विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वक्रपाद (बोलेग) - हें एका पायाच्या हाडांत वक्रता असल्यामुळें येणारें शारीरिक व्यंग आहे व यामुळें, मनुष्य दोन्ही घोटे जुळवून उभा राहिला असतां गुडघे एकमेकांस चिकटून रहावे तसे रहात नाहित. सक्थ्यस्थि व बहिर्जांघ या दोन्ही हाडांच्या बाहेरील बाजूस बहुधा बांक आलेला असतो. व कधीं कधीं बहिर्जंघास्थि आंतील बाजूनें वांकलेली असते. खरें म्हटलें तर मूल उपजल्यानंतर थोडे दिवस अशा प्रकारचा बांक थोड्या प्रमाणांत सर्व मुलांनां असतोच. पण ही स्थिति मूल एक वर्षाचें होत आहे तोंपर्यंत हळूंहळूं पालटते. शरीराचा तोल संभाळून चालावयास लागलें म्हणजें तें निरोगी असेल तर या खालच्या सर्व हाडांचे वळण व टणकपणा पूर्णत्वाला येऊन वरील व्यंगाचा मागसूस रहात नाहीं. पण मूल जर हौसेनें किंवा आग्रहानें, हीं वळलेली हाडें सुधारून टणक होण्याच्या अगोदर चालूं लागलें तर ह्या हाडांची वाढच खुंटते अगर ही जी उपजत वक्रता अगर बांक असतो तो वाढत जातो. मूल कोंवळ्या हाडाचें, अशक्त, आजारलेलें किंवा पुरेसें दूध न मिळाल्यामुळें रोड असलें तर या हाडामध्यें जें काठिण्य यावयास पाहिजे तें पूर्णपणें प्राप्त होत नाही. या व्यंगाचें हेंच मुख्य कारण आहे. दुसरीं कारणेंहि आहेत. तीं म्हणजे घोडयांवर बसण्याचा अति व्यायाम करण्यानें चाबूक स्वार, शर्यतवाले इत्यादि धंदेवाल्या घोड्यावर बसणार्यांचे पाय व मांड्या अशा वांकलेल्या असतात.
उपाय.- वर मुलाचीं दुबळी हाडें हें जें कारण सांगितलें. त्यास योग्य अशी पोटांत औषधें देणें व दुधाची नीट व्यवस्थ लावणें यानें रोग सुधारतो, शिवाय ही स्थिति पालटेपर्यंत मुलास अगदीं चालूं देतांहि पण उपयोगी नाही. मुलास चालवत नसलें तरी कित्येक आयांत अशी एक हौस असते की त्यांस कशाच्या तरी आधारानें बळें उभें करावयाचें हेंहि उपयोगी नाहीं. येवढें संभाळलें म्हणजे बहुधां काम भागतें, पण जेथें व्यंग विशेष असतें अशा मुलाच्या पायास भाळ्या बांधून ठेविल्या असतां वरील हेंतु अधिक खात्रीपूर्वक सिद्धीस जातो. मोठया माणसास अपघातानें अगर वर लिहिलेल्या धंद्यामुळें हें व्यंग प्राप्त झालें असेल तर शस्त्रक्रिया करून तें व्यंग दूर करणें हाच एक इलाज होय.
जान्वाघात (नोंक-नी).- या व्यंगामध्यें गुडघे एकमेकांस लागले असतां घोटे मात्र लागत नाहींत व पाय फांकटून उभें रहावें लागतें. अशी माणसें वरील व्यंगापेक्षां अधिक पहाण्यांस येतात. दोन्ही पायांस बहुधां ही विकृति असते पण क्वचित एकाच पायासहि हें व्यंग असतें. यांतहि (१) कोंवळ्या हाडांच्या लहान मुलास होणारें (२) व मोठया माणसास होणारें व्यंग असे दोन भेद आहेत.
