विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लासबेला - बलुचिस्तानमधील एक संस्थान. याचें क्षेत्रफळ ७१३२ चौरस मैल असून यांतील बहुतेक भाग पहाडी आहे. याच्या दक्षिणेस अरबी समुद्र; पूर्वेस किरथर पर्वत; पश्चिमेस हाला पर्वत; व उत्तरेस कलात संस्थानचा झालवाडा भाग. या संस्थानांत पोगली व हब या दोन मोठया नद्या असून इतर लहान प्रवाह पुष्कळ आहेत. लासबेलाच्या उत्तर भागांतील हवा ८ महिने अतिशय उष्ण असते. त्याच प्रमाणें पाऊसहि अतिशय कमी म्हणजे ५ इंचांहून जास्त केव्हांहि नसतो. सातव्या शतकांत लासबेला येथें एक बौद्ध उपाध्याय राज्य करीत होता. बौद्धामागून येथें मुसुलमान आले. त्यांच्या पुढील कांही काळाचा इतिहास उपलब्ध नाहीं. परंतु, कुरेशी अरबांपैकीं जामोत टोळींतील, अलियानी घराणें (येथील हल्लींचे जामसाहेब याच घराण्यांतील आहेत) उदयास येण्यापूर्वी गुजर, रूंझा, गुंगा व बुर्फत टोळ्यांची सत्ता थोडी बहुत या संस्थानांत चालत असे. अलियानी घराण्यांत एकंदर ७ पुरूष होऊन गेले; त्यांत दुसरा जाम मीरखान हा फार कारस्थानी पुरूष असून त्यानें पुष्कळ दिवस राज्य केलें. त्याच्या मागून गादीवर आलेल्या संस्थानिकाला मदत करण्याकरितां ब्रिटिश सरकारनें निवडलेला वजीर नेमण्यांत आला होता. १९०८ सालीं गादीवर असलेल्या जाममीर कमालखानला सर्व अधिकार मिळालेले होते. लासबेलाचे सात तालुके (नियाबती) असून त्यांत १३९ खेडीं आहेत. लोकसंख्या १९२१ सालीं ५०६९६ होती. बेल हें राजधानीचे ठिकाण असून उरमरा, सोलमियानी, उथल, लियारी व ओरमार हीं दुसरी महत्त्वाची शहरे आहेत. प्रचारांतील भाषा जदगाली नांवाची आहे. संस्थानांतील बहुतेक लोक सुनी पंथी मुसुलमान असून व्यापारी वर्गांत थोडे खोजे व हिंदु आढळतात. एकंदर लोकसंख्येंत अर्धे जमीनदार व शेतकरी असून १/४ लोक मेंढया, बकरीं पाळून व्यापार करतात. राहिलेले लोक मासे धरण्याच्या धंद्यावर अथवा मजुरी करून पोट भरतात. येथील जमीन सुपीक आहे. जास्त पुरामुळें पिकांचा नाश होऊं नये म्हणून धरणें बांधावी लागतात. सार्याची रक्कम नाण्यांत देत नाहींत, धान्याच्या रूपानें देण्याची चाल आहे. खाण्याचें मुख्य धान्य ज्वारी व मूग होय. हीं धान्यें पावसाळ्यांत पिकतात. बोकड, मेंढया व उंट प्रत्येक घरीं बाळगतात. मोठे घोडे व लहान तट्टे कमी. गाई, बैल हीं शेतकी कामाकरितां पाळतात. समुद्रकांठाचा मुख्य धंदा मासे धरण्याचा असतो. कापडावर नक्षीकाम चांगले होत असून चादरी वगैरे जिन्नस कराचीस पाठविले जातात. लासबेला संस्थानचें उत्पन्न ३ लक्षांपासून ४ लक्षांपर्यंत आहे. काळीचा वसूल ही उत्पन्नाची मुख्य बाब असून उत्पन्नाच्या चतुर्थांश सारा वसूल करण्याची पद्धत सरसकट संस्थानांत चालू आहे.