विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लावा - राजपुतान्यांतील एक लहान ठाकुरात. हिचें क्षेत्रफळ १९ चौरस मैल आहे. ही स्वतंत्र ठाकूरात इंग्रजांच्या संरक्षणाखालीं आहे. हिच्या पूर्वेखेरीज सर्व बाजूंनां जयपूरचा प्रदेश व पूर्वेस टोंक संस्थान आहे. ही जयपूर शहराच्या नैर्ऋत्येस ४५ मैलांवर व टोकाच्या वायव्येस २० मैलांवर आहे. या ठाकुरातींतील जमीन मूळ जयपूर संस्थानचीच असून नाहरसिंग नांवाच्या मनुष्याला जहागीर दिलेली होती. नंतर लावाच्या आसपासचा प्रदेश व जयपूर भाग मराठयांच्या सत्तेखालीं पेंढारी पुढारी अमीरखानाच्या मार्फत आला. व १८१७ त नवीन स्थापन झालेल्या टोंक संस्थांत सामील झाला. परंतु टोंक दरबारची इच्छा लावाच्या ठाकुरांनां पूर्णपणें आपल्या हातांत आणण्याची असल्यामुळें, येथें सतत लढाया सुरू असत. शेवटीं १८६७ सालीं ठाकूरचा चुलता व त्याचे १४ अनुयायी यांनां विश्वासघातानें टोंक येथें ठार मारण्यांत आलें. हा अत्याचार टोंकच्या नबाबाच्या साहाय्यानें व चिथावणीवरून झाला असें सिद्ध झाल्यामुळें इंग्रजांनी त्याला पदच्युत करून त्याच्या मुलाला नबाब केलें व तेव्हांपासून लावा हीहि ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली स्वतंत्र ठाकुरात झाली. स. १८६८ पासून या ठाकुरातीवर जयपूर येथील रेसिडेंटाची देखरेख असते. पूर्वी लावा ठाकुरात टोकला ३००० रू. वार्षिक खंडणी देत असे. पुढें ही खंडणीची रक्कम कमी करण्यांत येऊन हल्ली ब्रिटिश सरकार नांवाला मात्र सालीना २२५ रू. घेतें. आपल्या हद्दीत ठाकूरानें मीठ तयार करंवू नये व मादक पदार्थ खेरीजकरून बाकी जिनसांवरची नाकेपट्टी काढून टाकावी असें ठरलें आहे. व याबद्दल इंग्रज सरकार ठाकुराला दरसाल ७०० रूपये व १० मण मीठ देतें. १९०१ सालीं लोकसंख्या २६७१; पैकीं शेंकडा ८८ हिंदु आहेत. उत्पन्न २०००००. रू. आहे. ठाकुरसाहेब किरकोळ दिवाणी फौजदारी खटल्याचा निकाल लावतात. मोठा खटला रेसिडेंटकडे पाठवितात.