विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लिंकन, अब्राहाम (१८०९-१८६५) - हा अमेरिकेचा सोळावा अध्यक्ष. अब्राहामच्या बापानें कांही वर्षे सुतारकी व शेतकी केली. रॉकस्प्रिंग येथें अब्राहामचा जन्म झाला. १८१८ सालीं त्याची आई वारली व बापानें दुसरें लग्न केलें. सावत्र आईच्या वागणुकीमुंळे अब्राहामला वरें वळण लागलें. खेडेगांवामुळें साधारण लिहिण्यावाचण्यापुरतें त्याला शिक्षण मिळालें. परंतु सावत्र आईनें त्याला घरी पुस्तकी व शारीरिक शिक्षण बरेंच दिलें. त्यामुळें पुढें तो स्वत: कवि व लेखक बनला. एकविसाव्या वर्षी त्यानें फेरीवाल्याची नोकरी पत्करून फावलेल्या वेळांत कायद्याचा अभ्यास केला. तदनुषंगाने राजकारणांतहि प्रवेश केला १८३२ सालीं त्याची वरील नोकरी सुटून त्याच सुमारास सुरू झालेल्या ब्लॅक हॉक इंडियन युद्धांतील सैन्यांत कॅप्टनच्या जागी त्याची निवड झाली; परंतु त्यांत त्याच्या हातून यशस्वी कामगिरी झाली नाही. प्रतिनिधिसभेंत निवडून येण्याचाहि त्याचा प्रयत्न फसला. तेव्हां तो भागीनें दुकानदारी करूं लागला, त्यांत (वाचन व गोष्टी सांगणे यांच्या बेसुमार नादानें) कर्ज झालें. तेव्हां तो धंदा सोडून त्याने पैमाष मोजणीखात्यांत नोकरी पत्करली. स. १८३४ मध्यें इलिनॉइन्सच्या प्रतिनिधिसभेचा तो सभासद निवडून आला. मतदारीचा हक्क कर देणार्‍या किंवा शस्त्र धरणार्‍या सर्व स्त्री पुरूषांनां असावा असें त्याचें मत होतें. गुलामपद्धतीच्या तो पूर्ण विरूद्ध होता, तथापि गुलामांचा व्यापार बंद करण्याचा प्रश्न काँग्रेसचा नसून तो हक्क प्रत्येक संस्थानचा आहे, असें त्याचें मत होतें. पण त्यानें स्वत:च काँग्रसमध्ये कोलंबियांतील गुलामांची पद्धत बंद करण्याचें बिल आणलें होतें. १८४६ मध्ये तो राष्ट्रप्रतिनिधिसभेंत निवडून आला. त्यावेळीं सुरू झालेल्या मेक्सिकन युद्धाच्या तो विरूद्ध होता. १८४८ मध्यें त्यानें गव्हर्नरच्या जागी झालेली निवड नाकारून प्रेसिडेंटच्या जागेची खटपट सुरू केली. मध्यंतरी (१८३६) त्यानें वकिलीची सनद मिळविली; आणि पुढें स. १८४३ पासून मरेपर्यंत विल्यम हेन्री हर्नडनबरोबर भागीनें धंदा केला. १८४९-१८५४ पर्यत त्यानें राजकारणांत फारसें लक्ष न घालतां वकिलींत पहिल्या प्रतीचें नांव मिळविले. उलटतपासणीच्या कामांत तो अत्यंत कुशल होता; त्यानें चालवून जिंकलेले बरेच खटले आधारदाखल घेण्यात येतात. गणिताच्या व ग्रहगतीच्या ज्ञानाच्या आधारावर त्यानें खुनी आरोप्यांनां सोडविले आहे. या सुमारास सरकानें एक कायदा करून प्रत्येक संस्थानाला गुलामपद्धति बंद करण्या न करण्याचा स्वतंत्र अधिकार दिला. लिंकनहि स्वत: त्याच मताचा होता. परंतु कॉग्रंसचा प्रत्यक्ष अम्मल चालतो तेवढया प्रदेशांत तरी गुलामांच्या व्यापारास प्रथम बंदी व्हावी अशी त्याची इच्छा होती म्हणून १८५४ मध्यें खटपट करून युनायटेड स्टेट्सच्या प्रतिनिधिसभेंत तो निवडून आला. पुढें १८६१ सालीं झालेल्या निवडणुकींत तर तो प्रसिडेंट निवडून आला. लिंकनच निवड होतांच दक्षिणेकडील संस्थानांनी यूनियनमधून फुटून निघून स्वतंत्र प्रेसिडेंट नेमून राज्यकारभार सूरू केला. त्या कृत्याचा प्रेसिडेंट लिंकननें निषेध करून युनियन कायम राखण्याचें जाहीर केलें. इतक्यांत सुमटर किल्ल्यावर दक्षिणी संस्थानांनी हल्ला केला (१८६१ एप्रिल), म्हणून लिंकननें अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू केली आणि काँग्रसची जादा बैठक भरवून तिला मंजुरी मिळविली. तसेंच संस्थानांनां गुलामांची हळूहळू मुक्तता करण्यास लागणार्‍या पैशाची मदत करण्याचा ठराव कॉग्रसनें केला. शिवाय गुलाम लोक त्यावेळी मालकांच्या ताब्यांतून पळून लष्करांत शिंरू लागले होते, त्यांनां लिंकनने