विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनस्पतिशास्त्र भाग ३
स्थाणु वनस्पती:- अखिल वनस्पतिकोटीचे चार मोठे विभाग आहेत. वर जो वनस्पतिशास्त्राचा इतिहास दिला त्यांत जरी एकाच विभागविषयीं न लिहितां सर्व विभागांचें समान विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी स्थाणुवनस्पती हे इतर तीन विभागांहून अनेक गोष्टींत फार भिन्न असल्यामुळें त्या विवेचनांत त्यांचा केवळ त्रोटक उल्लेख होणें अपरिहार्य आहे. परंतु स्थाणु हे त्यांची संख्या, व्याप्ति व त्यांच्या अभ्यासाची उपयुक्तता हीं लक्षांत घेतलीं असतां पुष्कळ महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा थोडासा इतिहास येथें स्वतंत्र दिला आहे.
सन १८५० च्या पूर्वी स्थाणूवरील तीन विभागांतील वनस्पतींच्या निरनिराळ्या अवस्थांचा पद्धतशीर अभ्यास होऊन गेला असल्यामुळें या तीन विभागांच्या विज्ञानाच्या संबंधांत त्यापुढें प्रगति होणें ही एक केवळ कालावलंबी गोष्ट झाली. परंतु अद्याप स्थाणूंची गोष्ट मात्र निराळी होती. याचें कारण या विभागांतील बहुतेक सर्व वनस्पती अत्यंत सूक्ष्म असून त्यांचे जीवनेतिहास व जीवनक्रम फार घोटाळ्याचे व चमत्कारिक आहेत. तथापि स.१८५० पूर्वी या वनस्पतीविषयींच्या बाह्यज्ञानाच्या संबंधांत बरेंच कार्य होऊन गेलें होतें. निरनिराळ्या लोकांनीं या वनस्पती गोळा करून व पाहून बाह्य लक्षणांवरून त्यांच्या उपजाती ठरविल्या होत्या. अशा उपजाती हजारांनीं मोजण्याइतक्या असून त्यांच्या वर्णनाच्या सचित्र याद्याहि तयार झाल्या होत्या. यावरून असें दिसून येईल कीं उच्जवनस्पतींच्या वर्गीकरणाच्या सबंधांत आरंभी जसा प्रकार घडून आला तसाच येथेंहि कांहीसा घडून आला म्हणजे वर्गीकरणाची या वनस्पतींच्या संबंधी मूळ अनुभवसिद्ध नैसर्गिक पद्धति प्रचारांत आली. अशा याद्यांपैकीं अगॉर्ह (१७८५-१८५९), हार्वे (१८११-६६) आणि कटझिंग फ्रीस यांच्या शैवालांच्या, नीसव्हॉनइसेबॅक (१७७६-१८५८), एलीस फ्रीस (१७९४-१८७८), लेव्हल (१७९६-१८७०) आणि बर्कले यांच्या गोमयजांच्या इत्यादि महत्त्वाच्या आहेत. परंतु या सर्वांहून कोर्डा (जन्म १८०९) याचा गोमजयवनस्पतीवरील ग्रंथ अधिक महत्त्वाचा आहे.
इ. स. १८५०च्या पूर्वीं स्थाणूंची पुनरूत्पत्ति आणि वाढ यांविषयीं एकंदरींत निश्चित अशी कांहींच माहिती नव्हती. कारण शैवाल, गोमयज आणि शिलींध्र यांपैकीं कांहीं वनस्पतींची पुनरूत्पत्ति कशी होते हें बरोबर ठाऊक होतें तर कांहीं स्वयंभू निर्माण झाल्यासारख्या दिसत. स. १८३३ त कटझिंगनें कांहीं स्थाणूंची स्वयंभू उत्पत्ति होते हें सप्रयोगसिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
इ.स. १८५० च्या पूर्वी शैवालांतील मैथुनिक पुनरुत्पत्तीच्या संबंधांत कांहीं माहिती झालेली होती. उदाहरणार्थ गार्टनर, हेडविग, वीचर इत्यादींनीं स्पिरॉगिरा (नागमोड्या) आणि वॉकार नांवाच्या शैवालांच्या संबंधांत ही माहिती मिळविलेली होती. परंतु स्थाणूंच्या जीवनेतिहासाच्या अभ्यासाकडे वनस्पतिशास्त्रांचें हॉफमेइस्टरच्या उच्चगूढलग्नवनस्पतींतील शोधानंतर विशेष लक्ष जाऊन मग स्थाणूंच्या संबंधांत लवकर शोध होऊं लागले.
