विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वड - झाडें, झुडपें व चढत्या वेली यांच्या एका वर्गाचें फिकस हें नांव असून त्यांत ६०० जाती आहेत. या वर्गांतील बरीच झाडें. उष्ण हवेंत होतात व यांपैकी सुमारें ११२ जातीचीं झाडें हिंदुस्थानांत आहेत. या झाडांतून दुधासारखा चीक निघतो व त्याचा रबर होतो. अंजीर, उंबर, पिंपळ, वड वगैरे वृक्ष या जातींतील आहेत.
वडाची झाडें मोठीं असून त्यांच्या फांद्यांनां असंख्य पारंब्या फुटतात. हीं झाडें पेशावरपासून आसामपर्यंत हिमालयाच्या पायथ्याशीं असणार्या जंगलांत, बिहार, छोटानागपूर, ओरिसा, मद्रास, मध्यप्रांत, मुंबई इलाखा व दक्षिण हिंदुस्थान या ठिकाणीं आढळतात. छायेकरितां हीं झाडें सर्व हिंदुस्थानभर लावतात. या झाडाच्या चिकापासून हलक्या प्रतीचा रबर करतात व सालीचा काढयाकरितां, पानांचा पोटीस म्हणून व फळें व कोंवळा पाला यांचा दुष्काळांत खाद्य म्हणूनं उपयोग होतो. या झाडाला हिंदु लोक पवित्र मानतात. वटपौर्णिमेच्या (ज्येष्ठ महिना) दिवशीं सुवासिनी स्त्रिया याची पूजा करतात. याच्या चिकांत शेंकडा १२.४ रबर व ८२.२ राळ असते. लाहोरकडे ताम्रभस्म तयार करण्याकरितां या झाडाचा उपयोग करतात. रसाचा उपयोग व्रणावर करतात. मधुमेहावर या झाडाच्या सालींचा काढा पौष्टिक म्हणून उपयोगांत आणतात. याचीं फळें मार्चपासून जूनपर्यंत पिकतात व ती दुष्काळाच्या वेळीं कांहीं लोक खातात. पाला व बारीक फांद्या गुरांनां खावयाला घालतात. या झाडाचें लांकूड पाण्यांत बरेच दिवस टिकतें. पारंब्यांचा उपयोग तंबूचे खांब व गाडीचें जूं करण्याकडे करतात. वडाच्या झाडावर लाखेचे किडे रहातात. वडाचें झाड यज्ञीय वृक्षांत गणलें जातें.