विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वडनगर - बडोदें संस्थान, कडी प्रांत, खैराळू तालुक्यांतील गायकवाडी रेल्वेचें स्टेशन. लो. सं. १४००० नागर ब्राह्मणांचें मूलस्थान आनंदपूर तें हेंच होय. ह्मुएनत्संग म्हणतो की हें शहर फार भरवस्तीचें होतें. अबुलफजल सांगतो कीं, हें फार मोठें शहर असून आसपास याच्या असलेल्या देवालयांची संख्या ३००० होती व प्रत्येक देवळालगत एक एक तलाव होता. तेथील एका शिलालेखावरून ११५२ सालीं कुमारपाल यानें वडनगर वसविलें असें कळतें. पूर्वी वडनगरास डाकू लोकांचा अड्डा असे अशी प्रसिद्धि होती. गायकवाडांनां कांही कर द्यावा व इकडे पुंडाई माजवावी असा क्रम या लोकांचा चालला होता. हल्लींहि वडनगरचा देखावा फार उत्कृष्ट आहे. हाटकेश्वर महादेवाचें देवालय नागर ब्राह्मणांचें असून शहराच्या पश्चिम बाजूस आहे. देवालयाच्या समोर (मध्यें बेट असलेला) शर्मिष्ठा तलाव असून जवळच मोठमोठे पाषाणस्तंभ असलेली चिरेबंदी चावडीची इमारत आहे. शिवाय देवालयें, धर्मशाळा, दोन विजयस्तंभ आहेत.