स्थाणूंपैकीं शैवालांच्या संबंधांत १८५० नंतर ज्यांच्या हातून महत्त्वाचे कार्य झालें त्यांमध्यें प्रामुख्येंकरून ली बारी, बार्नेट, थुरेट आणि प्रिंगशियन यांचा समावेश होतो. इ. स. १८५० पूर्वी गोमयजांसंबंधांतहि कांहीं कार्य झालें होतें. परंतु गोमयजांचा अभ्यास ही वनस्पतिशास्त्राची एक महत्त्वाची (अलीकडे) शाखा होऊन बसली आहे. त्याचें श्रेय सर्वस्वी डी बारी यास आहे. कोहन यानेंहि जरी या संबंधांत महत्त्वाचे कार्य केलें आहे तरी 'गोमयजविज्ञान' हें डी बारीनें निर्मिलें असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. येथें हें सांगितलें पाहिजे कीं, शिलींध्र वनस्पतींचें गूढ उकलण्याजोगें जरी डी बारीनें लिहिलें आहे तरी तें सर्वस्वी उकलण्याचें श्रेय स्क्वेंडनर यास द्यावें लागतें. कारण शिलींध्राच्या गूढाचें ठाम आणि जाहीर स्पष्टीकरण त्यानें केलें.
सूक्ष्मशारीर आणि छेदशास्त्र:- सूक्ष्मशरीराचा अभ्यास वनस्पतींचे छेद घेऊन त्यांचें परीक्षण करून तें एकत्रित करण्यावर अवलंबून आहे. ज्या मानानें छेदकलेची अधिकाधिक प्रगति होत गेली त्या मानानें सूक्ष्मशारीराचें ज्ञानहि अधिकाधिक झालें म्हणून छेदकला आणि सूक्ष्मशारीर यांचा इतिहास जवळजवळ एकच आहे. प्राचीन कालीं अशिक्षित निरीक्षकांच्या हें ध्यानांत आल्यावांचून राहिलें नव्हतें कीं उच्च वनस्पतींचे देह निरनिराळ्या घटनांचे थर एकवटून बनलेले असतात याचें उदाहरण म्हणजे भेंड, गर, साल वगैरे प्रचारांतील शब्द होत. त्याचप्रमाणें हे थर वनस्पती पाण्यांत कुजवून, शिजवून वगैरे उपायांनी निरनिराळे काढण्याची कलाहि अवगत होती. कारण हें सर्वांनां ठाऊकच आहे की, या पद्धतीनें कांहीं वनस्पतीपासून वाख किंवा दोर तयार करतात. आरिस्टाटल आणि त्याचा शिष्य थिओफ्रास्टस यांनीं या थरांची तुलना प्राण्यांच्या शरीरांतील कांही थरांशी करण्याचा प्रयत्न केला आहे. सेजाल्पिनोनें तर भेंडाला वनस्पतींतील सजीव भाग मानून त्या ठिकाणीं वनस्पतींच्या जीवात्म्याचें वास्तव्य असतें असें गृहीत धरलें आहे. भेंड हें वनस्पतींच्या दंडाच्या मध्यें असतें; साल अगदी वरच्या बाजूस असते व त्या दोहोंच्या मध्यें काष्ठ असतें. आतां वाळण्यापूर्वी भेंड फळांतील गराप्रमाणें लुसलुशीत असतें; यावरून सेजाल्पिनोनें असें अनुमान काढलें कीं, फळांतील गर व बी भेंडापासून बनलेलें असतें; आणि सेजाल्पिनोच्या तर्कज्ञानाच्या पद्धतीनें ज्याअर्थी बीजासारखा महत्त्वाचा भाग भेंडापासून उत्पन्न होतो त्याअर्थीं भेंडामध्येंच वनस्पतीचा जीव वास करीत असला पाहिजे हेंच एकदम अनुमान निघतें.
