विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लुसियाना :- उत्तर अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांपैकीं एक संस्थान. क्षेत्रफळ ४८५०६ चौरस मैल व लोकसंख्या (१९१८) १८८४७७८. बॅटन रो हें राजधानीचें शहर आहे. न्यू ऑर्लिअन्स हें संस्थानांतील सर्वांत मोठें शहर आहे. लुसियाना संस्थानांतील शेंकडा ६१ हून जास्त लोक रोमन कॅथोलिक आहेत. शेतकी व यांत्रिक कॉलेज तसेंच लुसियाना स्टेट युनिव्हर्सिटी इत्यादि संस्था उच्च शिक्षणाकरितां आहेत. नीग्रो विद्यार्थ्यांकरितां 'दि न्यू ऑर्लिअन्स युनिव्हर्सिटी' नांवाची युनिव्हर्सिटी आहे. बहिरे आणि मुके यांनां शिक्षण देणार्या संस्थाहि येथें आहेत. प्रमुख शहरीं अनाथगृहें असून, त्यांतून गरीब लोकांनां काम देऊन पोटापाण्याची सोय लावली जाते. याशिवाय संस्थानांत १० रुग्णालयें, २५ अनाथबालाश्रम आणि ३ आंधळे आणि बहिरे यांच्या शाळा आहेत. अनाथ लोकांचें प्रमाण, दर लक्ष वस्तीस ११.३ इतकें आहे. १९३८ सालीं या संस्थानची एकंदर जमा ३५१६६४१७ डॉलर्स आणि खर्च ६९९३५२७ डॉलर्स होता.
लुसियाना हें कृषिप्रधान संस्थान असून, १९२० सालीं ५२७३०१६ एकर जमीन लागवडीस योग्य होती. तांदूळ, कापूस, आणि इतर धान्यें मोठया प्रमाणावर पिकतात. ओट, बटाटे आणि तंबाखू इत्यादिकांचें पीकहि थोडया प्रमाणावर येतें. घोडे, मेंढया, गायी, आणि डुकरें हीं जनावरें मुख्यत्वेंकरून आढळतात. पेट्रोलियम्, गंधक (सल्फर) आणि क्षार हीं द्रव्यें खाणींतून खणून काढण्यांत येतात. १९१५ सालीं १८१९९६९३ डॉलर किंमतीचे खनिज पदार्थ संस्थानांतून बाहेरदेषीं रवाना झाले. साखर करण्याचे, सरकीचें तेल आणि पेंड, गहूं आणि तांदूळ कांडण्याचे पुष्कळ कारखाने आहेत. छापखानेहि अनेक आहेत. कापूस, सरकीचें तेल व पेंड या जिनसांची निर्गत मुख्यत: होतें. १९१६ साली, लुसियाना संस्थानांत ५६०३ मैल लांबीचा आगगाडीचा रस्ता आणि ३२८ लांबीचा विजेच्या गाडीचा रस्ता तयार झाला होता. सन १८१२ मध्यें लुसिंयाना संस्थानचा यूनियनमध्यें प्रवेष झाला. ४१ सभासदांचें वरिष्ठमंडळ (सेनेट) आणि ११५ सभासदांचें प्रतिनिधिमंडळ (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्) असतें. दोनहि मंडळांतील सभासदांची दर चार वर्षांनीं नवी निवडणूक होते. काँग्रेसमध्यें, या संस्थानतर्फे वरिष्ठ मंडळांतील आणि प्रतिनिधिमंडळांतील अनुक्रमे २ आणि ७ सभासद पाठविले जातात.