उपाय.- मुलांमध्यें हाडें बळकट करण्यासाठी जारीनें उपाय करावेत व त्यांचें खाणें, विश्रांति, इतर व्याधि या सर्व नाहींशा कराव्या. या रोगांत कॉडलिव्हर तेल पौष्टिक म्हणून देऊ नये. कारण मूल धष्टपुष्ट होऊन त्याचें वजन वाढतें व त्या वजनानें कोंवळ्या हाडास अधिकच वक्रता येते. मुलांस खाटेवर निजवून ठेवणेंच बरें. त्याच्या पायास दिवसांतून बर्याच वेळां मालिश करूनच चोळलें पाहिजे. मूल पडून राहिनासें झालें तर भाळ्या बांधून त्याचें चालणें बंद करावें. या भाळ्या काखेपासून अगर कमरेपासून पायाच्या लांबीच्या पुढें चार पाच इंच लांब एवढया असाव्यात, अशा त्या नसतील तर विशेषत: मूल चपळ असल्यास-त्यांचा कांही एक उपयोग होणार नाहीं. त्या हाडांनां पूर्ण व खरोखरीची विश्रांति दीर्घ काळपर्यंत पाहिजे असते. अशा मुलास पुष्कळ मोकळी हवा जेथें खेंळत आहे अशा ठिकाणीं ठेवावें. मोठया माणसामध्यें हें व्यंग बहुधां, जास्त खाणेंपिणें नीटसें मिळत नाहीं पण ओझीं उचलण्याच्या श्रमाचें काम बरेंच पडतें अशा गरीब लोकांत व नोकर मंडळींत विशेषेंकरून आढळतें. विटा पाडण्याच्या मेहनतीच्या कामांत जीं मुलें किंवा अशक्त माणसें पडतात त्यासहि हें व्यंग असतें. मनुष्य उभें राहिलें म्हणजे शरीराचा भार सक्थ्यस्थीस जीं दोन दुबेळकीं असतात त्यांच्यांतील बाहेरच्या दुबेळक्यावरच अधिक पडतो, व आंतील दुबेळक्यावर कमी पडतो आणि गुडघ्याचा सांधा सरळ व समांतर रहावा म्हणून आंतील दुबेळकें जरा लांबट वाढूं लागतें. यामुळें त्या सांध्याचा जो आंतील बंधनदोर असतो त्यावर फार ताण पडतो आणि पुष्कळ वेळ मोठालीं ओझी घेऊन उभें राहिल्यानें मांडीच्या आंतील बाजूच्या स्नायूस फाजील श्रम होऊन ते थकतात व तो बंधनदोरहि ताणल्यामुळें लांब होतो व तो सांधा आंतल्या बाजूसहि वळवितां येऊं लागतो. याकडे लक्ष न जातां अशीच स्थिति पुढें चालू राहिल्यास बाहेरचें दुबेळकें झिजून लहान होऊं लागतें. कारण त्यांवर अधिक भार पडतो व आतील दुबेळकें ताणामुळे लांबट होत जातें. निसर्गाचा असा नियमच आहे कीं, दाब कमी केला असतां अवयवाची वृद्धि होते व तो अधिकाधिक पडला असता झीज होत जाते. यांतील पहिल्या नियमाचें उदाहरण म्हणजे एखाद्या मुलास बर्याच दिवसांचें दुखणें येऊन तो अंथरूणास खिळला असला तरी दुखण्यानंतर त्यास लवकर ताकद येऊन त्याचे अवयव पुष्ट होऊन वृध्दिंगत होतात. दुसर्या नियमांचें उदाहरण श्रीमान चिनी स्त्रिया लोखंडी पट्यांनीं पाय घट्ट बांधून घेत असल्यामुळें त्यांची ती खुरटलेली लहान पावलें हें होय. या व्यंगाबरोबरच पुढें दिलेलीं दोन व्यंगे बहुधां पहाण्यांस येतात. (१) सपाट पाय:- पायास खालीं थोडीशी कमान असते हें सर्वांनी पाहिलेंच आहे पण अशा माणसांत घोटयाच्या सांध्याचीं बंधनें शिथिल झाल्यामुळें ही कमान नाहींशी होऊन पाय भुईवर सपाट व सबंध टेकतो. (२) पृष्ठ वंशाची पार्श्वीय वक्रता:- बहुतकरून एकाच पायास अधूपणा असतां समतोलपणा राखण्यासाठीं ही वक्रता उत्पन्न होते.
उपाय.- मोठया माणसात हें व्यंग उत्पन्न झालें असतां त्याची सर्व शरीरप्रकृति सुधारली पाहिजे. अधू अवयव योग्य तर्हेनें चोळला पाहिजे व रोग्यास हवापालटहि पाहिजे. यांच्या योगानें पाय बरा होतो. व्यंग जुनाट असल्यास कांहीं यांत्रिक उपकरणांची आवश्यकता असते. ती अशी:- पायाच्या बाहेरील बाजूस एक लोखंडी ताठ कांब किंवा पट्टी घेऊन तिला गुडघ्याच्या सांध्याशीं बिजागरीप्रमाणें हलती ठेवून तिच्या वरील टोंक कमरेभोंवतीच्या पट्टयास आणि खालील टोंक बुटाच्या टांचेस याप्रमाणें अचल राहील असें बसावयाचें. मांड्या व पाय यांस ठिकठिकाणीं आंतून मऊ गादी शिवलेले पट्टे असतात; ते प्रथम सैल व नंतर हळूंहळूं कांही दिवसांनीं घट्ट बांधीत गेलें असतां कांही कालानें हीं हाडें हळूहळू जशीं चांगल्या माणसांत असतात तितकीं जरी नाहींत तरी त्याप्रमाणें पुष्कळ सुधारतात. पण फारच जुनाट रोग्यामध्यें असें होणें अशक्य होऊन जातें. कारण हाडें कायमचींच विकृत होऊन बसलेली असतात. अशा ठिकाणीं शस्त्रक्रिया करून विकृत हाडें व बंधनें जेवढी सुधारून घेतां येतील तेवढीं सुधारणें हाच एक इलाज आहे.