विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनस्पतिशास्त्र भाग १
जौकिम जंग (१५८७-१६५७):- हा ल्यूबेक शहरीं जन्मला. यानें वनस्पतींचें झाडें, झुडपें व वनस्पती अशा तर्हेचें वर्गीकरण करणें हे अशास्त्र आहे. असें दाखवून दिलें. तथापि 'शास्त्रात्रूढिर्बलीयसी' असा प्रकार होऊन रेनें आपल्या जंगच्या 'एसोजॉग' या पुस्तकावरून लिहिलेल्या पुस्तकांत तेच विभाग कायम ठेविले. रेचें 'हिस्टोरिया प्लेंटॅरम' हें पुस्तक जंगच्या एसेजॉगवरून तयार केलेलें असल्यामुळें जंगची शरीररचनाविज्ञानाची परिभाषा लिनियसला ठाऊक झाली असली पाहिजे असें वाटतें. म्हणून लिनियस याची 'परिभाषा' जिला म्हणतात ती जंगवरून लिनियसला सुचली असावी असें वाटतें. जंगच्या एसोजॉग या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणांत पाणी आणि वनस्पती यांजमधील भेदाची चर्चा केलेली आहे. 'जंगला सयुक्त पर्ण व फांदी यांजमधील भेद ठाऊक होता ही गोष्ट मोठी आश्चर्यकारक आहे. सेजाल्पिनो आणि जंग यांच्या वनस्पतीवरील लेखनामध्यें जो मोठा फरक आहे तों हा कीं, जंगनें शरीररचनाविज्ञाचा विचार होतां होईल तो स्वतंत्र केला आहे परंतु सेजाल्पिनोनें तसें केलेलें नाही हें पूर्वीच सांगितलें आहे. कॅस्पर, सेजाल्पिनो आणि जंग हे आपआपल्या पिढीमध्यें एकएकच मोठे वनस्पतिशास्त्रज्ञ होऊन गेले. परंतु सतराव्या शतकाच्या शेवटच्या तीस वर्षांत मात्र अनेक वनस्पतिशास्त्रज्ञांकडून महत्त्वाचे कार्य झालें. याच वेळीं पदार्थविज्ञानांत न्यूटनकडून, तत्त्वज्ञानांत लॉक आणि लिब्निट्झ यांच्याकडून, जीवक्रियाविज्ञानांत माल्पिगी आणि ग्र्यू यांजकडून आणि वनस्पतींच्या वर्गीकरणांत मॉरिसन, रे, बॅशमन आणि टूर्नफोर्ट यांजकडून अशी सर्वांगीण शास्त्रीय प्रगति झाली.
रॉबर्ट मॉरिसन (१६२०-१६८३) :- हा ऍबर्डीन शहरीं जन्मला. यानें कॅस्परच्या 'पिनॅक्स' ग्रंथावर टीका केली पण ती अप्रयोजक होती. कॅस्परनंतर 'नातें' लक्षांत घेऊन पुन्हां वनस्पतीचें वर्गीकरण करण्याचा प्रयत्न याच्या हातून झाला. यानें आपल्या वर्गीकरणांत विशेष लक्ष वनस्पतींच्या सामान्य लक्षणाकडे आणि संवयीकडे दिलें आहे. तरी पण हें वर्गीकरण पुष्कळ सदोष असून मॉरिसनचा एकंदरीत दर्जा कास्परच्या खालचा आहे. जॉन रे (१६२८-१७०५) यानें वनस्पतीवर पुष्कळ ग्रंथ लिहिले. परंतु त्या सर्वांत 'हिस्टोरिया प्लँटेरम' हा उत्तम ग्रंथ आहे. हा बहुतेक सर्व ग्रंथ वनस्पतींच्या वर्णनानें भरलेला आहे; परंतु त्याच्या पहिल्या ५८ पानांत वनस्पतींविषयीं सामान्य माहिती दिली आहे. यांत जीवक्रियाविज्ञान, शारीरविज्ञान आणि इंद्रियविज्ञान असे बुद्धिपुर:सर भाग पाडिले नसले तरी त्याजविषयी वेगवेगळे लिहिले असल्यामुळें ते वेगवेगळे ओळखितां येतात. रेनें केलेलें वनस्पतीचें वर्गीकरण पुष्कळ सदोष आहे तरी त्याला एकदल व द्विदलवनस्पती यांजविषयीं कांहीं कल्पना आलेली दिसून येते.
