विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनस्पतिशास्त्र भाग २
जोसेफ गार्टनर (१७३२-१७९१):- हा जर्मनींतील वुर्टेबुर्ग संस्थानात जन्मला. हा मोठा वनस्पतिशास्त्रज्ञ असून याला प्राणिशास्त्र आणि सृष्टिशास्त्र हीं अवगत होतीं. हा टुबिजेन व पीटर्सबर्ग या ठिकाणीं वनस्पतिशास्त्राचा अध्यापक होता. यानें आपल्या वर निर्देश केलेल्या ग्रंथांत एक हजारापेक्षां अधिक उपजातींतील फळांचीं व बियांचीं सचित्र वर्णनें दिली आहेत. परंतु त्यानें त्यांत वनस्पतींतील लिंगासंबंधानें जे विचार प्रदर्शित केले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. या विषयांत पूर्वी कॅमेरारियस (१६९४) आणि कोएलरूटर (१७६१) यांनीं शोध केला होता; आणि गार्टनरनें शोध करीपर्यंत तो तसाच राहिला होता. गार्टनरयानें जो फळें आणि बिया यांसंबंधी शोध केला त्यांत त्याचें अंतिम ध्येय नैसर्गिक वर्गीकरणाची सेवा होतें. परंतु त्यासंबंधांत त्यानें घाई न करतां केवळ बीं आणि फळ यांजकडेच चांगलें लक्ष पुरविलें, कारण नैसर्गिक वर्गीकरण केवळ बियावर आणि फळावर उभारितां येणार नाहीं हें जरी त्याला चांगलेंच ठाऊक होतें तरी त्यांचा त्या कामांत पुष्कळ उपयोग होणार होता अशी त्याची खात्री होती. श्मिडेल आणि हेडविग यांचे शेवाळांसंबंधीं शोध जरी गॉर्टनरच्या पूर्वीच होऊन गेले होते तरी गूढलग्नवनस्पतींच्या पुनरुत्पत्तीच्या इंद्रियासंबंधीं अद्याप केवळ अंधुक कल्पना मात्र होती. सपुष्प वनस्पतींतील बीजांत भारी वनस्पतीचा अंकुर असतो परंतु गूढलग्न वनस्पतींत जे बीजासारखे रेणू असतात त्यांत मात्र असा अंकुर नसतो, या गोष्टी दाखवून वरील अंधुक कल्पनेवर गार्टनरनें कांहीं प्रकाश पाडला.'
वरील प्रमाणें प्रगतिकारक उत्तम उत्तम नवीन गोष्टी गॉर्टनरच्या पुस्तकांत असूनहि त्याच्या पुस्तकाला जर्मनींत मान्यता मिळाली नाहीं. तीस वर्षापूर्वी कोलरेटेलच्या उत्तम शोधासंबंधांतहि अशीच स्थिति झाली होती. जॉन जॉर्ज कार्ल बाथ (जेना येथील अध्यापक) व कर्ट स्प्रँगल (१७६६-१८३३ हेल येथील वनस्पतिशास्त्राचा अध्यापक) वगैरेंच्या सारख्या कांही थोडक्या लोकानां गॉर्टनरच्या शोधांचें महत्त्व कळलें होतें परंतु हे शोध डी कौडोल आणि राबर्ट ब्राउन यांच्या हातून वर्गीकरणांत बरेचसें कार्य झाल्यानंतर पुढें आलें.
ऑगस्टिन पिराम डी कौडोल (१७७८-१८४१):- हा एकंदरीत मोठा शास्त्रज्ञ होता. यानें वनस्पतिशास्त्राच्या सर्व उपांगांत शोध केला. परंतु त्याच्या हातून शारीरविज्ञान आणि वर्गीकरण या उपांगांत महत्त्वाचे कार्य घडलें. त्यानें निरनिराळ्या वनस्पतिकुलांवर (विशिष्ट विषयक) ३२ निबंध लिहिले. वर्गीकरणाच्या कामांत जरी याच्या हातून पुष्कळ कार्य झालें तरी याचा महत्त्वाचा ग्रंथ थिअरी मेंटर ड ला वॉटनिक ऑन एक्स्पोझिशन डीज प्रिन्सिपल्स ड ला क्लासिफिकेशन नॅचरल एट ड लार्ट डेयरेट डीक्टडियर लेस व्हेजेटेक्स (वनस्पतिशास्त्राच्या मूलतत्त्वाचें सोपपत्तिक विवेचन अथवा नैसर्गिक वर्गीकरणाच्या तत्त्वांचें आणि वनस्पतीच्या वर्णनपर अभ्यासाचें आविष्करण) हा होय. हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हें त्याच्या नांवावरून कळण्याजोगें आहे. डी काँडोलाच्या हातून वर्गीकरणाच्या कामांत कांहीं विचित्र चुका होऊन त्यामुळें वर्गीकरणाची कांहीं बाबींत पिछेहाट झाली. याचें एक उदाहरण पुढीलप्रमाणें आहे:- डि स्फॉटेनसला अनुसरून द्विदल व एकदल वनस्पतींनां त्यांचा घेर वाढण्याच्या संबंधांत त्यावेळीं जी कल्पना होती तिजवरून डी काँडोला यानें अंतर्वधी व बहिर्वर्धी अशीं नावें दिलीं. याचा परिणाम द्विदलवनस्पतींच्या विभागाप्रमाणें एकदल आणि गूढलग्नवनस्पती मिळून एक स्वतंत्र विभाग होण्यांत झाला. डी काँडोलाच्या लेखनांत 'समवंशाच्या' तत्त्वाच्या समर्थनार्थ पुष्कळ विवेचन आढळून येतें, तरी चमत्कार हा आहे की तो उपजातींच्या सनातनत्त्वाच्या तत्त्वाचा पूर्ण अनुगामी होता.
