विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिंकन - इंग्लंड हें लिंकनशायरचें काउंटी शहर असून शिवाय म्युनिसिपल व पार्लमेंटरी बरो आहे. लोकसंख्या (१९११) ५७२९४. रोमन लिंकनचेंच सघ्याचें लिंकन बनलें आहे. येथील खरें वैभव म्हणजे कुमारी मेरीचें देऊळ हें होय; १०८६ सालीं याची जागा मुक्रर करण्यांत येऊन १०९२ सालीं हें काम पुरें झालें. येथील वास्तुसौदर्याचा सुंदर नमुना म्हणजे न्यूपोर्टआर्च अथवा लिंडमची उत्तरवेस होय. रोमन काळची कांही नाणीं व इतर वस्तू सांपडल्या आहेत. येथें कांही इमारतीचाहि शोध लागला; कांही प्राचीन प्रार्थनामंदिरे व इमारती अद्यापि आहेत. विल्यम दि कांकररनें बांधलेला लिंकन किल्ला कॅथेड्रलच्या पश्चिमेस आहे. आज येथील मुख्य धंदा शेतकीची आउतें तयार करणें हा होय. लोखंड गाळण्याचे कारखाने येथें असून धान्याचाहि व्यापार चालतो.