विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिपि :- लिपिशास्त्राची माहिती ५ व्या विभागांत आली आहे (पृ. ३७-८०). भाषेंतील निरनिराळया ध्वनीचें पृथक्करण करून त्यापासून वर्णमालायुक्त लिपी तयार झाल्या; तत्पूर्वी चित्रयुक्त लिपि होती असा समज आहे. भारतीय व सेमेटिक असा लिपींचा मुख्य भेद पाडून मग त्यांत जगांतील बहुतेक लिपींचा समावेश करतात. भारतीय लिपींची मूळ जननी ब्राह्मी असून तिचा काल ख्रिस्त. पूर्व ५०० ते इ. स. ३०० असावा असा सर्वसाधारण समज आहे. चवथ्या शतकाच्या उत्तारार्धापासून ब्राह्मींत उत्तर व दक्षिणेकडील लिपींमध्यें फारच फरक पडला. उत्तरेकडील लिपींमध्यें गुप्त, कुटील, प्राचीन नागरी, तिबेटी, शारदा, बंगाली, राजस्थानी, गुजराथी, नागरी (मराठी व नागरी यांत फारच थोडा फरक आहे), नेपाळी, उडिया, काश्मिरी, गुरुमुखी वगैरे लिपींचा समावेश होतो. मध्यप्रदेशी, ग्रंथ, मलयाळी, तुळु, तामिळ, तेलगू, कानडी, कलिंग, मलायी इत्यादि लिपी दक्षिणेकडीला लिपींत समाविष्ट होतात. यांच्या खेरीज ब्राह्मीची तिसरी एक शाखा पाली नांवाची असून तिच्यापासून ब्रह्मी, सयामी, सिंहली, जावा आणि कोरियन या उपशाखा निघाल्या आहेत. सेमेटिक वंशोद्भव लिपींत मूळची मिसरदेशीय चित्रलिपि ही असून तिच्यापासून हायरेटिक व तिच्यापासून सेमेटिक निघाली. या सेमेटिकच्या दक्षिणसेमेटिक व फिनिशियन या दोन मुख्य शाखा आहेत; पैकीं फिनिशियनचा विस्तार फार आहे. तिच्या सिडोनियन, टायरीयन, व कॅडमियन या तीन शाखा असून पुढीलप्रमाणें त्यांच्या उपशाखा आहेत; सिडोनियनमध्यें हिब्रू, मंगोलियन, कालमुख, मांचू, खाल्डी, अरबी, तुर्की, फारषीं, इराणी, जॉर्जियन, आर्मेनियन या लिपी समाविष्ट होतात. टायरीयनमध्यें, इस्रायली व सामारिटन यांचा समावेश होता. कॅडमियनपासून, एद्रुस्की, लॅटिन (हिच्यापासूनच इंग्लिश, जर्मन, रोमन, इटालिक या निघाल्या), सर्व्हियन, रशियन, ग्रीक, अल्बेनियन, कॉप्टिक या उपशाखा निघाल्या आहेत.
आपले विचार व्यक्त करण्यासाठीं अगदीं रानटी अवस्थेंतील माणसांसहि कांहीं साधन लागतें व तें म्हणजे चित्रलेखन. प्राचीन गुहानिवासी माणसांनीं अशीं कोरलेलीं चित्रें अलीकडे सांपडलीं आहेत. ठराविक मर्यादेंतील कल्पना चित्रलिपीनें चित्रित करण्याच्या पुढचा काल म्हणजे अखिल माणसांच्या जीवनक्रमांतील एकूणएक कल्पनांच्या बारीकसारीक भागांचें वर्णन चित्रलिपीनें देणें हा होय. यासाठीं चित्रलिपींत निरनिराळया सुधारणा होत गेल्या. पुढें माणसाच्या तोंडांतून जे कोमल, कठोर, उच्च, नीच वगैरे ध्वनी निघतात त्यांसाठीं निरनिराळीं चिन्हें
पावरण्याची कल्पना निघाली असावी. ऐतिहासिक काळाच्या प्रारंभीं मिसरी लिपीमध्यें कल्पनादर्शक व ध्वनिसूचक अशा दोन्हीहि लेखनपद्धतींचा उपयोग केलेला आढळतो. कांहीं लिपींमध्यें एकाच ध्वनीचे निरनिराळे अर्थ दर्शविण्याकरितां त्या ध्वनिचिन्हांस निरनिराळया खुणा जोडतात. त्यामुळें लिपिअक्षरांचीं संख्या वाढते. उदाहरणार्थ, चिनी लिपि; हिचे शब्द एकावयवी असून लिपिअक्षरांची संख्या कित्येक हजार आहे. चित्रलेखन व ध्वनिचिन्हलेखन या दोन अवस्थानंतर वर्णमालायुक्त लिपि तयार होते असें विद्वानांचें मत आहे. तसेंच ध्वनिचिन्हयुक्त लिपींतील शब्दावयवाचें पृथक्करण होऊन (वर्णमाला तयार झाल्यानंतर) त्यापासून स्वर व व्यंजनें तयार होतात. यूरोपांतील बहुतेक लिपींच्या वर्णमाला फिनिशियन वर्णमालेपासून तयार झाल्या असें यूरोपीयन पंडितांचें मत आहे; तसेंच पश्चिम आशिया व आफ्रिका या देशांतील लिपीहि फिनिशियनपासूनच झाल्या असें ते म्हणतात. भारतीय लिपीची उत्पत्ति फिनिशियनपासूनच झाल्याचें ठरवितात. वेदांमध्यें व्याकरणांचा उल्लेख येतो; ज्याअर्थी लेखनिबद्धवाङ्मयाच्या अभावीं
व्याकरणविषयांवरील ग्रंथ तयार होणें संभवनीय दिसत नाहीं, त्याअर्थी वेदांइतक्या प्राचीन काळींहि भारतीय लिपिअस्तित्वांत होती असें अनुमान निघतें. ब्राह्मी लिपीचा शोध प्रागैतिहासिक काळापर्यंत लागतो हें तर तत्कालीन कांहीं मातीच्या भांडयांवरील व दगडी हत्यारांवरील अक्षरांनीं प्रत्यक्ष सिद्ध झालें आहे. याखेरीज या विशयाची साग्र माहिती वर सांगितल्याप्रमाणें ५ व्या विभागांत दिली आहे. चिनी, जपानी वगैरे लिपींची माहिती त्या त्या लेखांतून आढळेल. शिवाय 'भाषाशास्त्र' पहा.