विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिआँ - फ्रान्स, र्होनच्या विभागांतील मुख्य शहर. व्यापार व लष्करी दृष्टींनीं पॅरिसच्या खालोखाल याचें महत्त्व आहे. लोकसंख्या (१९२१) ५६१५९२. येथें प्राणिसंग्रह, वनस्पतिबाग व औषधीबाग असून सर्वोत्कृष्ट हरितगृहें (ग्रीन हाउसेस) आहेत. येथें एकंदर २४ पूल बांधले आहेत. येथील खाजगी इमारतींत फोर्विअरची नातरदामची इमारत सर्वोत्कृष्ट आहे. सेंटजीनचें देवालय फ्रान्सच्या गॉथिक गृहशिल्पविद्येचे उत्तम उदाहरण होय पॅरिसच्या खालोखल येथील पदार्थसंग्रहालयाचें महत्त्व आहे. त्यांत प्राचीन इतिहासशास्त्राचें ज्ञान करून देणार्या वस्तूंचा व प्राण्यांचा संग्रह केला आहे. येथें शास्त्रीय, कला, उद्योगविषयक पुस्तकांचें वाचनालय आहे. सॉनच्या उजव्या तीरावर सेंट जस्ट भागांत रोमन लोकांच्या वेळच्या कबरी व हमामखान्याचे नाटकगृहाचे अवशेष आहेत. सॉन व र्होनमधून आगबोटीने येथील मालाची नेआण चालते. रेल्वे व ट्रामगाडया यांचा येथें फार सुळसुळाट आहे. येथें १८०८ सालीं स्थापन झालेलें विश्वविद्यालय आहे. १७६१ सालीं येथें सर्व यूरोपखडांतील अगदी पहिली पशुचिकित्सक शाळा स्थापन झाली. येथील रेशीम व रेशमी माल लिऑंच्या भरभराटीचें मूळ कारण होतें. आजकाल रेशमाच्या कारखान्यांत बरेच लोक काम करतात. याशिवाय लोखंड, पोलाद व तांब्याचा बराच मोठा व्यापार चालतो.