विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लॉरेन्स, लॉर्ड (१८११-१८७९) - हिंदुस्थानचा एक गव्हर्नर जनरल. हा गॉर्कशायर मध्यें जन्मला. याचा बाप कर्नल अलेक्झांडर हा टिप्पूवरील श्रीरंगपट्टणाच्या शेवटच्या लढांईत होता. लारेन्सचें नांव जॉन लायर्ड मेयर होतें. याचे दुसरे भाऊ सर जॉर्ज सेंट पॅट्रिक व सर हेनरी यांनीहि हिंदुस्थानांत इंग्रजी राज्य स्थापण्याच्या कामीं याच्यासारखीच खटपट केली. जॉन हा १७ व्या वर्षी कलकत्ता येथें सरकारी नोकरीत दाखल झाला. थोडया दिवसांनी त्याला दिल्ली येथें असिस्टंट कलेक्टर नेमलें. येथें त्यानें २० वर्षेपर्यंत (१८२९-४९) मॅजिस्ट्रेट व कलेक्टरचें काम करून दिल्ली प्रांतांचें सूक्ष्म निरीक्षण केलें. पंजाब खालसा करण्याच्या कामीं त्यानें डलहौसीचें धोरंण अमलांत आणिलें. पहिल्या शीख युद्धांत यानें रसद व फौज यांची भरती केल्यानेंच इंग्रजांनां जय मिळाला (१८४६). त्यावेळी १५ वर्षे यानें अत्यंत कडक (आयर्न) पणें कारभार केला. त्यानंतर ३५ व्या वर्षी तो जालंदरभागाचा कमिशनर झाला. पंजाब खालसा होण्यापूर्वी हा आपला भाऊ हेनरी याच्या हाताखाली होता व त्यावेळचें साम्राज्यविस्ताराचें धोरण त्यानें पसंत केलें होतें; पण पुढें नानागर्दी झालेली पाहून यानें तें धोरण आपल्या गव्ह. जनरलच्या कारकीर्दीत सोडून दिलें यानें शीख लोकांनां युक्तीप्रयुक्तीनें स्वत:च्या राज्याचा विसर पाडून त्यांनां इंग्रजी लष्करांत दाखल केलें. पंजाबांतील ३६ निरनिराळीं संस्थासें व शीख समाज यांनां त्यांचें स्वातंत्र्य हिरावून आपल्या अंमलाखालीं आणण्याचें बिकट काम डलहौसीनें याच्या मदतीनें पार पाडलें. पंजाबची पैमाषबंदी (३० वर्षांची) याच्या वेळी प्रथम झाली. नाना गर्दीच्या वेळी हा पंजाबचा चीफ कमिशनर होता. त्यावेळी पंजाबांतील ५० हजार देशी सैन्यापैकीं ३८ हजार सैन्य हिंदुस्थानी होतें त्यांपैकी पुष्कळांनां नि:शस्त्र केल्यानें ते लोक नानानदीत जाऊन मिळाले. तेव्हां लॉरेन्सनें ५९ हजार पंजाब्यांचे निराळें सैन्य उभारून ६ टक्क्याचें सरकारी कर्जहि लोकांकडून मिळविलें. तरी पण इंग्रजांची स्थिति नाजुक झाली होती व एकदां तर पेशावरप्रांत अफगाणिस्तानला देऊन टाकावा व त्याची मदत घ्यावी असें लारेन्सनें ठरविलेंहि होतें, पण पुढें दिल्ली इंग्रजांच्या हातीं आलीं. नानागर्दी मोडल्यावर लॉरेन्स विलायतेस गेला (१८५९); तेथें त्याचा ''ब्रिटिश राज्याचा संरक्षणकर्ता'' म्हणून मोठा सन्मान होऊन त्याला (नेहमीच्या १००० पौडांशिवाय) जादा २ हजार पौडांचें सालिना पेन्शन मिळालें. थोडे दिवस स्टेट सेक्रटरीच्या कौन्सिलांत काम केल्यावर तो हिंदुस्थानचा ग. जनरल झाला (१८६४-६९). आपल्या या वेळेच्या कारकीर्दीत त्यानें (फॉर्वर्ड) अनुभवानें शहाणें होऊन चढाईचें धोरण टाकून दिले. अफगाणिस्तानच्या बादशहांच्या (अफजलखान व शेरअल्ली) भांडणांत त्यानें सामोपचाराचें धोरण ठेवलें. या सुमारास रशिया हिंदुस्थानकडे हळू हळू सरकत होता, त्यामुळें लॉरेन्सच्या या अफगाणिस्तानाच्या धक्केखाऊ (बफ्फर) धोरणावर विलायतेंत टीका झाली. तेव्हां त्यानें शेरअल्लीचा पक्ष घेतला. परंतु लगेच त्याची मुदत भरून तो विलायतेस निघून गेला (१८६९). पुढे लॉरेन्सचें धोरण सुटल्यानें दुसरें अफगाणयुद्ध झालें, त्यावेळी लॉरेन्सनें पार्लमेंटमध्यें आपल्या पूर्वीच्या धोरणाचें समर्थन केलें होतें. नोकरी सुटल्यावर त्याला लॉर्ड केले. पुढें त्यानें लंडन येथील शाळा व चर्चे यांच्या सुधारणांत शेवटपर्यंत लक्ष घातलें. मरणाच्या पूर्वी तो आंधळा बनला होता. याचा पुतळा लाहोर येथें असून त्याच्या खाली ''तरवार कीं लेखणी'' असा प्रश्रयुक्त लेख आहे. तो पुतळा आहे त्या जागेंतून काढावा म्हणून लाहोरच्या लोकांनी व म्युनिसिपालिटीनेंहि चळवळ चालविली होती पण सरकारनें ऐकलें नाहीं. मध्यंतरी पुतळ्याच्या हातांतील तरवार मोडलेली आढळून आली होती. (बॉसवर्थ स्मिथ-लॉईफ ऑफ लॉ. लारेन्स; एचिसन-लारेन्स; ट्रॉटर. लॉ. लारेन्स; एन्सा. ब्रिटा.)