विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिथियम (परमाणुभारांक ६.९८) :- एक धातुरूप रासायनिक मूलद्रव्य. लिथियम ही रुप्यासारखी एक चकचकीत धातु आहे. हवेंत ठेवल्यास ती गंजते. ती शिशापेक्षांहि मऊ असून शिशाप्रमाणेंच तिची कागदावर काळसर रेशा उमटते. तिची तार निघते व न तापवितां तिचे दोन तुकडे जोडतां येतात. तापविल्यास ही सहज वितळते व तिचा रस कांचेच्या दोन पत्र्यांमध्यें दाबल्यास जिल्हई दिलेल्या चांदीप्रमाणें चकचकीत पत्र तयार होतो. लिथियम पाण्यापेक्षां फारच हलकें आहे. लिथियमयुक्त पाण्याचा उपयोग संधिवात झालेल्या मनुष्याला औषध म्हणून देण्याकरितां करतात.