परवानगी दिली. पुढें १८६२ मध्यें जॉर्जिया, फ्लॉरिडा व साउथ कॅरोलिना या संस्थानांतील सर्व गुलाम स्वतंत्र झाले असल्याचा तेथील जनरल हंटरनें जाहीरनामा लाविला. ती गोष्ट करून त्याचें कृत्य बेकायदेशीर ठरविलें व तो अधिकार सर्वस्वीं आपल्या हातीं राखून ठेविला. इकडे यादवींत प्रथम यूनियन सरकारच्या सैन्याला जय मिळाले परंतु पुढें त्याचा पराभव होऊं लागला व त्याचा लोकमतांवरहि परिणाम होंऊं लागला होता. म्हणून लिंकननें १८६२ मध्यें पहिला जाहीरनामा असा काढला कीं, ज्याच्या संस्थानांतील किंवा भागांतील लोक यूनियनविरूद्ध लढत असतील त्या सर्व लोकांची गुलामावरील मालकी नष्ट व्हावी. नंतर (१८६३) दुसरा जाहीरनामा काढून त्यांत नांवें दिलेल्या सुमारें ८-१० संस्थानांतील यूनियनविरूद्ध लढाई चालविल्याबद्दल शिक्षा म्हणून, सर्व मालकांचा हक्क नष्ट करून त्यांच्या सर्व गुलामांनां मुक्त केलें. या मुक्त झालेल्या नीग्रोंनां सैन्यांत दाखल करण्यांत आलें व त्यांनीहि युद्धांत चांगला पराक्रम दाखविला; यामुळें त्यांच्या मुक्ततेबद्दल लोकांत अनुकूल मत तयार झालें. या परिस्थितीचा फायदा घेऊन लिंकननें स. १८६५ मध्यें गुलामगिरीच्या कायमच्या बंदीचा कायदा काँग्रेसकडून पास करून रिपब्लिक राज्यघटनेच्या मूलभूत कायद्यांत त्याचा समावेश केला. युद्धकालांत ग्रेटब्रिटन, फ्रान्स, मेक्सिको यांच्या संबंधांत कांही भानगडीचे प्रश्न उद्धवले, पण ते सर्व लिंकननें तडजोडीनें व दूरदर्शीपणानें सोडविले. फ्रान्सनें युद्ध मिटविण्याच्या कामीं मध्यस्थीची इच्छा दर्शविली; पण लिंकननें तिर्‍हाइतास या घरच्या भांडणांत पडण्याला बिलकुल संमति दिली नाही. तेव्हां त्यानें स्वातंत्र्य व बंधुता या तत्त्वांचा उपदेश करून व अमेरिकेनें पूर्वी मिळविलेल्या स्वातंत्र्याची आठवण देऊन सक्तीची लष्करभरती सुरू केली पण तिला विरोध होऊन डेमोक्रॅटिक पक्षानें लिंकनऐवजी स्वपक्षाचा प्रेसिडेंट निवडून आणण्याची चळवळ सुरू केली. ती लिंकननें दडपशाहीनें हाणून पाडली, मात्र या कामीं तो फार सौम्य व उदारपणें विरूद्ध पक्षाशी वागला. पुढें (१८६५) युद्धमान पक्षांची तहासाठी एक बैठक झाली. पण लिंकनच्या अटीमुळें ती अयशस्वी ठरली. स. १८६४ च्या नव्या निवडणूकींत डेमोक्रॅटिक पक्षानें युद्धात पराजय कबूल करून तें थांबविण्याचें धोरण जाहीर केलें, तरी त्याचा जय न होतां लिंकन पुन्हां प्रेसिडेंट झाला. इतक्यात यूनियन पक्षाच्या सेनापतींनीं युद्धांत पूर्ण जय मिळविले व युद्ध संपलें. तेव्हां वॉशिंग्टन येथें लिंकननें नव्या राज्यव्यवस्थेसंबंधानें जाहीर व्याख्यान दिलें. तेंच त्याचें शेवटचें भाषण होय. कारण पुढें लवकरच (ता. १४।४।१८६५) येथील नाटकगृहांत तो खेळ पहात बसला असतां जॉन वुइत्क्स पून नांवाच्या एका नटानें मागून त्याच्या डोक्यावर पिस्तूल झाडलें. त्यावर उपचार करण्यांत आले, पण दुसर्‍या दिवशीं सकाळीं त्याचा प्राण गेला. लिंकननें १८४२ सालीं मेरी टॉडबरोबर विवाह केला होता. त्याला चार मुलगे होते, त्यांपैकी सर्वात वडील मुलगा मंत्रिपदापर्यंत चढला होता. लिंकन ६ फूट ४ इंच इतका विलक्षण उंच असून शरीरानें पिळदार व रेखीव होता. त्यामुळें त्याची लोकांवर छाप पडे. तरूणपणी शरीरसामर्थ्याच्या सर्व खेळांत तो प्रवीण असे. तो नियमित, साधा, कोमल मनाचा पण काटक, धीराचा व आनंदी आणि माणयांचा पारखी होता. विशेषत: राजकीय प्रश्रांचा पूर्ण निर्विकार मनानें विचार करण्याचा गुण त्याच्यांत विशेष होता. ''नीग्रो लोकांचा रंग काळा असला व गोर्‍या लोकांपेक्षा अनेक बाबतींत ते हलके असले तरी स्वकष्टानें पोटाला मिळवून स्वतंत्रपणें राहण्याचा त्यांनां गोर्‍या लोकांप्रमाणे समान हक्क असलाच पाहिजे'' असें त्याचें मत होतें.