विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लेले, विसाजी रघुनाथ (१८२७-१८९५) :- एक महाराष्ट्रीय ज्योतिषी. जन्मस्थान नाशिक. काश्यपगोत्री हिरण्याकेशी शाखेचे चित्तापावन ब्राह्मण. लहानपणीं वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत यानीं नाशिक येथें मराठी शाळेंत पूर्णांक-अपूर्णांकाचा अभ्यास केला. आजोळीं थोडासा यांचा संस्कृत अभ्यास झाला. नाशिक येथें खाजगी नोकरीवर कांहीं वर्षे निर्वाह करून पुढें ते ग्वाल्हेरीस पैमाषींत व हिशेबी खात्यांत नोकरीला होते. ३३ वर्षे नोकरी करून शके १८१६ त त्यानीं पेंशन घेतलें व पुढील वर्षीच ते मरण पावले. पंचांग सायनमानाचें असावें असें लेले यांचें ठाम मत असे. ते ग्रहलाघवाच्या साहाय्यानेंच कांहीं वर्षे सायनपंचांग करीत. पुढें नॉटिकल आल्मानेंकवरून करूं लागले. परंतु तें प्रसिद्ध करण्याचा योग कांहीं वर्षे आला नाहीं. इ. स. १८६५ पासून केरूनाना निरयन पंचांग काढूं लागलें. तेव्हांपासून केरोपंतानीं सायनमान स्वीकारावें याबद्दल लेले यानीं 'स्फुटवक्ता अभियोगी' या नांवानें वर्तमानपत्रांतून पुष्कळ वर्षे वाद केला. परंतु केरोपंतानीं तिकडे लक्ष दिलें नाहीं.