विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वक्कलिग - उर्फ वक्कल उर्फ वकलीगर. कानडी मुलुखांतील शेतकी करणार्या जातीपैकीं एक प्रमुख जात. लो. सं. (१९११) १५०७०९३. मुख्य वस्ती म्हैसूर राज्यांत. यांत कांही जैनधर्मीहि लोक आहेत. हे शेतीखेरीज इतर धंदेहि करतात. कोलार, तुमकुर व चितलदुर्ग जिल्ह्यांत या जातीत एकंदर सात पोटजाती आहेत. या सर्व मूळच्या एकाच जातीच्या होत; यांपैकीं कांहीं लिंगायत झाले असून त्यांच्या निरनिराळ्या लिंगायत जातीत बेटीव्यवहार होतो. गंगादिकार ही पोटजात म्हैसूर, हसन व बंगलोर जिल्ह्यांत आढळते. यांची संख्या बरीच असून हे कानडी आहेत. हे पुरातन 'गंगावाडी' प्रान्ताचे रहिवाशी होत. हा गंग राजांच्या मुलुखांतील प्रमुख प्रान्त होता. कांही लोक शैव व कांही वैष्णव आहेत. मोरासु वक्कलिग:- हे कोलार व बंगलोर या जिल्ह्यांत आढळतात. हे लोक ‘मोरासुनाड’ जिल्ह्यांतून इकडे आले. देवनहळ्ळी , दोड्डबाळापूर, मागडी वगैरेचे पाळेगार लोक या पोटजातीपैकींच आहेत. मागडी घराण्यांतील केम्पे गौडा यानें बंगलोर शहर वसविलें. मुसक, रेड्डी, मोरासु वगैरे याच्यांत आणखी पोटभेद आहेत. यांच्यापैकीं कांहीत बेटीव्यवहार होत नाहीं. तेलगू भाषा बोलणार्यांत जांवयास घरीं ठेवून घेऊन त्याला वारस करण्याची चाल बरीच आहे. हा घरजांवई, सासर्यास मुलगा नसल्यास त्याच्या संपत्तीचा पूर्ण मालक होंऊं शकतो. किंवा मुलगा असल्यास हिस्सेदार होऊं शकतो. या लोकांत प्रौढविवाह रूढ असून बहुपत्नीत्वाची चाल कमी आहे. स्त्रीस जन्मभर अविवाहित रहातां येतें. यांच्यांत श्राद्धाची चाल नाहीं, मात्र महालय अमावास्या वर्षप्रतिपदा व गौरीउत्सव या दिवशीं ते पूर्वजांचें पूजन करतात. विधवाविवाहास परवानगी नसून घटस्फोट रूढ आहे. भैरवदेवरू अथवा भंडिदेवरू नांवाच्या देवाची पूजा करून ते शिवभक्ति करतात. कित्येकजण ब्राह्मणांस पुरोहित म्हणून बोलावितात तर कित्येक लिंगायत भिक्षुकांनां किंवा जंगमांनां बोलावतात. 'तिरूनामधारी मोरासु' लोक अंत्यविधीकरितां सतानी लोकांनां बोलावतात. गृहशुद्धीकरतां मात्र ते ब्राह्मणांसच बोलावतात. नोळंबा:- हे लोक परातन नोळंबवाडी प्रांताचे रहिवासी असून लिंगायतपंथी आहेत. रेड्डी:- हे मूळचे तेलगू असून राठ अथवा राष्ट्रकूट राजांच्या प्रजाजनांपैकी आहेत. हळ्ळिकार:- हे लोक गुरें राखतात. हे लोक गुरें राखतात. अमृतमहाल भागांतील जनावरांत याच नांवाचें जनावर उत्तम असतें. साद:- पुरातन कालीं हे लोक सैन्यांत होते. या लोकांत जैन, लिंगायत, शैव व वैष्णव असे सर्व पंथांचे लोक असून ते शेती व धान्याचा व्यापार करतात. पूर्वीचे ते सर्व जैन असावेत. हळ्ळू:- हे कडुर व हसन जिल्ह्यांत रहातात. मोरासु वक्कलिगांप्रमाणे या सर्व पोटजातींचे व्यवहार आहेत. या जातींत सुरापान निषिद्ध मानलें आहे. यांनां नागपूर प्रातांत ओक्किलियान असें म्हणतात, त्या भागांत ते शेतकी करतात. [सेन्सस रिपोर्ट १९२१; ह्मैसूर व मध्यप्रांत].