डी काँडोलानें स्थापिलेलीं तुलनात्मक शारीरविज्ञानाचीं तत्त्वें जर्मनीतील वनस्पतिशास्त्रज्ञांस आरंभी मान्य नव्हतीं. कारण त्यांजवर गटेच्या देशांतराच्या तत्त्वाची छाप बसून त्यांची ज्ञान दृष्टी मंद झाली होती. परंतु हळूहळू डी काँडोलाचे विचार त्यांच्या पसंतीस उतरूं लागले. १८३० नंतर तर त्यांच्या नैसर्गिक पद्धतीचा इंग्लंड व फ्रान्स देशांप्रमाणेंच जर्मनीतहि अभ्यास होऊं लागला. इतकेंच नव्हे तर एकदा जर्मनींत तशा प्रकारच्या अभ्यासाला सुरवात झाल्यावर त्यासंबंधी त्या देशांत इंग्लंड व फ्रान्सपेक्षांहि अधिक उत्साह उत्पन्न झाला, असेंच कांहीसें राबर्ट ब्राऊन (१७७३-१८५८) च्या संबंधांतहि झालें. कारण त्याचेहि चहाते इंग्लंडपेक्षां जर्मनींतच अधिक होते. राबर्ट ब्राऊननें १८०१-०५ पर्यंतचा काळ ऑस्ट्रेलियांत घालविला. या अवधींत त्यानें तेथील वनस्पतीचा अभ्यास केला. या शिवाय त्याने पुष्कळ निबंध लिहून इतर वनस्पतिशास्त्राज्ञांनीं ध्रुवप्रदेश व उष्णकटिबंधांतील प्रदेश यांतील वनस्पतीसंबंधी जे शोध लावले होते त्यांजविषयीं माहिती त्यांतून प्रसिद्ध केली. यामुळें त्याच्याकडून सुप्रसिद्ध हम्बोल्डप्रमाणेंच भूगोल आणि वनस्पतिशास्त्र यांची सांगड घालून देण्याच्या कामी साहाय्य झालें.
राबर्ट ब्राऊननें सोपपत्तिक असा एखादा ग्रंथ जरी लिहिला नाहीं तरीं फुलांच्या रचनेसंबंधानें त्यानें पुष्कळ शोध केला. यामुळें त्याला तृण, आर्किड व अर्क (रूई) वगैरे वनस्पतीचें बरोबर वर्गीकरण करतां आलें. परंतु राबर्ट ब्राऊनकडून सर्वांत महत्त्वाची जी गोष्ट झाली ती सपुष्प वनस्पतींतील अंडी (भावी बीजें) यांजविषयीं त्यानें पूर्ण शोध केला ही होय. कांहीं बीजांत जो एंडोस्पर्म म्हणून पदार्थ असतो त्याचा बीजाला काय उपयोग असतो हें त्यानेंच प्रथम ताडिलें. सायकास या वनस्पतींत ज्याला 'स्त्रीफूल' म्हणतात ते नग्नबीज होय असें त्यानें ओळखिल्यामुळें पुढें नग्नबीज आणि गूढबीजवनस्पती असे सपुष्प वनस्पतींचे दोन मोठे विभाग पडण्याच्या कामीं मदत झाली. परंतु हें काम पुरें झालें तें २५ वर्षानंतर हॉफमेइस्टरच्या शोधामुळें झालें, राबर्ट ब्राऊनला जर्मनीत फार मान्यता मिळाली. निरनिराळ्या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांनी भाषांतर केलेले त्याचे लेख १८२५-३४ च्या दरम्यान छापले गेले. एकंदरीत जर्मनीमध्यें जो नैसर्गिक वर्गीकरणाचा अभ्यास सुरूं झाला त्याचें बहुतेक श्रेय राबर्ट ब्राऊन आणि डी. काँडोला यांनां आहे.
