विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लुई राजे :- बर्याच यूरोपीयन राजांचें लुई हें नांवा होतें; उदा. कांहीं रोमन बादशहा आणि जर्मन राजे, बव्हेरियाचे राजे, फ्रान्सचे राजे, हंगेरीचे राजे, नेपल्सचे राजे, इत्यादि; यापैकीं फ्रान्सचा ११ वा, १४ वा व १६ वा लुई हे महत्त्वाचे व नामनिर्देश करण्यासारखे आहेत; त्यांचीच फक्त थोडक्यांत माहिती पुढें दिली आहे. बाकींच्याचे उल्लेख त्या त्या देशांच्या इतिहासांत सांपडतील.
लुई ११ वा (१४२३-१४८३). :- हा फ्रान्सचा ७ व्या चार्लसचा मुलगा. हा पांच वर्षांचा असतांना जोन ऑफ आर्क ह्या षूर स्त्रीनें इंग्लिषांचा पराभव करून याच्या बापास र्हीम्स येथें राज्याभिषेक करविला. त्याला श्रीमंत सरदारांच्या संगतीपेक्षां गरीब लोकांचा सहवास अधिक प्रिय वाटे. १४३९ मध्यें बापानें त्याला इंग्लिषांच्या विरुद्ध लढण्यास व पायटूचें बंड मोडण्यास पाठविलें; पण तिकडे हाच फितूर होऊन बंडखोरांनां सामील झाला. परंतु राजानें तो अपराध माफ केला. नंतर १५/२० हजार सैन्य देऊन त्याला स्विझ लोकांवर पाठविलें; परंतु तिकडे दोनशे स्विझ शूरांनीं त्याच्या एवढया मोठया सैन्यास दाद दिली नाहीं. पुढें त्या पितापुत्रांत एका प्रणयप्रकरणावरून कायमचें वाकडें आलें. तेव्हां लुईनें बापाला व त्याच्या प्रधानानां एकदम ठार मारण्याचा मोठा कट केला; पण तो उघडकीस आला; तरी चार्लसनें त्याला मुळींच शिक्षा केली नाहीं, उलट डॉफीन प्रांताचा गव्हर्नर नेमलें.
लुईनें या प्रांताचा कारभार अगदीं स्वतंत्रपणें सुरू केला. रस्ते, मार्केटें, बँका वगैरे सुरू करून प्रांतांत सुधारणा केली. पुढें त्यानें सॅव्हायच्या डयूकबरोबर तह करून व विवाहसंबंध जोडून मिलनची वांटणी करण्याचें बोलणें लावलें. याप्रमाणें परराष्ट्रीय राजकारणातहि तो ढवळाढवळ करूं लागला. तेव्हां बाप त्याच्यावर चालून गेला. तेव्हां तो बर्गडीच्या डयूकच्या आश्रयास गेला, व पुढें चार्लस मरेपर्यंत तिकडेच राहिला. स. १४६१ मध्यें चार्लस मरण पावून लुई राज्यावर आला. फ्रान्सबाहेरील इंग्लंड, स्कॉटलंड, इटली, स्पेन, पोर्तुगाल या देशांतील बुद्धिमान लोकांनां त्यानें आपल्या नोकरीस ठेविलें. विशेषत: मध्यम स्थितींतील विद्वान लोकांस त्याचा आश्रय मिळत असे. याप्रमाणें ब्रेझे, केव्हॅलियर, कॅबेनस, जीनडी, डीलन, ऑलिव्हर ली डेन वगैरे कर्तुत्ववान लोकांच्या मदतीनें त्यानें राज्य केलें. त्याचा सर्व रोख सरदार व पाद्री लोकांविरुद्ध होता; त्यांनां त्यानें पूर्ण जेरीस आणलें; तेव्हां वैतागून जाऊन त्यांनीं