विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वज्राबाई - वज्रेश्वरी, मुंबई, ठाणे जिल्हा, भिवंडी तालुक्यांतील एक देवीचें क्षेत्र. या ठिकाणीं पुष्कळ उन्हाळीं आहेत. पाण्याला गंधकाचा वास येतो. दंतकथा अशी आहे कीं देवीनें वज्राबाईचा अवतार घेऊन राक्षसाला ठार मारिलें. देवीचें देवालय उत्तम असून चैत्रांत यात्रा भरते. त्यावेळीं कापड, इमारतीचें लांकूड, गुरें व धान्य वगैरे जिन्नसांचा व्यापार चालतो. जवळच अकोली व गणेशपुरी येथेंहि उन्हाळीं असून तेथील पाण्याची उष्णता १२०० अंश असते या पाण्यांत लोहाचा अंश मुळीच नसून इंग्लंडांतील लिबाथ गांवाच्या पाण्यासारखी या पाण्याला चव असतें. देवीचें देऊळ, वसई काबीज केल्यावर चिमाजीआप्पा पेशवे यानीं नवसाप्रीत्यर्थ बांधविलें.