शारीरविज्ञान, वनस्पतींच्या नागमोड्या वळणाचें व देहांतराचें तत्त्व (१७९०-१८५०):- आरंभीं हें सांगितलें पाहिजे कीं वरील दोन्हीं तत्त्वामुळें शारीरविज्ञानाच्या प्रगतीस विशेष मदत झाली नाहीं. त्यामुळें व विशेषत: देहांतराच्या तत्त्वामुळें वनस्पतिशास्त्रांत भ्रामक अतएव निरूपयोगी वाङ्मयाची भर पडली. तथापि त्या तत्त्वाचा बोलबाला फार होऊन निदान थोड्यातरी उपयुक्त कल्पनांची वनस्पतिशास्त्रांत भर पडली आहे हें कबूल केलें पाहिजे. या तत्त्वांचें विवरण येथें थोडक्यांत करण्याचें योजिलें आहे.
जुश्यू डी काँडोला आणि राबर्ट ब्राऊन यांचे प्रयत्न निरनिराळ्या उपजातींचे तुलनात्मक परीक्षण करून त्यांतील नातें (नैसर्गिक साम्य) शोधून काढण्याच्या दृष्टीनें झाले; परंतु गटेच्या तत्त्वाचा उद्देश एकाचवनस्पतीतील निरनिराळ्या इंद्रियांचा परस्परसंबंध किंवा नातें ओळखण्याचा होता. ज्याप्रमाणें डी कँडोलनें आपल्या सम:समविभागत्वाच्या तत्त्वानुसार एक मूळ किंवा मध्यवर्ती आकृति कल्पिली, त्याचप्रमाणें देहांतराच्या तत्त्वाचा प्रयत्न वनस्पतीचा मूळ एकेंद्रिय देह कल्पून इतर इंदियें ही त्याचीं भिन्न स्वरूपें आहेत हें सिद्ध करण्याचा होता. एका जातींतील दोन उपजातींचें निरीक्षण केल्यामुळें ज्याप्रमाणें त्यांतील नैसर्गिक साम्य वनस्पतिशास्त्रज्ञांच्या सहज ध्यानांत आलें, त्याचप्रमाणें फुलाच्या पाकळ्या, बियांचीं दलें वगैरे पानासारखीं असतात या गोष्टी सेजाल्पिनो, माल्पिगी वगैरेंच्या ध्यानांत आल्या होत्या. कॅस्पर फ्रेड्रिक वुल्फ यानें याविषयी पद्धतशीर विचार करून १७६६ त असें मत दिलें होतें कीं, वनस्पतींत केवळ बुंधा आणि पान हीं दोन मुख्य इंद्रियें आहेत. मूळाचा समावेश त्यानें बुंध्यांत केला होता.
वनस्पतींच्या निरनिराळ्या इंद्रियांमध्यें स्वरूपसाम्य असतें त्याची उपपत्ति लावण्याचे प्रयत्न गटेच्यापूर्वीं झाले होते; परंतु त्या संबंधांत त्यावेळीं कांहीं महत्त्वाचे निष्पन्न न झाल्यामुळें त्यांचा विचार करण्याचें कारण नाहीं. गटेच्या देहांतरांच्या तत्त्वानें इंद्रियांमधील स्वरूपसाम्याची उपपत्ति लावितां येते; परंतु गटेनें या तत्त्वाची मांडणी तर्कशास्त्राला अनुसरून न केल्यामुळें त्यापासून परस्परविरोधी सिद्धांत निघूं शकतात. गटे हा उपजातीच्या सनातनत्वाचा पुरस्कर्ता होता. म्हणून गटेच्या म्हणण्याप्रमाणें पानें, पाकळ्या, दलें इ. एकाच इंद्रियाचीं भिन्न स्वरूपें मानिली असतां, उपजातींच्या सनातनत्वाचें तत्त्व खोटें ठरतें. परंतु तेंच हीं इंद्रियें एका काल्पनिक मूळ इंद्रियाचीं काल्पनिक भिन्न स्वरूपें आहेत असें मानिलें असतां देहांतराचें तत्त्व जीवशास्त्राच्या दृष्टीनें कवडीमोल ठरतें.
