विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लोणावळें - मुंबई, पुणें जिल्हा, मावळ तालुक्यांतील एक गांव. बोरघाटाच्या माथ्यावर पुणें शहराच्या वायव्येस ४० मैलांवर हें जी. आय. पी. रेल्वेवर मोठें स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें सहासात हजार . याच्या दक्षिणेस २ मैलांवर पाण्याचें धरण बांधलेलें आहे. त्यायोगानें गांवाला पाण्याचा पुरवठा चांगला झालेला आहे. शहराजवळ ५६ एकर क्षेत्राचें जुने जंगल असून त्यांत सुंदर झाडें आहेत. येथील म्युनिसिपालिटीची स्थापना १८७७ सालीं झाली. लोणावळ्याला रेल्वेचे कारखाने, मिशनरी लोकांची देवळें, मोफत दवाखाने व इंग्रजी-मराठी शाळा आहेत. येथील हवा थंड व चांगली असल्यानें मुंबईहून पुष्कळ लोक उन्हाळ्यांत लोणावळ्यास येऊन रहातात.