ऑगस्टस बॅशमन (रिव्हिनस) (१६५२-१७२५):- मॉरिसन आणि रे जसे इंग्लंडला किंवा टूर्नफोर्ट फ्रान्सला मार्गदर्शक होते तसा ऑगस्टस जर्मनीला मार्गदर्शक होता. यानें आपल्या सन १६९० च्या 'इट्रोडक्टस युनिव्हर्सालीस रेम हरबेरियम' या ग्रंथांत वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास करण्याची आवश्यकता निदर्शनास आणिली आहे. लिनेयसनें जी पुढें द्विनामपद्धति स्थापिली तिच्याहि समर्थनार्थ यानें लिहिलें आहे. पण असें असून त्यानें स्वत: ती पद्धति उपयोगांत आणिली नाही. फळाच्या पूर्वी फूल येतें म्हणून वर्गीकरणामध्यें फळापेक्षां फुलाचें महत्त्व अधिक असलें पाहिजे असा याचा विलक्षण कोटिक्रम असून त्याप्रमाणें त्यानें फुलाचा आकार समसमान आहे कीं, असमान आहे हें लक्षांत घेंऊन वनस्पतींचे वर्गीकरण केलें.
जोसेफ पिटोन ड टूर्नफोर्ट (फ्रेंच १६५६-१७०८) :- यानें बेंशमनप्रमाणेंच फुलाची आकृति लक्षांत घेऊन वर्गीकरण केलें. याचें वर्गीकरण फार कृत्रिम आहे. याला वनस्पतिशास्त्राचें ज्ञान नसून याचे विचार कोते होते. माल्पिगी आणि ग्र्यू यांचे फूल, फळ आणि बीं यांजविषयींचे शोध त्याच्या वेळीं प्रसिद्ध झाले असूनहि त्याच्या उपयोग त्यानें करून घेतला नाहीं. अशी समजूत आहे कीं, वर्गीकरणांत यानें जाती स्थापिल्या; परंतु यांसंबंधांत फार तर इतकें म्हणतां येईल कीं, याच्यापूर्वी जातींची लक्षणें देण्याची पद्धति नव्हती ती यानें सुरू केली.
कॉर्ल लीनियस (पुढे कार्ल व्हॉनलीन असें नांव पडलें):- यांचा जन्म स्वीडनमधील राशुल्ट शहरीं १७०७ त झाला. याचा बाप पाद्री होता. कोपर्निकसकडून पदार्थविज्ञानांत त्याप्रमाणें लिनियसकडून वनस्पतिशास्त्रांत महत्त्वाचे कार्य झालें. यानें वर्गीकरणाची एक कृत्रिम पद्धति शोधून काढून ती पूर्ण दशेला नेऊन पोहोंचविलीं . ही गोष्ट त्याच्यापूर्वी कोणच्याहि हातून झाली नव्हती यावरून त्याची बुद्धिमत्ता व उद्योगाची चिकाटी दिसून येते. वनस्पतिशास्त्रासंबंधांत लिनियसच्या हातून पुष्कळ कार्य झालें. यामुळें त्याला आधुनिक वनस्पतिशास्त्राचा जनक असेंहि कांहीजण म्हणतात. त्याची बुद्धिमत्ता व चिकाटी ही अद्वितीय असली तरी त्याच्यांत प्रतिभाशक्ति नव्हती असेंच म्हणावें लागतें. याचें प्रसिद्ध वर्गीकरण फुलांतील पुंकेसरांच्या संख्येंवर उभारिलेलें आहे. लिनियसचे परिश्रम जरी मुख्यत्त्वेंकरुन कृत्रिम वर्गीकरणावर झाले तरी त्यानें जे कांही थोडे नैसर्गिक वर्गीकरणासंबंधांत शोध लाविले त्यांचा उपयोग पुढील पिढीच्या शास्त्रज्ञांस नैसर्गिक वर्गीकरणाच्या संबंधांत शोध करण्यास फार झाला. लिनियस हा अतिशय गुणज्ञ असल्यामुळें त्यानें पूर्वी अनेक वनस्पतिशास्त्रज्ञांकडून जें कांहीं झालें होतें त्यांतील महत्त्वाचे कोणतें हें अचूक शोधून काढून आणि आपल्या लेखांत तें स्वीकारून, त्याला व्यवस्थित स्वरूप दिलें; यामुळें वनस्पतिशास्त्राच्या वाङ्मयास मोठा लाभ झाला.
