विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लॉस बेटें - ही फ्रेंच गिनीच्या किनार्यालगत असलेलीं बेटें सँगारी उपसागराच्या दक्षिणेस आणि फ्रीटाऊन (सीरा लिओन) च्या अगदी वायव्येस सुमारें ८० मैलांवर आहेत. यांत टामारा, फॅक्टरी, क्रॉफोर्ड, व्हाइट (अथवा रूमा) व कॉरल ही पांच मुख्य बेटें आहेत. ज्वालामुखी पवर्तांनीं बनविलेली ही बेटें आहेत. या सर्व बेटांवर ताडाची झाडें व फुलणारी 'अंडरवुड' झाडें पुष्कळ आहेत. टामारा बेटांत एक चांगलें बंदर असून मुख्य वसाहत येथेंच आहे. येथील लोक सेनिगँबियन नीग्रो लोकांच्या बागा जातीचे आहेत. हे मुख्यत्वें शेतकरी आहेत. एके काळीं या बेटांत गुलामांच्या व्यापार्याचें व चांचे लोकांचे ठाणें होतें. येथील गुलामांचा व्यापार व चांचेगिरी बंद करण्याचा प्रयत्न करतांना ब्रिटिश लोकांची शिबंदी येथें आली होती; (१८१२-१३) परंतु रोगट हवेमुळें ती परत बोलावण्यांत आली. सीरालिओनचा गव्हर्नर सर चार्लस मॅक् काथी यानें १८१८ सालीं बागा देशाच्या नायकांपासून या बेटांचा ताबा ब्रिटिशांकरितां मिळविला, व १८८२ सालीं फ्रेंचांनी ब्रिटिशांचा ताबा कबूल केला. नंतर येथें सीरालिओनच्या कित्येक व्यापार्यांचे ठाणें झाले. १९०४ च्या आंग्लो-फ्रेंच करारान्वयें ही बेटें फ्रान्सला दिली गेली. फ्रेंच गिनीची राजधानी कोनाकी फॅक्टरी बेटापासून तीन मैलांवरील एका लहानशा बेटावर लांब पल्ल्याच्या तोफांच्या मार्यांत असल्यामुळे फ्रेंचांनां या बेटांची गरज होती. पूर्वीच्या यूरोपीयन नाविकांना येथें सांपडलेल्या पूज्य मूर्तीवरून या बेटांनां हें नाव प्राप्त झालें आहे.