विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लीवर्ड बेटें - वेस्ट इंडीजमधील एक द्वीपसमूह. ईशान्येकडून वाहणार्या व्यापारी वार्यांच्या मार्गांत नसल्यामुळें यांनां हें नांव मिळालें. हीं लहान ऍंटिलेजमधील अगदीं उत्तरेकडचीं बेटें आहेत. या समूहांत व्हर्जिन बेटें, सेंटकिट्स, ऍंटिग्वा, मांटसेरा, ग्वाडेलोपी, डोमिनिका, मार्टिनिक, व इतर मांडलिक वेटें यांचा समावेश होतो. व्हर्जिन बेटें ग्रेटब्रिटन व डेन्मार्क यांच्या ताब्यांत आहेत. हॉलंडच्या ताब्यांत सेंट युस्टेशिअस, साबा व सेंट मार्टिनचा कांहीं भाग आहे. फ्रान्सच्या ताब्यांत ग्वाडेलोपी, मार्टिनिक, सेंट बार्थोलोम्यु व सेंट मार्टिनचा राहिलेला भाग असून बाकीचीं बेटें ब्रिटिशांच्या ताब्यांत आहेत. या ब्रिटिशांच्या ताब्यांत असलेल्या भागाचे ऍंटिग्वा, सेंट किट्स, डोमिनिया, मांटसेरा व व्हर्जिन बेटें असे पांच इलाखे आहेत. या सर्व इलाख्यांवर राज्य चालविण्यासाठीं बादशहानें नेमलेलें एक कार्यमंडळ असतें. एक कायदेमंडळहि आहे. याचें एकंदर क्षे. फ. ७१५ चौ. मै. असून लो. सं. (१९२१) १२२२४२ आहे. साखर व काकवी हें मुख्य उत्पन्न होय. याशिवाय लिंवें, कोको, तंबाखू व कापूस हीं पिकें करतात