नैसर्गिक वर्गीकरणाची उपजातींच्या सनातनात्वाच्या तत्त्वांच्या अंमलाखालीं वाढ (१७५९-१८५०):- स. १७५० पासून लिनियसच्या परिभाषेचा व द्विनामपद्धतीचा प्रचार सर्वत्र सुरू झाला; आणि जरी वनस्पतिशास्त्रज्ञांचीं मतें लिनियसच्या मतांशी जमलीं नाहींत तरी त्याची वनस्पतींचें वर्णन करण्याची पद्धति मात्र सर्वांनीं उचलली. इंग्लंड, जर्मनी आणि स्वीडन या देशांत लिनियसच्या पद्धतीप्रमाणेंच वनस्पतीचें वर्णन करून वनस्पतिकोश तयार करण्याचें काम वनस्पतिशास्त्रज्ञांकडून अधिकाधिक होऊं लागलें, तें इतकें कीं, त्याशिवाय वनस्पतिशास्त्रांत दुसरें कांहीं करण्याजोगें आहे असें त्यांस वाटेनासें झालें. ज्या मानानें एखाद्यानें अधिक उपजाती गोळा करून अधिक वर्णनें लिहिलीं असतील त्या मानानें तो अधिक मोठा वनस्पतिशास्त्रज्ञ समजला जाऊं लागला. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे 'वर्गीकरणव्यवसायांचा' नुसता सुळसुळाट झाला. आतां सांगितलेल्या प्रकारच्या लोकांत एकोणिसाव्या शतकांतील कांही विद्वान आणि ससिक लोकहि होते. म्हणून अशा लोकांचें लक्ष कृत्रिम वर्गीकरणासारख्या नीरस गोष्टीनें कसें आकर्षून घेतलें वं तिचें त्यांनां इतकें महत्त्व कसें वाटलें याचें मोठें आश्चर्य वाटतें. परंतु एकंदरींत अशा प्रकारापासून वनस्पतिशास्त्राची प्रगति खुंटली व ती तशीच खुंटन राहिली असती परंतु फ्रान्समध्यें वर्गीकरणाच्या अभ्यासाला निराळें वळण लागल्यानें तो प्रसंग टळला. फ्रान्समध्यें लिनियसच्या सुप्रसिद्ध वर्गीकरणपद्धतीला केव्हांहि पूर्ण मान्यता मिळालेली नव्हती. बर्नार्ड डी जुश्यू आणि त्याचा पुतण्या अंत्वां लाँरे डी जुश्यू यांनीं लिनियसनें ज्या नैसर्गिक वर्गीकरणाचें महत्त्व जगाच्या निदर्शनास आणूनहि तें तसेंच ठेविलें होतें त्याच्या अभ्यासावर परिश्रम घेऊन त्याचा परिपोष केला. या वर्गीकरणाचा शोध चालू ठेवणा र्या मनुष्याला केवळ परिश्रम करून सिघ्दि मिळत नसून, ती मिळविण्यास तो प्रतिभासंपन्न असावा लागतो, कारण वनस्पतींतील कमीअधिक 'नातें' ओळखण्याचीं लक्षणें ठाम शोधून काढणें ही कांहीं हलकी सलकी गोष्ट नाहीं. ज्यूश्यू (धाकटा व मोठा), गार्टनर, डील कँडो, रॉबर्ट ब्राऊन आणि याच्यामागून झालेले एन्डलीशेर आणि लिंडलें यांनीं हीं लक्षणें शोधून काढून इतर शास्त्रांप्रमाणेंहि वनस्पतिशास्त्रांत निसर्गांतील गूढ शोधून काढण्यास अवकाश असतो हें जगाच्या निदर्शनास आणू देऊन वनस्पतिशास्त्राची महति (दर्जा) वाढविली हें लिनियसचें हृद्गत ओळखिल्याचा परिणाम होय. ज्यूश्यू वगैरेंनी जरी वर सांगिंतल्याप्रमाणें लिनियसचें हृद्रत ओळखिलें होतें तरी त्याच्याचप्रमाणें त्यांचाहि उपजातीच्या सनातनत्वाच्या तत्त्वावर विश्वास होता. ही गोष्ट अर्थातच नैसर्गिक साम्यावर उभारलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीच्या वाढीला अडथळा करणारी होती. कारण यामुळें नैसर्गिक साम्यांतील गम्य कोणालहहि कळणें शक्य नव्हतें. तथापि कँडोलनें नैसर्गिक साम्यें, वनस्पतींच्या शरीराचा तुलनात्मक अभ्यास करून हुडकून काढून त्यांचीं साम्यें ज्या मानानें कमी अधिक असतील त्या मानानें मांडणी केली. परंतु यांपासून अर्थनिष्पत्ति फारशी झाली नाहीं तथापि या गोष्टीचा अधिक उपयोग करून घेतां यावा म्हणून त्याजविषयी काल्पनिक योजना तयार होऊं लागल्या. उदाहरणार्थ एकेका जातींतील उपजातींच्या काल्पनिक उत्पादकाची शरीररचना अमुक अमुक असली पाहिजे असें वनस्पतिशास्त्रज्ञ कल्पनेनें ठरवूं लागले. परंतु यामुळें वनस्पतिशास्त्राचें शास्त्रीय महत्त्व कमी होऊन त्याजवर कलेची झांक मारूं लागली. नैसर्गिक साम्यांतील रहस्य न कळल्यानें सनातनत्वाच्या तत्त्वाला बाध न येईल अशा प्रकारें काळजी घेऊनच वर्गीकरणाचा शोध चालू ठेवला गेल्यामुळें कांहीं लोकांस उपजातींच्या सनातनत्वामध्यें कांहीं दैवी योजना आहे असें वाटावयास लागून वनस्पतिशास्त्रामध्यें धार्मिक कल्पनांचा चंचुप्रवेश झाला. यामुळें सर्व सजीव सृष्टि ही मूळ एक जीवांचा वंश आहे म्हणून सर्व जीव हे एकमेकांचे नातलग आहेत अशा तर्हेच्या तत्त्वान्वयें नैसर्गिक साम्यांचें समर्थन करणार्यां चे प्रयत्न फलद्रुप होण्याची आशा नाहींशी झाली.