वनस्पतींच्या नागमोड्या वळणाच्या (गतीच्या) तत्त्वाचा पुरस्कारहि प्रथम गटेनेंच केला. या तत्त्वाची उभारणी, बरोबर उपपत्ति न समजलेल्या गोष्टीवर गटेनें केल्यामुळें काल्पनिक तत्त्वज्ञानाचा वनस्पतिशास्त्रांत निष्कारण सुळसुळाट माजला. हें तत्त्व गटेनें वनस्पतींत नागमोड्या शिरा असतात; वेलींचीं प्रतानें नागमोडी वळणें घेऊन आधाराभोंवतीं गुंडाळतात वगैरेंसारख्या क्षुल्लक गोष्टींवर केली होती. गटेच्या या तत्त्वापासून जें निष्पन्न झालें तें स्किंपर आणि ब्राऊन इत्यादि वनस्पतिशास्त्रज्ञांकडून बुंध्याच्या पृष्ठभागावरील मांडणीची चांगली पहाणी होऊन त्याजविषयींच्या माहितीची व नियमांची वनस्पतिशास्त्रांत भर पडली इतकेंच होय. आतांच सांगितलेला अलेक्झांडर ब्राऊन हा मोठा तत्त्वशास्त्रज्ञ असून वनस्पतिशास्त्रांत यानें संजीवन, पुनयौंवन वगैरेसारख्या कल्पनांचा शिरकाव करून देऊन वनस्पतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांची सांगड घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याचा येथें विचार करण्याचें कारण नाहीं. गूढलग्नवनस्पतीसंबंधी ज्ञान आणि वर्धनेतिहास यांच्या अंमलाखालीं शरीरविज्ञानाची आणि वर्गीकरणाची वाढ:- इ. स. १८४० च्या पूर्वी थोड्या वर्षांपासून वनस्पतिशास्त्राच्या शरीरविज्ञान, जीवक्रियाविज्ञान इत्यादि सर्व उपांगात मोठया उत्साहानें शोध होण्यास सुरवात झाली. या वेळेपासून गर्भावस्थाविज्ञान आणि लिंग यांच्या अनुरोधानें शरीरविज्ञानांत शोध सुरू झाला. सपुष्पवनस्पतींचा जसा आजपर्यंत आस्थापूर्वक अभ्यास वनस्पतिशास्त्रज्ञांकडून झाला तसाच तो आतां उच्च गूढलग्नवनस्पती आणि नीचगूढलग्नवनस्पती यांच्या संबंधांतहि होऊं लागला. वर्धनेतिहासासंबंधी शोध करणें, हें काम व्हान मोलनें शरीररचनाविज्ञानाच्या अभ्यासास पुन्हा गति दिल्यानें नागेलीच्या पेशीविषयक शोधानें शक्य झालें परंतु व्हान मोलला व नागेलीला या गोष्टी सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेंच करता आल्या. सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग वनस्पतिशास्त्रांत होऊं लागल्याचा परिणाम प्रगतिकारक झाला. कारण त्यामुळें वनस्पतींतील पुष्कळ गोष्टींविषयीं प्रत्यक्षज्ञान मिळविण्याचें साधन उपलब्ध होऊन ज्ञानपिपासा केवळ कल्पना करून भागविण्याचें कारण उरलें नाहीं. यामुळें वनस्पतिशास्त्रांत उत्तरोत्तर उत्तम शोधांची भर पडली. व्हान मोल, श्र्लीडेन आणि नागेली यांनीं जरी प्रत्यक्ष ज्ञान मिळविण्याचें अंगिकरिलें होतें तरी शोधांची उपपत्ति लावण्याकडे त्यांचें लक्ष नव्हते असें नाही.मात्र शोधां उपपत्ती लावून सामान्य सिद्धांत काढण्याची त्यांची पद्धति काल्पनिक नसून शास्त्रीय होती; अनेक प्रत्यक्ष पुरावे गोळा करून त्यांच्या भक्कम पायावर सिद्धांत उभारण्याची त्यांची पद्धति होती. असें असल्यामुळें ते जरी उपजातींच्या सनातनत्वाच्या तत्त्वाचे अनुगामी होते, तरी 'सर्व जीवांचा पूर्वज एकच आहे' या तत्त्वाकडे त्या संबंधी डार्विनचा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वीच-त्यांचा कल होता; तो इतका कीं, डार्विनचा ग्रंथ प्रसिद्ध झाल्याबरोबर ते 'सर्व जीवांचा पूर्वज एकच आहे' या तत्त्वाचे चहाते झाले. हॉफमीस्टरच्या 'शरीरविज्ञान आणि गर्भावस्थाविज्ञान' यांतील महत्त्वाच्या शोधांमुळें वनस्पतिकोटींतील मोठमोठया विभागांचे परस्पर नात्याचे संबंध कशाप्रकारचे आहेत हें चांगल्या प्रकारें उघडकीस आलें. परंतु