बंड केलें, त्यांत बर्गंडीचा डयूक पुढारी होता. फ्रान्समधील बहुतेक सर्व सरदार त्यांत सामील झाले; १४६५ मध्यें लढाई होऊन पॅरिसला वेढा पडला; तेव्हां लुईनें तह करून सरदारांचे हक्क कबूल केले. परंतु लवकरच त्यानें बर्गंडीच्या चार्लसला जो नार्मेडी प्रात दिला होता तो हल्ला करून परत घेतला. तेव्हां चार्लसनें इंग्लंडच्या ४ थ्या एडवर्डबरोबर विवाहानें नातें
जोडून मदत मिळविली. व लुईला कैद केलें आणि फ्लांडर्सचें स्वातंत्र्य कबूल करून घेऊन मग सोडून दिलें. इंग्लंडचा राजा ४ था एडवर्ड यानें १४०५ मध्यें फ्रान्सवर स्वारी केली, तेव्हां त्याला लुईनें ७५००० क्राऊन रोख व दरसाल ५०००० क्राऊन लांच देऊन इंग्रज मंत्र्यांनांहि लांच चारला व स्वारी परतविली. मग चार्लसविरुद्ध स्विझ लोकांनां उठविलें, त्यांत चार्लस ठार झाला व लुईनें याप्रमाणें सूड उगविला. नंतर, सर्व बर्गंडी प्रांत पदरांत पडावा म्हणून त्यानें चार्लसची मुलगी मेरी हिचा ऑस्ट्रियाच्या मॅक्झिमिलियनषीं विवाह घडवून आणला. परंतु मॅक्झिमिलियननें फ्लांडर्सकरितां लुईबरोबर युद्ध केलें. पुढें लुईनें स्पेनमध्यें ढवळाढवळ सुरू केली. इटलींतहि त्यानें गडबड चालविली. पोप ४ था सिक्स्टस याचें लुईषीं आरंभीं सख्य नव्हतें, शण अनेक कारस्थानें करून शेवटीं पोपला तह करण्यास त्यानें भाग पाडलें. लुईनें युद्धाकरितां व दुसर्या कारस्थानांकरितां प्रजेला जुलमी करांनीं अगदीं पिळून काढलें. कर वाढावे म्हणून त्यानें रेशमाच्या धंद्याला उत्तोजन दिलें. पार्लमेंटला तो मुळींच जुमानीत नसे. जुलमी राजा म्हणूनच तो प्रख्यात आहे. यात्रेकरूचा पोशाख करून, खेंचरावर बसून न ओळखेल अशा रीतीनें तो गांवोगांव हिंडे; सार्वजनिक खाणावळींत जेवी, भोंवतालीं जमणार्यां बरोबर हलकट भाषणें व वागणूक करी, व अशा रीतीनें आणखी किती व कषा रीतीनें प्रजेपासून पैसे उकळतां येतील हें पाही. म्हातारपणांत तर तो अत्यंत चमत्कारिक बनला. बर्यावाईटांबद्दल पूर्ण बेफिकीर असा हा राक्षसी प्राणी, मनुष्यें म्हणजे केवळ निर्जीव वस्तू मानी. याची धार्मिक श्रद्धाहि विचित्रच होती. शत्रूंच्या मुलुखांतील साधूसंतांनां देणग्या देऊन तो फितवी. याप्रमाणें धर्म म्हणजे राजकारणाचें एक अंग तो मानीत असे. अखेर स्वर्ग मिळावा व रोगक्लेषांतून मुक्तता म्हणूनहि त्यानें धार्मिक बाबतींत असाच देणग्यांचा वर्षाव चालविला होता. त्याच्या अखेरच्या दुखण्यांत तर वैद्यांनीं व ज्योतिषांनीं पैशाची लूट चालविली होती. फ्रान्स व इटलींत लोक त्याला शेवटपर्यंत 'कर्दनकाला' प्रमाणें भीत असत.
