विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन (१८०३-१८७३) :- एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ. याचा बाप रंग विकीत असे व आपल्य धंद्यांत प्रगति व्हावी म्हणून तो रंगांसंबंधीं प्रयोगहि करीत असे. यामुळें लीबिग याला लहानपणापासूनच प्रयोग करण्याचा नाद लागला. तो रसायनशास्त्रावरील पुस्तकेंहि वाचीत असे. तो पुढें बॉन येथील विश्वविद्यालयांत गेला व तेथील अध्यापक कॅस्टनर याजवळ पृथक्करणक्रिया शिकण्याची इच्छा त्यानें प्रदर्षित केली; परंतु त्या अध्यापकासहि त्या क्रियेचें ज्ञान नव्हतें. अशा रीतीनें जर्मनींत प्रयोग करण्याची व शास्त्रीय ज्ञान वाढविण्याची सोय नाहीं असें पाहून तो पॅरिसमध्यें गेला व तेथें येनार्ड व गेल्यूसाक यांच्या खाजगी रसायनशाळेंत तो प्रयोग करूं लागला. १८२४ त तो गीसन येथें रसायनशास्त्राचा अध्यापक झाला व त्यानें तेथें एक मोठी सरकारी प्रयोगशाळा तयार केली. १८५२ त म्यूनिच येथील विश्वविद्यालयांत रसायनशास्त्राची मुख्य जागा त्यास मिळाली व तेथेंच तो मरेपर्यंत राहिला.
लीबिगची द्रवीकरणनलिका प्रसिद्ध आहे. सेंद्रिय पदार्थांचे पृथक्करण करण्याची रीत यानें नीट बसविली व स्फट, शैल, अज्ज, निकेल व कोबाल्ट या धातूंचीं अनेक संयुक्त द्रव्यें शोधून काढलीं. तसेंच पारा व रुपें यांचीं स्फोटक लवणें यानें तयार केलीं. व पुढें मोठया प्रमाणावर पालाशकर्बनत्रिद तयार करण्याची युक्तीहि शोधून काढली. प्राण्यांची शरीररचना व पोषक द्रव्यें यांची माहिती करून घेण्याकरतां त्यानें रक्त, पित्त, अन्न, इत्यादि अनेक पदार्थांचें पृथक्करण करून पाहिलें. रसायनशास्त्राची प्रगति होऊन त्याचा व्यवहारांत उपयोग व्हावा याकरितां लीविगनें आटोकाट प्रयत्न केला व अर्वाचीन रसायनशास्त्रांतील पुष्कळ महत्त्वाचे शोध यानेंच लावून ठेवले यांत शंका नाहीं.