विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिबिया :- लिबिया हें ग्रीक नांव उत्तर आफ्रिकेला असून याच भागाशीं रोमन व ग्रीक इतिहासाचा विशेष संबंध येतो. हा प्रदेश सुपीक असल्याबद्दल होमरनें याचा उल्लेख केला असून याचा विस्तार मात्र दिला नाहीं. यांत पूर्वी ईजिप्तचा समावेश करीत नसत. कारण ईजिप्त त्यावेळीं आशियाचा भाग समजत परंतु टॉलेमीनें तांबडा समुद्र व सुवेझची सामुद्रधुनि ह्या दोन आफ्रिकेच्या मर्यादा ठरविल्या. आफ्रिका हें नांव रोमन लोकांनीं प्रचारांत आणलें. प्राचीन साम्राज्यांत उत्तर आफ्रिकेचे (यांत ईजिप्त धरीत असत) मॉरेटॅनिया, नुमिडीया, आफ्रिका-प्राप्रिया, व सायरेनेका असे भाग असून डायओक्लेटनें जुनें नांव प्रचारांत आणलें. आणि सायरेनेकाचें मार्मेरिका (लिबिया लहान) व सायरेनेका (लिबिया मोठा) असे दोन भाग केले.