लुईचौदावा (१६३८-१७१५) :- याचा बाप १३ वा लुई व आई ऑस्ट्रियाची राजकन्या ऍन यांचें लग्न होऊन वीस वर्षे गेलीं तरी त्यांनां मूल झालें नाहीं. त्यामुळें १३ व्या लुईच्या मागें त्याचा भाऊ राज्यावर येण्याचा संभव दिसूं लागला; पण ही गोष्ट त्यावेळचा प्रख्यात प्रधान रिचेल्यू याच्या धोरणास अगदीं घातक होती. अशा वेळीं १४ वा लुई जन्मास आला; लवकरच (१६४३) बाप मरण पावल्यामुळें १४ वा लुई अल्पवयांतच राज्यावर आला व तो वयांत येईपर्यंत राजमाता व प्रधान कार्डिनल मॅझेरिन यांनीं राज्यकारभार चालविला. त्यावेळीं स्वदेशांतील बंडाळीमुळें व इंग्लंडषीं चालू असलेल्या त्रिंषद्वार्शिक युद्धामुळें राज्यावर बरेंच संकट आलें होतें. दोनदां पॅरिसहून राजधानी हालवावी लागली. पण लवकरच देशांतील अशांतता दूर झाली आणि वेस्टफॅलियाच्या (१६४८) व पिरनीजच्या तहांत (१६५९) फ्रान्सनें लष्करीद्रष्ट्या कारस्थान करून यश संपादन केलें. शिवाय पिरनीजच्या तहांत लुईच्या विवाहसंबंधानें वैयक्तिक व राष्ट्रीय दोन्हीं दृष्टीनीं महत्त्वाचें एक कलम होतें; तें हें कीं, त्याचा विवाह स्पेनची वारसदार मरायाथेरेसाबरोबर व्हावा. लुईचें मॅझेरिनच्या एका पुतणीवर पूर्वीच प्रेम जडलेलें होतें, तरी खासगी सुखापेक्षां राजकारणास अधिक महत्त्व देऊन त्यानें स्पेन राजकन्येशीं १६६० मध्यें विवाह केला. मॅझेरिन वारल्यावर लुईनें कोणास प्रधान न नेमतां सर्व राज्यसूत्रें हातीं घेतलीं. त्याचा स्वभाव रंगेल होता तरी राज्यकारभाराच्या कामांत त्यानें केव्हांहि आळस किंवा हयगय केली नाहीं. मी मी म्हणविणारे मुत्सद्दीहि त्याला वचकून वागत. त्याच्या दरबारचा थाट मोठा भपकेदार होता. कला-कौशल्य व वाङ्मय यांच्या इतिहासांतील त्या काळाला लुईचें नांव पडलें आहे खरें; पण वास्तविक तद्विशयक उन्नति त्याच्या कारकीर्दीच्या पूर्वीच शिखरास पोंचली होती, तथापि त्याच्या वेळीं युद्धसामर्थ्य व कलाकौशल्य या दोन्हीं बाबतींत सर्व यूरोपमध्यें फ्रान्सचा नंबर पहिला होता, यांत शंका नाहीं. स्वत:च्या ऐश्वर्याचा अभिमान वाहणार्या फ्रान्स राष्ट्रालाहि अंतस्थ धामधुमीचा वीट आलेला असल्यामुळें लुईसारखा पूर्ण अनियंत्रित तथापि महत्त्वाकांक्षी व कर्तुत्ववान राजा मनापासून आवडूं लागला. लुई हा आपल्या शारीरिकक व बौद्धिक गुणांनीं 'बडा सुलतान' शोभण्याला लायक होता, व त्याप्रमाणें त्यानें सुलतानशाही