वनस्पतिकोटी सांप्रतच्या स्थितीप्रत उत्क्रांति किंवा विकास होऊन आली आहे हें वनस्पतींच्या अवशेषांच्या अभ्यासामुळें वनस्पतिशास्त्रज्ञांच्या लक्षांत आलें. स्टर्नबर्ग, ब्राँगनिअर्ट, ओपर्ट आणि कार्डा यांनीं अवशेषस्थितींत सांपडणार्या प्राचीन वनस्पतींचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यांची हल्ली अस्तित्वांत असणार्या वनस्पतींशी तुलना केली. यासंबंधांत उंगेर यानें अत्यंत परिश्रम घेऊन अभ्यास केला आणि १८५२ त असें ठाम मत दिलें कीं, उपजातीचें स्थैर्य ही खोटी गोष्ट असून जुन्या उपजातींपासून नवीन उपजाती उत्पन्न झाल्या आहेत. आलेक्झांडर ब्रॉनचेंहि यापूर्वी असेंच मत झालें होतें, पण तें इतकें स्पष्ट नव्हतें. ज्यावर्षी डार्विनचें 'उपजातीची उत्पत्ति' हें पुस्तक प्रसिद्ध झालें त्यावर्षी नागेलीनें 'बिट्राज' मध्यें पुढील उद्गार काढिले होते:- ''पृथ्वीच्या इतिहासाच्या निरनिराळ्या काळांतील वनस्पतींची तुलना, शरीरविज्ञानाच्या आणि जीवक्रियाविज्ञानाच्या दृष्टीनें केलेला अभ्यास, व उपजातीचें रूपांरतक्षमत्व या गोष्टींवरून हेंच सिद्ध होतें कीं, उपजातींची उत्पत्ति उपजातींपासूनच झालेली आहे.'' या शब्दांत जरी, ज्यापासून अधिक शोध करण्यास उपयोग झाला असता अशी शास्त्रीय 'समवंशाचें तत्त्व ' गोविलेलें नाहीं तरी त्याजवरून त्या वेळचे वनस्पतिशास्त्रज्ञ जातींच्या सनातनत्वाचें तत्त्व सोडून देण्यास कसे उद्युक्त झाले होते हें दिसून येतें. इ. स. १८४४ नंतर नागेलीच्या देखरेखीखालीं शरीरविज्ञानाच्या ज्या प्रकारच्या अभ्यासानें वनस्पतींतील नातें ओळखितां येईल त्याप्रकारचा अभ्यास झाला आणि हॉफमीस्टरनें अत्यंत उपयुक्त अशा गर्भावस्थाविज्ञानमध्यें शोध केला. या दोन गोष्टींचा परिणाम, विकासासंबंधानें डार्विननें जे सिद्धांत काढिले होते ते दुरूस्त होऊन त्यांत भर पडण्यांत झाला. डार्विनच्या मूळच्या म्हणण्याप्रमाणें जीवांचा सृष्टीला असह्य भार हें जीवनार्थ कलहाचें कारण होय. जीवनार्थ कलह, जीवांमध्यें ज्या मानानें अधिक जवळचें नातें असतें त्या मानानें अधिक असतो. जीवनार्थ कलहामध्यें अधिक बलवान जीवांचा निभाव लागून ते जगतात व इतर मरतात. म्हणजे जगण्याकरितां सृष्टीकडून आधिक बलवान जीवांची निवड होते. म्हणून सृष्टीची निवड हें जीवांमध्यें सृष्टिक्रमानुसार पालट होण्याचें कारण आहे. परंतु नागेलीनें जर्मनांच्या शारीरविज्ञानांतील शोधांचा पुरावा घेऊन इतक्या लवकर (१८६५) हें दाखवून दिलें होतें कीं, जरी वरीलप्रमाणें सृष्टीच्या निवडीच्या तत्त्वानें उत्क्रांति किंवा विकासवादाचें समर्थन होतें तरी सृष्टीची निवड हेंच कांही उपजातींच्या रूपांतराचें कारण नसून उपजातींमध्यें तशा प्रकारची शक्ति निसर्गत:च असते. याप्रमाणें नागेलीकडून दोन उपजातींतील शरीरसाम्याबरोबर क्रियासाम्यहि असलेंच पाहिजे असें नाहीं, हें दाखविलें जाऊन समवंशांचें तत्त्व हल्लींच्या स्थितीप्रत आणण्याच्या कामी साहाय्यक झालें. या काळांत पेशीविज्ञान, इंद्रियविज्ञान, गर्भधारणा, गर्भावस्थाविज्ञान या विषयांच्या अनुरोधानें वर्गीकरण आणि शारीरविज्ञान यांचा अभ्यास होऊं लागल्यानें या प्रत्येक विषयांतील शोधामुळें वर्गीकरण आणि शारीरविज्ञान यांची प्रगति कसकशी झाली हें वेगवेगळें सांगणें कठिण असून गूढलग्नवनस्पतींच्या शरीरविज्ञानाच्या आणि वर्गीकरणाच्या संबंधांत तर तें केवळ अशक्य आहे. म्हणून पुढें या सर्व गोष्टींविषयीं सामान्य आणि एकत्र विचार केला आहे.
