विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लोहारू संस्थान - पंजाबातील एक संस्थान. याचें क्षेत्रफळ २२२ चौरस मैल आहे. लोकसंख्या १९२१ सालीं २०६२१ होती. यांत खेडी ५६ असून लोहारू हेंच राजधानीचें ठिकाण आहे. संस्थानचा मूळ पुरूष अहंमदबक्षखान नांवाचा मोगल सरदार असून १८०३ सालीं अल्मोराच्या राजानें लॉर्ड लेककडे तहाचें बोलणें करण्याकरितां त्याला पाठविलें होतें. ही महत्त्वाची कामगिरी त्यानें चांगल्या रीतीनें बजावल्यामुळें अल्मोराच्या राजानें लोहारू गांव त्याला इनाम दिला व लॉर्ड लेकनें फिरोजपूर परगणा लष्करी नोकरीच्या अटीवर तहाहयात दिला. १८३५ सालीं याचा वडील मुलगा शमसुद्दीनखान यानें मि. फ्रेजर रेसिडेंट याचा खून केल्यावरून दिल्लीस त्याला फांशी दिलें. या कारणावरून फिरोझपूर परगणा जप्त झाला. परंतु लोहारू जहागीर शमसुद्दीनखानाच्या दोन बंधूंकडे राहिली. बंडाच्या वेळीं हे दोघे बंधू अमीनुद्दीन व झैउद्दीन दिल्लीस राहात होते. त्यांच्यावर त्यावेळेला सक्त नजर होती. परंतु पुढें त्यांनां सोडून देण्यांत आलें. १८६९ सालीं अमीनुद्दीनचा मुलगा गादीवर बसला. त्याला नबाबाची पदवी मिळून दत्तक घेण्याचा परवाना दिला. तो १८८४ सालीं वारल्यानंतर नबाब सर अमीरूद्दीन अहमदखान हे गादीवर आले. त्यांनी १९२० साली गादी सोडल्यानंतर त्यांचा मुलगा ऐझुद्दीन हे नबाब झाले. यांनां कॅपटन ही पदवी असून ९ तोफांची सलामी आहे. संस्थानचे उत्पन्न सुमारे एक लाख आहे. लोहारू हें राजधानीचें ठिकाण असून याची लोकसंख्या २००० आहे. येथें एका वेळेला जयपूर संस्थानची टांकसाळ होती. त्यावेळेस येथें लोहार काम करीत होते त्यावरून गांवचें नांव पडलें आहे. लोहारू हें गांव खेडेंवजा आहे परंतु येथें नबाबसाहेबांचा वाडा, दरबारी कचेर्या, दवाखाना, तुरूंग, टपाल व तार ऑफिसें वगैरे आहेत.