विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वडगांव – (१) मुंबई, महीकांठांतलें लहानसें संस्थान.
(२) मुंबई, पुणें जिल्हा, मावळ तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें पुण्याहून २३ मैलांवर आहे. येथें पोटोबाचें देऊळ व उत्तम तलाव आहे. लोकसंख्या १। हजार. तालुक्याच्या कोर्टकचेर्या आहेत. येथें पेशवे व इंग्रज यांच्यांत मोठें युद्ध होऊन त्यांत येथें इंग्रजांचा सपशेल पराभव झाला (नाना फडणवीस पहा).
वड गांवची लढाई.- फ्रेंचांनां हाताशीं धरून नाना फडणीस आपल्याला पश्चिम किनार्यावरून हांकलून देणार या भीतीनें मुंबईकर इंग्रजांनीं दादासाहेब यानां गादीवर बसविण्यासाठीं पुण्यावर स्वारी केली; तीस हेस्टिंग्ज यानें संमति देऊन मदतीस फौजाहि पाठविल्या. खंडाळ्यावर मराठे व इंग्रज यांची लढाई होऊन तळेगांवी त्यांचा मराठयांनीं पराभव केल्यावर (९ जानेवारी १७७९) ते मुंबईस जाण्यासाठीं परत फिरले, तों मराठी फौजा चोहींकडून धावून त्यांस बिलगल्या व त्यांनीं इंग्रजांचें ५०० माणूस मारून ७ तोफा व २ हजार बंदुका काबीज केल्या. तळेगांवापासून वडगांव गांठण्यास या इंग्रजी फौजेला १ कोसाला ''सबंध रात्र'' (१० तास) लागली, इतका मराठयांनीं त्यांनां मार दिला. वडगांवांत तर त्यांचा पुरा पराभव करून त्यांनीं स्वत:स अत्यंत नामुष्कीचा असा तह केला. नानानीं सांगितलेल्या सर्व अटी त्यांनी कबूल केल्या. दादानां पेशवेसरकारच्या स्वाधीन केलें; साष्टी, जंबूसर वगैरे गुजराथचे महालहि त्यांनां परत दिले; थोरले माधवराव यांच्या वेळीं झालेल्या तहाप्रमाणें चालण्याचें कबूल केलें आणि दोन अंमलदार ओलीस दिले. याप्रमाणें इंग्रजांनीं हा तह केला. इंग्रज ''इतके दमानें आले असतां असें कसें झालें? त्यास मुख्यत्वें श्रीमंतांचें पुण्यविचित्र... चोहोंकडून फोजेचे भार पहातांच छाती तडकली.'' असें पटवर्धनांचा वकील म्हणतो. [पुणें ग्याझे; खरे, भाग ७ ]
(३) कोल्हापूर संस्थानांतील एक गांव. येथें म्यु. कमिटी आहे. सन १८९६ च्या दुष्काळप्रसंगीं एक लक्ष रूपये खर्च करून शहराच्या दक्षिणेस एक धरण बांधून गांवाला पाणी देण्याची उत्तम सोय केली आहे. पूर्वी संभाजी राजे राज्य करीत असतां या गांवी येऊन नेहमीं रहात असत. येथें एक लक्ष्मीचें हेमाडंपती देऊळ आहे.