इसवी सन १८४० च्या सुमारास वनस्पतिशास्त्रविषयक वाङ्मयाची स्थिति असमाधानकारक होती. या काळांत व्हान मोलचे उत्तम ग्रंथ तयार झाले; त्याचप्रमाणें मेयो, टुट्रोक्ट, लुडॉल्फ, ट्रेव्हिरानस इत्यादीनींहि शारीरविज्ञान, जीवक्रियाविज्ञान आणि इंद्रियविज्ञान यांविषयीं पुष्कळ लिहिलें हेंहि खरें आहे. परंतु वनस्पतिशास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीनें, वरील सर्व विषय प्रथित करून आजपर्यंत त्या शास्त्रांत काय काय झालें आहे हें दाखविण्यार्या पुस्तकाची अत्यंत अवश्यकता होती. कारण अशा पुस्तकाशिवाय नूतन विद्यार्थ्यास वनस्पतिशास्त्राची अभिरूचि कशी लागणार? त्याचप्रमाणें अशा पुस्तकाशिवाय वनस्पतिशास्त्राची इतर शास्त्रांशीं तुलना कशी करावयाची? परंतु ही अडचण श्लीडेनच्या 'दायबोटॅनिक अल्सईडक्टिव्ह विझेन्शाफ्ट' या ग्रंथानें भरून निघाली. हा श्लीडेनचा ग्रंथ केवळ मिळमिळीत पाठ पुस्तक नसून झणझणीत टीकात्मक असल्यामुळें तो वाचतांना वाचकाच्या मनोवृत्ती उचंबळून वाचक कार्य करण्यास प्रवृत होतो. यावेळीं अगदी अशाच एखाद्या ग्रंथाची वनस्पतिशास्त्राच्या प्रगतींच्या दृष्टीनें आवश्यकता असून श्लीडेन हा तें काम बजावण्यास योग्य मनुष्य होता. हें पुस्तक लिहून श्लीडेननें वनस्पतिशास्त्रांत विशेष महत्त्वाचे कार्य केलें तें, या पुस्तकाच्या आरंभी वनस्पतिशास्त्रांतील शोधार्थ कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा याचा बराच उहापोह केला हें होय. अलीकडील एखाद्या पाठ पुस्तकांत असा उहापोह करणें अप्रासंगिक समजलें जातें पण तेव्हां अशा गोष्टीची फार जरूर होती. वनस्पतिशास्त्रांतील शोधक या दृष्टीनें मात्र श्लीडेनचें केवळ साधारण महत्त्व आहे. श्लीडेनचें संपूर्ण नांव मॅथे याकोब श्लीडेन असें होतें. तो हँबर्ग शहरीं सन १८४० मध्यें जन्मला. तो येना येथें अध्यापक होता.
श्लीडेनचा वर निर्देश केलेला ग्रंथ प्रसिद्ध होण्याच्या सुमारास त्याच्याहून भिन्न मन:शक्तीच्या मनुष्याचे वनस्पतिशास्त्रांत शोध सुरू झाले. हा मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून कार्ल नागेली होय. यानें आपल्या प्रतिभासंपन्न शोधांनी वनस्पतिशास्त्राच्या सर्व उपांगांत महत्वाची भर टाकली आहे. याची शोध करण्याची पद्धति अत्यंत शास्त्रीय असल्यामुळे यानें प्रशोधनाचें जें जें कार्य हाती घेतलें तें इतकें तडीस लाविलें की, त्यामुळें पूर्वीच्या ज्ञानांत भर पडली इतकेंच नव्हे, तर इतरांस त्या शोधांपासून आणखी शोध लावण्यास किंवा वनस्पतिशास्त्रविषयक वाङ्मय वाढविण्यास अवसर मिळाला. नागेलीनें आपल्या शरीरविज्ञानांतील शोधास गूढलग्नवनस्पतीपासून सुरवात करून बेताबातानें त्या शोधांची मर्यादा सपुष्प वनस्पतींच्या क्षेत्रांत नेली. म्हणजे त्यानें साध्या रचनेच्या शोधापासून आरंभ करून उत्तरोत्तर दुर्घट रचनेचें परीक्षण हाती घेतलें, त्यामुळें शरीररचनेचा (ऐतिहासिक) विकास कसा झाला आहे याविषयींची कल्पना येण्याचें काम सुलभ झालें; इतकेंच नव्हे तर नागेलीच्या वेळेपर्यंत गूढलग्नवनस्पतीच्या रचनेकडे जे