विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लावो - ही थे अथवा शान जातीची एक पोटजात आहे. थे लोक सर्व इंडो-चायनांत व मलायाद्वीपकल्पाचा थोडासा कांही भाग या ठिकाणी अढाळतात. लावो या शब्दाचा अर्थ मनुष्य असा असून सयामच्या अमलाखाली असलेल्या थे लोकांनां तो लावतात. व ब्रह्मदेशाच्या अंमलाखाली असलेल्या थे लोकांनां शान असें म्हणतात. लावो लोकांचे दोन विभाग असून एकाला लावो पाँग डॅंम म्हणतात व दुसर्या लावो पाँग केओ म्हणतात; पहिल्यांतील लोक अंगावर गोंदून घेतात व दुसर्यांतील घेत नाहीत. त्यांच्या गालाची हाडें वर आलेली, नाक लहान पसरट, डोळे लांबट, तोंड रूंद, केंस काळे व मऊ, व रंग पिंवळा हे त्यांच्यांतील विशेष होत. ते उदास, शांतताप्रिय व सुस्वभावी आहेत. त्यांच्यामध्यें बहुपत्नीत्वाची चाल नाही. तांदुळ हें त्यांचे मुख्य खाद्य असून पुरूष, बायका व मुलें ही सर्व धुम्रपान करतात.