वनस्पतिशास्त्राच्या इतिहासांत वर वर्णिलेला प्रकार चालू असतांहि जुश्यूनंतरच्या वनस्पतिशास्त्रज्ञांकडून वर्गीकरणाच्या कामांत महत्त्वाचे कार्य घडलें. जातींचे मोठे समूह आणि कुलें हीं खात्रीपूर्वक आणि ठाम ठरविण्यांत येऊन त्यांनां लक्षणांनी युक्त करण्यांत आलें. याचप्रमाणें द्विदल व एकदल वनस्पती असे महत्त्वाचे विभागहि एकमेकांपासून भिन्न काढण्यांत आले. गूढलग्न वनस्पती आणि सपुष्प वनस्पती यांजमधील भेदहि अधिकाधिक जाणंवू लागला. परंतु सपुष्प वनस्पतींकडे ज्या दृष्टीनें पहात त्याच दृष्टीनें गूढलग्नवनस्पतींचे परिक्षण करण्याच्या पद्धतीमुळें त्या दोन्हींतील भेद कळण्यास फार अवधि लागला. तथापि या काळाच्या आरंभी वर्गीकरणाची वाढ योग्य मार्गांनीं होण्याच्या कामीं मोठा अडथळा होता तो त्या वेळीं शारीरविज्ञान कोत्या स्थितींत होतें हा होंय. तें तसें असण्याचीं कारणें, त्याची देहांतराच्या तत्त्वावर उभारणी केली असून त्यांत लिनियसच्या चमत्कारिक परिभाषेचा उपयोग केला होता, हीं होत, तथापि वर्गीकरणाच्या संबंधांत एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं मात्र खात्रीपूर्वक प्रगति झाली. ही प्रगति वनस्पतिशास्त्रातं डी कँडोलच्या 'सम:समविभकांगत्वा' च्या तत्त्वाचा प्रवेश झाल्यामुळें झाली. या तत्त्वाची फारशी किंमत कोणास वाटत नाहीं याचें कारण त्या तत्त्वाचें नांव होय. परंतु नांव जितका अर्थ दर्शवितें त्यापेक्षां किती तरी अधिक अर्थ त्यांत भरलेला आहे. हें तत्त्व म्हणजे शरीरविज्ञानाचा तुलनात्मक अभ्यासच होय, आणि असा प्रकारच्या अभ्यासाचा यशस्वी प्रयत्न जंगनंतर डी कँडोलकडून प्रथम झाला. १८१३ मध्यें या तत्त्वाच्या आधारें शरीरविज्ञानासंबंधी (आतां सर्व वनस्पतिशास्त्रज्ञांच्या परिचयाच्या) अनेक खर्या गोष्टी शिकविल्या गेल्या. परंतु या काळच्या वर्गीकरणव्यवसायामध्यें एका गोष्टीची उणीव भासत होती. ही उणीव म्हणजे वनस्पतींच्या वर्धनेतिहासासंबंधीचें त्याचें अज्ञान होय. एकटया राबर्ट ब्राऊनला मात्र त्यांसंबंधी कांहीं ज्ञान होतें. शरीरविज्ञानाच्या आणि वर्गीकरणाच्या या काळाच्या इतिहासावरून असें दिसून येतें कीं, पूर्ण वाढलेल्या निरनिराळ्या देहांचें तुलनात्मक परीक्षण झाल्यामुळें शरीरविज्ञानांतील पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला. परंतु यासंबंधांत याहीपेक्षां अधिक कार्य होण्यास निरनिराळ्या देहांचें-ते वाढतांना ज्या अवस्थांतून जातात त्या अवस्थाचें-तुलनात्मक परीक्षण व्हावयास पाहिजे होतें. एकंदरींत या काळीं शरीरविज्ञानाचा अभ्यास पूर्ण वाढ झालेल्या वनस्पतींच्या परीक्षणानें झाला आणि जरी वनस्पतींच्या वाढीच्या अवस्थासंबंधी कांहीं माहिती होती