विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लोहार - लोकसंख्या (१९११) २०७०३७२. हे लोखंडी काम करतात. यांच्यापैकी ३ लक्ष ६१ हजार लोक मुसुलमान आहेत. यांची सर्वांत जास्त वस्ती संयुक्तप्रांत, बहार-ओरिसा, मुंबई, मध्यप्रांत व वर्हाड इकडे आहे. मुंबई इलाख्यांत यांच्या मराठा, पंचाळ, कन्नड, कोंकणी व गुजराथी या पोटजाती आहेत. नांव व धंदा हीं खेरीजकरून सर्वसाधारण असें त्यांच्यांत कांही नसतें. त्यांचा पिढीजाद धंदा शेतकीची हत्यारें तयार करावयाची व जुनी असल्यास दुरूस्त व नवी करावयाचीं हा असून या कामाबद्दल शेतकर्याकडून त्यांनां धान्याच्या रूपानें 'अलुते' मिळतें. कोठें कोठें त्यांजकडे थोडीशी जमीनहि वहितीस असते. अलीकडे परदेशी मालाच्या स्वस्ताईमुळें त्यांच्या धंद्याला धक्का बसल्यामुळें कांहीं गुजराथी लोहार सोनारकी व कांही सुतारकींचा धंदा करूं लागले आहेत. कानडयांत पुष्कळ लोहार सुतारकीचा धंदा करीत असून कांही शेतकी करून आपली उपजीविका करतात.
मराठे लोहार.- हे आपणाला मनुचे वंशज, विश्वकर्म्याचे पुत्र व देवाचे शिल्पी म्हणवून घेतात. सोलापूर खेरीजकरून त्यांचे व्यवहार बहुधां जातींतच होतात. सोलापुरास या लोकांच्या अखुज, कव्सावाद, कामले, पकलघाट, पखाले, शिंदे व टिंगारे इत्यादि सात पोटजाती आहेत. यांत रोटी-बेटी व्यवहार होत नाहींत. त्यांचे व्यवहार जातींत होत नसल्यामुळें इतर मराठे व मराठे लोहार आडनांवापासून एकमय होऊन गेलेले आहेत. घटस्फोट, पुनर्विवाह व बालविवाह रूढ आहेत. लग्नांतील देवकांत सांडस, चिमटा हातोडा व पंचपल्लवी इतक्या वस्तू असतात. कांही ठिकाणीं लग्नापूर्वी एक दोन दिवसच नवरा जानवें घालण्याला आरंभ करतो. बेळगांव खेरीजकरून बाकीचे लोहार मद्यपी व मांसाहारी आहेत. मराठे, वाणी, माळी व धनगर यांच्या हातचें हे पाणी पितात. कांही लोहार लिंगायतपंथी आहेत. बेळगांव येथील त्यांचा उपाध्याय लिंगायत आहे. इतर लोहार धार्मिक विधीस ब्राह्मण बोलावतात. कांही ठिकाणी लोहार श्राद्धें वगैरें करतात.
कन्नड लोहार किंवा कम्मार.- यांनीं सुतार काम केल्यास आचारी व लोखंडी काम केल्यास लोहार असें म्हणण्याचा तिकडे परिपाठ आहे. त्यांच्यापैकी बहुतेक लोक दक्षिण कोंकण व गोव्याकडील असावे असें त्यांच्या आडनांवरून वाटतें. सरासरी ४० वर्षांपूर्वी त्यांच्यापैकीं कांहीनीं शृंगेरी मठाचे अनुयायी होऊन आपल्या जातींशीं सर्व संबंध तोडून टाकून लोहारांचा तिसरा भेद उत्पन्न केला. या नव्या जातींतल्या लोहारांचें असें म्हणणें आहे कीं ब्राह्मणांप्रमाणें आम्ही गोत्रोत्पन्न आहोंत. मुलीला योग्य नवरा म्हणजे आतेभाऊ होय व ज्यावेळेस आतेबहिणीचें मामेभावाशीं लग्न लागतें त्यावेळेस मुलीची आई मुलीच्या गळ्यांत एक चांदीची साखळी घालते. याचें कारण ज्या कुळांतून आपण (मुलीची आई) उत्पन्न झालों आहों त्याच कुळांत पुनरपि आपली मूलगी जाते हें होय दोन सख्या बहिणीशीं लग्न करतां येतें. हे दुसर्या कोणत्याहि जातीचें अन्न खात नाहीत. त्यांच्या घरी अंबी, मुक्री वगैरे इतर जाती जेवतात. अंकोला येथील कलम्मा नांवाची त्यांची मुख्य देवता आहे. त्यांचे उपाध्याय बहुधां ब्राह्मण जोशी असतात परंतु गोंव्याकडे त्यांच्या जातीपैकींच उपाध्याय असतो. यांच्यांत श्राद्ध करण्याची चाल आहे. यांचे सामाजिक तंटे तोडण्यास ५ महाल नेमले आहेत:- शिवेश्वर, माजालि, कडवाड, कद्र व बांदे. सर्वांत बांदे महाल महत्त्वाचा समजला जातो. प्रत्येकावर १ मुख्य (बुधवंत) असून त्याला १ मदतगार (कोलकार) असतो. अंकोला व माजाली येथें या जातीचे २ मठ आहेत. पंचायतीच्या दंडाचा विनियोग मठाकडे होतो.
कोंकणी लोहार.- यांनां धावड म्हणतात. यांचे बेटीव्यवहार जातीबाहेर होतात मूळच्या स्थानिक अशा त्यांच्या उपशाखा पुष्कळ आहेत. यांचें लग्नदेवक कळंबाचें झाड आहे यामुळें कळंबाचें वाळलेलें लांकूड ते कधीं जाळीत नाहींत. विधी व आचारविचारांत मराठे लोहारांचें व त्यांचें पुष्कळ साम्य असतें.
गुजराथी लोहार- हे पीठवोचे वंशज म्हणून म्हणवीत असून, दंतकथा अशी आहे कीं, पार्वतींनें शिवाच्या पाठीवरच्या विभूतीपासून त्यांनां उत्पन्न केलें. यानां उत्पन्न करण्याचें कारण हत्यारें तयार करणें हें होय. शिवाला 'अंधार' व 'ढंढकार' या दोन राक्षसांनां लढाई करून ठार मारावयाचें होतें व त्याकरितां हत्यारांची आवश्यकता होती. या जातीत भावनगरी, पंचाल, शिरोहिया, सुरती, खंबाती, व परजिया असे सहा भेद आहेत. यांत रोटीबेटीव्यवहार होत नाहींत. याशिवाय काठेवाडांत आणखी सोरठिया, मच्चुकोठिया, व झिल्का असे ३ भेद आहेत. गोत्रांतर विवाहपद्धतीच्या योगानें त्यांच्यांत अनेक उपभेद उत्पन्न झाले आहेत; पैकीं काहींनीं रजपूत घराण्यांतून व राहत्या ठिकाणांवरून आडनांवें घेतली आहेत. पुनर्विवाह प्रचलित नाहीं. परंतु क्वचित दिराशीं लग्न करतात. कच्छ व दक्षिण गुजराथ खेरीज इतर भागांतले लोहार शाकाहारी आहेत. मुख्य देवता भवानी माता असून उपाध्याय औदीच ब्राह्मण होत. हे औदीच ब्राह्मण हलक्या दर्जाचे समजले जातात. कारण ते लोहारांच्या घरीं जेवतात. येथील लोहारांत पुष्कळ उपजाती असून प्रत्येक उपजातीची पंचायत आहे. सभा भरविण्याच्या कामांत पंचांनां बोलावून आणण्याचें वगैरें काम ब्राह्मण उपाध्याय (गोर) याजकडे असतें.
मध्यप्रांतांतील लोहार.- यांच्यांत निरनिराळ्या जातींचें मिश्रण झालेलें आहे व यांचा दर्जा साधारण कमी समजला जातो. इकडे यांनां खाती, घिसाडी, पंचाळ व धांत्रे ही नांवें आहेत. धांत्रे लोहार तर फार हलक्या दर्जाचे समजले जातात. हे लोक आपल्या बायकांचें उष्टे खातात, कारण तिला ते वडील बहीण समजतात. अगारिया पोटजात हीं गोंडांच्या मिश्रणापासून झाली आहे. पंचाळ हे भटके आहेत. घिसाडी लोक स्वत:ला रजपुतांचे वंशज म्हणवितात. ओझा लोक स्वतःला ब्राह्मणाची संतती म्हणवितात. विधवेचें लग्न बापाच्या घरीं होतें. मर्तिकाच्या ११ व्या दिवशीं तांदुळाच्या पिठाची मयताची मूर्ति करून तिच्या तोडांत तांदूळ ठेवून 'जा आणि मनुष्य जन्म घे' असें म्हणून ती नदीत विसर्जन करतात. दुल्हादेव व सोमलाई देवी हे यांचे देव आहेत.
पंजाबी लोहार- या जातींत हिंदु, मुसुलमान, शीख व बौद्ध धर्माचे लोक आहेत. ते सर्व पंजाबमध्यें पसरलेले आहेत. इकडे ही धंद्यावरून बनलेली जात आहे. हे लोहारकीशिवाय शेतकी व शेतांतली मजुरी करतात. इकडील भुवालिया ही लोहारांची एक भटकणारी पोटजात असून ते नेहमीं गांवाबाहेर रहातात ते आपल्यास तुंवर रजपुतांचे वंशज म्हणवितात. परंतु तुंवर रजपूत त्यांचे म्हणणें कबूल करीत नाहींत भुवालिया म्हणतात कीं चितोड पडल्यानंतर आपल्या पूर्वजांनी (चितोड किल्ला आपल्या हातांत परत येईपर्यंत) घरें न बांधण्याची व पागोटें न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. उदेपूरच्या राजघराण्यांनींहि असल्याच प्रकारची प्रतिज्ञा केली होती. हे मारवाडी भाषा बोलतात. आणि खेडयांतल्या लोहारांपेक्षां जास्त वाकबगार असतात. [से रि. (१९११) मुंबई, पंजाब, वगैरे; रसेल व हिरालाल; क्रूक इत्यादि.]