सपुष्पवनस्पतींच्या रचनेच्या दृष्टीनें पहात त्याऐवजी गूढलग्नवनस्पतींच्या रचनेच्या द्दष्टीनें सपुष्पवनस्पतींच्या रचनेचे परीक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला. शरीरविज्ञानांत नागेलीनेंहि एक अभ्यासपद्धति प्रचारांत आणिली. दुसरी एक पद्धति त्याच्या हातून शरीरविज्ञानाच्या अभ्यासांत प्रचारांत आणिली गेली ती प्रत्येक इंद्रिय कसें उत्पन्न होतें व वाढत जातें हें आरंभापासून अखेरपर्यंत पहाणें होय. अर्थात् हें पेशींची वाढ पाहून ठरवावयाचें असतें. अशा प्रकारें अभ्यास करून नागेलीनें पाहिलें कीं, पानें, फाद्यां व इतर इंद्रियें यांच्या टोंकाला एक अथवा अनेक पेशी असतात आणि इंद्रियाची वाढ किंवा इंद्रियापासून इंद्रियाची उत्पत्ति, या अग्रपेशीपासून पुन्हां पुन्हां पेशी उत्पन्न झाल्यामुळें एकंदरीत पेशीची संख्या (व आकारहि) वाढून होते. यासंबंधी नागेलीनें कांहीं सामान्य सिद्धांतहि काढिले आहेत. याशिवाय त्यानें शैवाल वनस्पतींचा वर्गीकरणात्मक व वर्णनात्मक अभ्यास करून स. १८४७ त 'नेवन आल्जेन्सिस्टीम' आणि १८४९ त गाटिंजेन सीनिलिजर अल्जर' अशीं दोन पुस्तकें प्रसिद्ध केलीं. यापूर्वी शैवालांचा अभ्यास मुळींच करीत नव्हते असें नाही. तथापि वॉकरनंतरचा पद्धतशीर प्रयत्न नागेलीचाच होय. अलेक्झांडर ब्रॉननेंहि शैवालासंबंधीं कांहीं लिहिलें होतें; त्याच्यानंतर त्या संबंधांत महत्त्वाचे शोध थरे, प्रिंगशीम डी बारी इत्यादींनीं लाविले. परंतु याप्रमाणें शैवालांचा आणि गोमयजांचा अभ्यास परिणामदायी होण्यापूर्वीच म्युसीनेच्या आणि वाहिन्या असणार्या गूढलग्नवनस्पतींच्या गर्भावस्थांच्या पद्धतशीर अभ्यासामुळें म्युसीने आणि वाहिन्या असणार्या गूढलग्नवनस्पती यांच्या वर्गीकरणांत फेरफार झालेला होता. या वनस्पतींचें यापूर्वीच्या शतकापासून परीक्षण होत असून वनस्पतिशास्त्रज्ञांनीं विशेष खोल विचार न करतांसुद्धां त्यांचें उपजाती, जाती, कुलें आणि विभागापर्यत सुद्धां बर्यापैकीं वर्गीकरण केलें होतें स्क्मिडलनें लिव्हवर्टवर स. १७५० त पुस्तक प्रसिद्ध केलें होतें. हेडविगनें १७८२ त मॉसेसवर प्रसिद्ध केलें होतें. यानंतर यासंबंधी ग्रंथ म्हणजे मिर्बेलचा मारिहांटियावरील (१८३५), बर्चाफचा मारिहांटिया व रिसिआवरील आणि स्किंपरचा मोसेसवरील ग्रंथ (१८५०) हे होत. १८२८ पासून बर्चाफच्या शोधामुळें वाहिन्या असणार्या गूढलग्नवनस्पतीसंबंधी अधिक माहिती झाली होती. अंगरनें स. १८३७ त, मॉसेसच्या पुंपिडांतील शुक्रजन्तूंचें वर्णन केलें होतें. १८४८ पर्यंत अशा प्रकारच्या गूढलग्नवनस्पतींतील मैथुनासंबंधानें अनेक गोष्टी उघडकीस आल्या होत्या. परंतु त्यांतील मर्म ओळखिलें जाऊन त्यांचा परस्पर संबंध काय आहे याचे एकत्र विवेचन झाल्याशिवाय त्याचें शास्त्रीय महत्त्व काय असणार? उच्च गूढलग्नवनस्पतींच्या गर्भावस्थांतील मर्म जाणतां येण्यास सपुष्पवनस्पतींच्या गर्भावस्थांतील कांही गोष्टींचा पूर्ण उलगडा होण्यास पाहिजे होता. काण श्लीडेनचें म्हणणें परागनलिका अंडयांतील गर्भपेशीपर्यंत पोहांचते व तेथें तिच्यापासून गर्भ निर्माण होतो असें होतें. हें म्हणणें खरें मानिलें तर गर्भाची उत्पत्ति अमैथुनिक असते व अंडें ही एक केवळ गर्भ उबविण्याची आणि पोसण्याची जागा आहे असें ठरतें. या महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल हाफ्प्रेइस्टरच्या 'डाय एन्ट्स टेहंग डीस एम्ब्रॉज डर फेनरांगामेन' या १८४९ त प्रसिद्ध झालेल्या ग्रंथानें लागला. या ग्रंथांत व या नंतर लेखांवर लेख प्रसिद्ध करून त्यांत हाफ्मेइस्टरनें हें दाखविलें कीं, गर्भपेशीमध्यें अंडपेशी बनते. आणि ही अंडपेशी परागनलिकेच्या स्पर्शानें उत्तोजित होऊन तिजपासून (अंडपेशीपासून) गर्भ बनतो. हाफ्मेइस्टरनें हा शोध नागेलीच्यापद्धतीनें अंडयांतील सर्व पेशींचा सूक्ष्म अभ्यास करून लाविला. हीच नागेलीची पद्धति हाफमेइस्टरनें म्युसीने आणि वाहिन्या असणारे गूढलग्नवनस्पती यांच्या गर्भावस्था पहाण्याच्या कामीं उपयोगांत आणून या वनस्पतीच्या जीवनेतिहासांची पूर्ण माहिती मिळविली. वरील हाफमेइस्टरच्या शोधासंबंधी शंका व कुशंका निघून त्यांजवर वादविवाद होणें अशक्य होतें. कारण हाफमेइस्टरनें आपले शोध बिनतोड शास्त्रीय पद्धतीनें लाविले होते.
हाफमेइस्टरनें आपले शोध 'व्हर्ग्लिचंड अंटरश्चंजन' नांवाच्या ग्रंथाच्या द्वारें स. १८४९ व १८५१ त प्रसिद्ध केलें. हाफमेइस्टचे हे शोध इतके महत्त्वाचे आहेत कीं त्यामुळें वनस्पतिशास्त्राची जितकी एकदम प्रगति झाली तितकी त्यापूर्वी किंवा त्यानंतर केव्हांहि झाली नाहीं. यांपैकीं एक एक शोधाचा विचार केला तरी त्याचें किती महत्त्व आहे; परंतु सर्व शोध मिळून त्यांपासून जी कांही अर्थनिष्पत्ति होते तीपुढे त्या एक एक शोधाचें कांहींच महत्त्व नाहीं. ही अर्थनिष्पत्ति हाफमेइस्टरनें आपल्या ग्रंथाच्या शेवटीं थोड्या पंरतु साध्या व अत्यंत सुदंर शब्दांत दिली आहे. हाफमेइस्टरच्या शोधामुळें काय झालें याविषयी येथें थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे वनस्पतींचें वर्णन म्हणजे काय यासंबंधाची जुनी कल्पना बदलली व लिव्हरवर्ट, मॉस, फर्न, एक्विसेट, एकदल आणि द्विदल इत्यादि भिन्न भिन्न वनस्पतिसमूह यांमध्यें कोणत्या प्रकारचा संबंध आहे हें स्पष्ट झालें; त्याचप्रमाणें पिढयांच्या आलटीपालटीचा नियमहि समजून येऊन त्या नियमाचें स्वरूप वनस्पतींच्या भिन्नभिन्न विभागांत कसकसें बदलत जातें तें समजलें.
हॉफमेइस्टरचा 'व्हर्ग्लीचंड अंटरश्चंजन' हा ग्रंथ वाचणार्याच्या डोळ्यासमोर वनस्पतिकोटीच्या वंशवृक्षाचें चित्र उभें राहून एकाच वंशवृक्षावर गूढलग्न व सपुष्पवनस्पतीचें आरोहण झालेलें दिसून त्यांचें एकमेकाशीं नातें कितपत व कसकसें आहे हें ध्यानांत येतें. त्यामुळें हें पुस्तक वाचणार्याच्या मनांतून उपजातींच्या सनातनत्वाच्या तत्त्वाचें अर्थातच उच्चाटण होतें. डार्विनचें तत्त्व हाफमेइस्टरच्या शोधानंतर आठ वर्षांनीं जगापुढें आलें. हाफमेइस्टरच्या शोधामुळें यापूर्वीच तें तत्त्व स्वीकारण्याजोगी लोकांची मन:स्थिति झालेली असल्यामुळें त्या तत्त्वाला विरोध न होतां तें एकदम प्रस्थापित झालें हें सांगावयास नको आहे.