तरी तिचा उपयोग करून घेतां आला नाहीं, कारण तसा उपयोग करून घेतां येण्यास मोठया शक्तीच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची आवश्यकता होती. परंतु अशी सुक्ष्मदर्शक यंत्रें १८४० नंतर तयार होऊं लागून मग वर्धनेतिहासाच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष पुरविणे शक्य झालें. एकंदरीत या काळांत पुढीलप्रमाणें गोष्टी घडून आल्या: उपजातींच्या सनातनत्वाच्या तत्त्वाच्या अंमलाखालीं नैसर्गिक साम्यें शोधून काढिलीं गेलीं, वर्धनेतिहासाच्या मदतीशिवाय तुलनात्मक शरीरविज्ञानाचा अभ्यास झाला आणि गूढलग्नवनस्पतीच्या अभ्यासाची हयगय झाली.
येथपर्यंत या काळांत वर्गीकरण आणि शरीरविज्ञान यासंबंधांत वनस्पतिशास्त्रज्ञांकडून काय काय प्रयत्न झाले यांचें सामान्य विवेचन झालें. यानंतर त्यासंबंधी जे वैयक्तिक प्रयत्न झाले त्यांजविषयी लिहावयास सुरवात करण्याच्या अगोदर हें सांगितलें पाहिजे कीं, लिनियसच्या प्रथम हें लक्षांत आलें कीं, सेजाल्पिनोच्या पद्धतीनें नैसर्गिक वर्गीकरण करतां येणें शक्य नाहीं. त्याचप्रमाणें त्यानें स्वत जरी कृत्रिम पद्धति पूर्णत्वाप्रत नेण्याच्या कामीं अत्यंत परिश्रम करून यश मिळविलें तरी त्यानें ६०-७० नैसर्गिक वर्गहि स्थापून त्यांनां लाक्षणिक नांवें दिलीं. बर्नार्ड डी जुश्यू हा लिआँझ या शहरी जन्मला. याच्या हातून वर्गीकरणाच्या संबंधांत वनस्पतीनां नांव देण्यांत आणि त्याची क्रमवारी लावून विभाग पाडण्यांत कांहीं सुधारणा झाली. हा ट्रियाननच्या सरकारी उद्यानाचा अध्यक्ष होता. तेथें त्यानें वर्गवार झाडें लाविलीं.
नैसर्गिक वर्गीकरणांत एकदम ज्याच्या हातून पुष्कळ सुधारणा झाली तो आंत्वां जुश्यू (१७४८-१८३६) हा होय. यानें नैसर्गिक पद्धति शोधूनहि काढिली नाहीं किंवा स्थापिलीहि नाहीं परंतु त्याच्या हातून महत्त्वाचे कार्य झालें तें त्यानें लहान विभागांनां (ज्यांनां हल्ली आपण कुलें म्हणतो तें; परंतु यांनां तो वर्ग म्हणत असे) लक्षणांनीं युक्त केलें हें होय. कुलांनां लक्षणें दिलीं त्यांत त्यानें एवढें महत्त्वाचे कार्य केलें असें वाटण्याचा संभव आहे. पण त्यासंबंधांत इतकें ध्यानांत घेतलें पाहिजे की, ती गोष्ट सोपी नसून ती करण्यास त्याला फार परिश्रम घ्यावे लागले. जुश्यूचें आणि लिनियसचें अशीं दोन्हीं वर्गीकरणें पाहिलीं असतां, ज्या विभागाला लिनियस गूढलग्न असें म्हणतो त्यालाच जुश्यू अदल म्हणतो असें दिसून येतें. जुश्यूनें जिनेरा प्लँटोरम नांवाचा ग्रंथ तयार केला. हा ग्रंथ होण्यापूर्वी गार्टनरचे डी फ्रुक्टिबसएट सेनिबस प्लँटोरम नांवाचें पुस्तक प्रसिद्ध झालें असून त्याची जुश्यू यास आपला ग्रंथ तयार करण्याच्या कामीं मदत झाली.