विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिटन, एडवर्ड जॉर्ज (१८०३-१८७३) :- एक इंग्रज कादंबरीकार व मुत्सद्दी. तो शरीरानें नाजूक होता. वयाच्या मानानें त्याच्या वृद्धीची वाढ फार जलद झाली होती. पंधराव्या वर्षींच त्यानें 'इस्माइल व इतर कविता' म्हणून एक पुस्तक छापिलें. त्याच्या 'पेलहॅम' नांवाच्या कादंबरींतील तत्कालीन डामडौलाच्या सुंदर वर्णनामुळें ती लवकर लोकप्रिय झाली. आपल्या लेखांतून लोकांचे प्रमुख गुणदोष, गुन्हेगाराला त्याचें शील सुधारून गुन्ह्यापासून परावृत्त करणें आणि आयुष्यांत मनुष्याची भरभराट होण्याचीं कारणें वगैरे सांगण्याचा तो प्रयत्न करीत असे. तो बरींच वर्षे पार्लमेंटचा सभासद होता, व त्यानें रिफॉर्म बिलाच्या संबंधानें बरींच भाषणें केलीं. १८३४ सालीं प्रसिद्ध केलेल्या 'दि लास्ट डेज ऑफ पाँपी' नांवाच्या कादंबरीनें त्याची कीर्ति फारच वाढली. १८५८ सालीं तो वसाहतीचा सेक्रेटरी झाला व १८७३ सालीं मरण पावण्यापूर्वी कांहीं दिवस तो चॅरन झाला होता. त्याचे लेख म्हणजे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धांतील ज्ञानविषयक चळवळींचा आदर्श आहेत असें समजलें तरी चालेल.