाकांठी गहूं विपुल पिकतो. लारखाना शहराच्या सभोंवती पुष्कळ आंबराया व खजूराचीं बनें आहेत.
शहर.- हें शिकापूरपासून ४० मैल व मेहरपासून ३६ मैल असून येथें नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेचें स्टेशन आहे. याच्या भोंवतालची जमीन अतिशय सुपीक असून सिंधप्रांतांत या तोडीची जमीन इतर ठिकाणी कोठेंहि आढळून येत नाही. प्रशस्त रस्ते, उत्तम बगीचे, हिरवी गार झाडें हीं पाहून सिंधप्रांतांतलें हें (एडन) ''इंद्रभुवन'' आहे कीं काय असा भास होतो. येथील धान्यबाजार मोठा भरत असून तांदुहाची घडामोड चांगली होते. इतर जिन्नस, कापड, धातूची भांडी व चामडीं यांचाहि व्यापार मोठया प्रमाणावर असतो. येथें शहाबहार नांवाचा कोणी सरदार होता तो १७३५ सालीं मरण पावला. त्याचें येथें असलेलें थडगें पाहण्यारखें आहे. येथें जमीनदार लोकांच्या मुलांकरितां एक शाळा व बोडिंग १९०२ साली बांधले आहे. १८५५ सालीं या ठिकाणीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. (इंपीरियल गॅझेटीयर, पु.१६.)