गाजवली. त्याची राणी मरायाथेरेसा व लुई या दोघांचें रहस्य विशेषं नव्हतें. लुईच्या राजरोस ठेवलेल्या रखेल्यांचें मात्र त्याच्यावर फारच वनज होतें; व्हेलर, माँटस्पेन, मेंटेनन या त्यांत मुख्य होत्या. मेंटेनन ही स्केरॉन नांवाच्या नाटककाराची विधवा बायको होती. ती राजाच्या अनौरस मुलांची दाई म्हणून नोकरीस राहिली. तिच्या सद्गुणांमळें तिचा राजाच्या मनावर पगडा बसला. तिनें उलट राजाचें व मरायथिरसाचें सूत जमवून दिलें. पुढें मराया मेल्यावर मेंटेनननें लुईबरोबर कायदेशीर विवाह केला. तेव्हांपासून राजाच्या राज्यकारभाराला व खाजगी आचरणाला बरेंच धार्मिक स्वरूप आलें. लुई आपल्या कारकीर्दीच्या आरंभकालांत आर्थिक, व्यापारी, औद्योगिक व आरमारी सुधारणा अमलांत आणण्याच्या उद्योगांत गढलेला होता, परंतु स. १६६७ पासूनच युद्धसत्रांनां जी सुरवात झाली तीं युध्दें त्याच्या मरणकालपर्यंत फारसा खंड न पडतां चालूं होतीं. या युद्धाचीं कारणें व त्यांतील प्रत्यक्ष कार्यक्रम यांमध्यें लुईनें स्वत:च्या महत्त्वाकांक्षा व प्रौढी यांकरतां केलेल्या गोष्टीच विशेष आहेत; परंतु पुढच्या (१६७८-८८) कालांत लुईच्या कारभाराला निराळी दिशा लागली, आणि फ्रान्सचें सामर्थ्य खालावलें. याचें मुख्य कारण प्रॉटस्टेंट लोकांचा झालेला छळ. त्यामुळें फ्रान्सामधून हजारों विद्वान प्रॉटेस्टंट निघून परदेषीं गेले, इतकेच नव्हें तर तोंपर्यंत फ्रान्सला इतर प्रॉटेस्टंट राष्ट्रांचें जें पाठबळ होतें तेंहि नष्ट झालें. इतक्यांत (१६८८) इंग्लंडांत राज्यक्रांति झाली व तीमुळें इंग्लंडच्या दोस्तीलाहि लुई मुकला. 'ग्रँड अलायन्स' मधील दोस्तांबरोबर युद्ध होऊन (१६८८-९७) रिस्विकच्या तहानें फ्रान्सच्या सरहद्दीवरील कांहीं प्रांत गमावले. इतक्यांत स्पेनच्या गादीच्या वारसहक्कासंबंधांत आपला नातू फिलिप याच्याकडे तो वारसा येईल असें लुईनें केलें. पण त्यामुळेंच फ्रान्सकडे जरी तो हक्क कायम राहिला तरी कित्येक प्रांत फ्रान्सला सोडून द्यावे लागले. ह्या युद्धामध्यें लुईनें आपली राष्ट्रीय कार्यनिश्ठा फार आष्चर्यकारक रीतीनें व्यक्त केली; पण युद्धखर्चाखालीं सर्व राष्ट्र चिरडून कोलबर्टच्या सर्व सुधारणा नाश पावल्या. खुद्द लुईवरहि अखेरीस दु:खप्रसंग कोसळले. त्याला मुलेबाळें, नातूपणतू पुष्कळ होते. त्यांपैकीं कांही त्याच्या डोळयादेखत वारले. त्या दु:खानेंच तो मेला.
