विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लाव्हाझिए - (१७४३-१७८४) एक फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ याचें पूर्वचरित्र व शोध यांविषयी 'विज्ञानेतिहास' (पृ.४७६-७८) यांत माहिती दिली आहे. त्यानें जमिनीप्रमाणे पिकाची निवड करणें, शेतकीप्रयोगशाळा काढणें, शेतकीचीं आउतें सुधारणें व नवे कायदेकानू करणें इत्यादि महत्त्वाची कामें केली. स. १७८७ त ऑर्लिन्स येथील संस्थेचा तो सभासद झाला. तेथें त्यानें शिलकी ठेवीच्या पेढया, विमाकंपन्या, पाटबंधारे, इत्यादि अनेक सुधारणा केल्या. पुढें यानें कराच्या पद्धतीची नवी योजना काढली व तीमुळें त्याचा संबंध आरोग्य, टांकसाळ, युद्धसामुग्री इत्यादि खात्यांशी येऊं लागला व १७९० त वजनें व मापें सर्वत्र एक करण्याच्या कमिटीचा तो चिटणीस व खनिजदार झाला. १७७१ त यानें जॅकीज पॉझ याच्या मुलीशीं लग्न केलें. पुढें लवकरच फ्रान्समधील कांही प्रमुख मंडळी याचा द्वेष करूं लागली. यानें केलेल्या उपयुक्त कामासंबंधी लोकांस संशय येऊं लागला. पुढे ता. २ मे १७९४ रोजीं याची कोर्टांत चौकशी होऊन हा व याच्याबरोबर आणखी २७ जण यांस फांशीची शिक्षा सुनावली गेली, व ती मेच्या ८ तारखेस अमलांत आली.