लुई १६ वा (१७५४ - १७९३) :- याची बायको ऑस्ट्रियाच्या मरायाथेरेसाची मुलगी मेरी ऍंटोइन. हा वीस वर्षांचा असतां याचा आजा १५ वा लुई वारला. व १७७४ त हा गादीवर आला. फ्रान्सची सांपत्तिाक स्थिति जी अत्यंत खालवली होती, ती त्यावेळचा मुत्सद्दी टर्गो यानें सुधारली. परंतु दोन वर्षांनीं लुईनें, टर्गोच्या सुधारणांमुळें ज्या पिढीजाद लोकांच्या हक्कांवर पाणी पडण्याची वेळ आली होती त्यांच्या कारस्थानाला भुलून टर्गोला काढून टाकलें. पुढें राणी मेरीनें लुईवर छाप पाडून कारभार आपल्या हातीं घेतला व कॅलोन नांवाचा उधळेखोर प्रधान नेमला; त्यामुळें जमाखर्चांत मोठा गोंधळ माजून शेवटीं त्याचें जगप्रसिद्ध फ्रेंचराज्यक्रांतीमध्यें पर्यवसान झालें. त्याच्या कारकीर्दीच्या तिसर्या भागास १७८९ मे ता. ४ रोजीं सुखात झाली. त्या दिवशीं त्यानें 'देशसभा' बोलावली आणि त्याच दिवशीं राज्यक्रांतीला सुरवात झाली. प्रथम पॅरिसमध्येंच बंड झालें; बंडखोरांनीं बॅस्टिल तुरुंग सर करून प्रथम राजकीय व इतर सर्व कैद्यांची सुटका केली. पुढें त्यांनीं राजाला व त्याच्या कुटुंबियांनां कैद करून टयूलेरिस येथें अटकेंत ठेविलें. तथापि देशांत पुष्कळ लोकांमध्यें राजनिश्ठा कायम होती. राजानेंहि नवीन राज्यघटना मान्य केली, याप्रमाणें १७९० च्या जुलैपर्यंत राजा लोकप्रिय होता. पुढें १७९१ त राजानें फ्रान्समधून गुप्तपणें पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो फसला; त्यावेळीं नव्या राज्यक्रांतीला विरोधी अशा मजकुराचा राजाला गुप्तपत्रव्यवहार प्रसिद्ध झाला. तेव्हां क्रांतिकारकांच्या एका पक्षानें राजाला पदच्युत करण्याचा प्रयत्न केला; त्यानें राजाला ऑस्ट्रियाबरोबर युद्ध सुरू करण्यास लाविलें. पण त्यांत अपयश आलें. त्यामुळें सर्व देश राणी व राजा या दोघांविरुद्ध फार चिडून गेला. तेव्हां टयूलिरिसवर हल्ला करून क्रांतिकारकांनीं राजाला व त्याच्या बायकामुलांनां आपल्या कबजांत घेतलें; व 'राष्ट्र-परिषद' भरविली. त्या परिषदेनें १७९२ सप्टेंबर ता. २१ रोजीं राजशाही नष्ट केल्याचें जाहीर केलें, नंतर लवकरच राजाची देशद्रोहाच्या आरोपावरून चौकशीं झाली; त्यांत त्यावर आरोप शाबीत होऊन त्याला मरणाची शिक्षा सांगण्यांत आली. व त्याप्रमाणें १६ व्या लुई राजाचा १७९३ जानेवारी ता. २१ रोजीं वध करण्यांत आला. हा राजा स्वभावानें अगदीं दुबळा व बुद्धीचा मंद होता. तथापि त्यानें शेवटल्या चौकशीच्या व वधाच्या प्रसंगीं जें धैर्य व मानीपणा दाखविला त्यामुळें देशामध्यें त्याचा बराच नांवलौकिक झाला; त्याच्या खाजगी डायरीवरून त्याला राजकारण कशाशीं खातात हें मुळींच कळत नव्हतें. शिकारीचा काय तो त्याला मोठा नाद असे. त्यानें १७८९ जुलै १४ तारखेला म्हणजे सर्व यूरोप हालवून सोडणारी फ्रेंच राज्यक्रांति ज्या दिवशीं झाली त्या दिवशीं आपल्या डायरींत ''नथिंग'' म्हणजे कांहीं नाहीं असें लिहिलें आहे. फ्रान्सच्या वैभवशाली दरबाराला हा राजा मुळींच शोभत नसे; कॅथोलिक धर्मावर त्याची श्रद्धा होती त्यामुळें पोपला तो मानीत असे; पण त्यामुळें राज्यक्रांतीच्या कालीं त्याच्या संकटांत उलट भर पडली. त्याच्या सर्व धोरणांत दुबळेपणा व खोटेपणा भरलेला होता. राज्यक्रांति झाली ती त्याच्या पूर्वजांच्या दुष्कृत्यामुळें झाली; व हा गरीब बिचारा उगाच बळी पडला असें कित्येकांचें मत आहे.