सतराव्या शतकाच्या मध्याच्या पूर्वी सूक्ष्मशारीरासंबंधानें कितपत ज्ञान होतें याविषयीं त्या ज्ञानाची वर जी रूपरेषा दिली आहे तिजवरून कल्पना होईल. यापेक्षां अधिक ज्ञान वनस्पतींचे छेद काळजीपूर्वक तयार करून किंवा वनस्पती प्राण्यांत कुजवून त्यांचे थर वेगवेगळे काढण्यानें करून घेतां आलें असतें. परंतु डोळ्यासमोर ध्येय ठेवून लक्षपूर्वक पहाण्याची कला सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत विशेष कोणाला अवगत नसल्यानें तें साध्य झालें नाहीं. लक्ष देऊन अवलोकन करण्याची कला सतराव्या शतकांत शास्त्रज्ञांस अवगत झाली याचें कारण सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग करण्याचें काम तेव्हांपासून सुरू झालें होतें हें होय. कारण सूक्ष्मदर्शकयंत्रांतून पाहण्यामध्यें विशेष हें आहे कीं, त्यामुळें ज्या वस्तूकडे पहावयाचें तिजकडे दृष्टी वेधते एवढेंच नव्हें तर दृष्टीबरोबरच लक्षहि इतकें वेधतें कीं, पहाणारा त्या वस्तूशीं तन्मय होऊन जातो. या गोष्टीचें प्रत्यंतर म्हणजे सूक्ष्मदर्शकयंत्रांतून पाहिलेल्या वस्तूच्या चित्राचा ठसा बराच काळपर्यंत मनावर रहातो हें होय. याप्रमाणें सूक्ष्मदर्शकयंत्राच्या शोधाचा, सूक्ष्मशारीराच्या अभ्यासावर जरी परिणाम आहे तरी सूक्ष्मदर्शक यंत्र जसजसें अधिक शक्तिमान होत गेलें तसतसें सूक्ष्मशारीराचें ज्ञान अधिकाधिक होत गेलें असा प्रकार मात्र सूक्ष्मशारीराच्या प्रगतीच्या इतिहासावरून दिसून येत नाहीं. याचें कारण सूक्ष्मदर्शकयंत्र कितीहि चांगलें असले तरी त्याचा उपयोग करून घेण्याला फार पात्रता लागते. ही पात्रता प्राप्त करून घेण्यास सतत व अविश्रांत परिश्रमांची आवश्यकता असते. म्हणून सूक्ष्मशारीराची प्रगति, निरीक्षकांची अशा प्रकारची पात्रता ज्यामानानें वाढत गेली त्यामानानें झाली. याप्रमाणें या पात्रतेची उत्तरोत्तर वाढ हेंहि सूक्ष्मदर्शकयंत्रामध्यें उत्तरोत्तर सुधारणा होत जाण्याचें कारण झालेलें दिसून येतें.
माल्फिगी आणि ग्र्यू यांजकडून छेदशास्त्राची स्थापना (१६७१-१६८२):- शरीररचनाविज्ञानाच्या अभ्यासाचा पाया म्हणजे शरीराच्या घटकपेशीच्या रचनेचें आकलन होय. या गोष्टीच्या सत्यत्वाची चुणूक राबर्ट हुकच्या १६६७ त लंडन येथें प्रसिद्ध झालेल्या 'मायक्रोग्राफिया' किंवा सूक्ष्मदर्शक भिंगाच्याद्वारें केलेलीं 'सूक्ष्मपदार्थांचीं कांही जीवक्रियाविज्ञानविषयक वर्णनें' या ग्रंथावरून दिसून येते. राबर्ट हुक (१६३५-१७०३ जन्म फ्रेशवाटर गांवीं) हा वनस्पतिशास्त्रज्ञ नव्हता. तरी पण तो एकंदरींत मोठा शास्त्रज्ञ असून त्याला शास्त्रीय शोध लावण्याची फार हौस होती. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या शोधाचें श्रेय जरी राबर्ट हुक याजला देतां येत नाहीं तरी त्याच्या वेळीं माहिती असलेल्या सूक्ष्मदर्शक यंत्रांत त्यानें स्वत: सुधारण करून वनस्पतींची पेशीमय रचना प्रथम पाहिली. ही रचना त्यानें कोळसा व बूच या दोन पदार्थांतील पाहिली. हुकनें ही जी रचना पाहिली तींत त्याचा उद्देश पदार्थांची रचना छिद्रमय असते हें सिद्ध करण्याचा होता. त्याला बुचाची सूक्ष्म रचना मधाच्या पोळ्यासारखी दिसली म्हणून बुचांतील सूक्ष्मदर्शकयंत्रानें दिसणार्या छिद्रांनां त्यानें 'सेल' पेशी हें नांव दिलें व अद्याप तेंच चालू आहे; राबर्ट हुकनें जरी याप्रमाणें पेशी पाहून त्यांनां नांव दिलें तरी त्यांतील मर्म त्याला मुळींच कळलें नाहीं. राबर्ट हुकचा मायक्रोग्राफिया ग्रंथ प्रसिद्ध होण्याच्या सुमारास माल्फिगी आणि ग्र्यू यांनी वनस्पतींच्या शरीररचनेच्या संबंधांत बराच शोध केला होता. त्यांनीं आपले शोध लंडन येथील रॉयल सोसायटीपुढें इ. स. १६७१ त ठेविले. शरीररचनाविज्ञानांत माल्पिगीनें आधीं शोध केला कां ग्र्यूनें केला या संबंधांत निष्कारण वाद माजून राहिला आहे. परंतु ही गोष्ट उघड दिसतें कीं, (त्यांच्या ग्रंथांचे परीक्षण केलें असतां) माल्फिगीच्या कल्पनांचा ग्र्यूनें आपल्या शोधांत व ग्रंथांत उपयोग केला आहे; व ग्र्यूनेंहि ही गोष्ट कबूल केली आहे. ज्यांनी माल्फिगी आणि ग्र्यू यांचे समग्र ग्रंथ स्वत: वाचलेले नाहींत तथापि त्यांतील उतारे त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या छेदशास्त्रविषयक लेखांत वाचलेले आहेत, त्यांनां असें वाटण्याचा संभव आहे की, या दोघांनां पेशीसंबंधीं सोपपत्तिक ज्ञान झालें होतें. परंतु खरा प्रकार मात्र तसा नाही. कारण त्यांच्या ग्रंथावरून असें दिसून येते कीं, त्यांनीं शरीररचनेंच्या संबंधांत जो शोधपूर्वक अभ्यास केला त्याला पेशींच्या शोधापासून सुरवात करून मग जालांचा शोंध त्यांजवर न उभारितां जालांचा शोध करण्याच्या संबंधांत पेशीचा शोध केला. ते मूळ शोधक या दृष्टीनें त्यांनां शरीररचनेचा अभ्यास केवळ याच पद्धतीनें करणें शक्य होतें. म्हणून आधुनिक छेदशास्त्राच्या, पेशीपासून सुरवात करून मग जालांच्या अभ्यासास लागणार्या पद्धतीशीं ज्यांचा परिचय आहे त्यांनां ग्र्यू आणि माल्फिगी यांच्या शोधाचें महत्त्व कमी वाटण्याचें मुळींच कारण नाहीं.
माल्फिगी आणि ग्र्यू यांच्या हातून जो विशेष शोध झाला तो वनस्पतींच्या शरीररचनेंत जो पेशीभित्तिकांचा सांगाडा असतो त्याच्या संबंधांत होय. माल्फिगी आणि ग्र्यू यांनी केलेला हा शोध त्यांच्यानंतर १०० वर्षेपर्यंत त्याच संबंधांतील अधिकाधिक शोधाचा केवळ पाया होऊन राहिला होता. माल्फिगी आणि ग्र्यू यांची शरीररचनाविज्ञानांतील शोधासंबंधी मतें जरी एक होतीं तरी त्या शोधासंबंधीं त्यांनीं जें लिहिलें तें लिहिण्याची पद्धति निरनिराळी होती. माल्पिगीनें जें कांहीं पाहिलें तेवढयाचेंच उत्तम व बरोबर वर्णन लिहिलें; परंतु ग्र्यूनें जें कांहीं पाहिलें त्यावर विचार करून निरनिराळ्या कल्पना काढून उपपत्ति लावण्याचा प्रयत्न केला. मार्सेलो माल्फिगी याचा जन्म बोलोग्ना शहराजवळ १६२८ यावर्षी झाला. तो १६९४ या वर्षी मरण पावला. माल्फिगी हा प्रसिद्ध वैद्य असून प्राणिशाररिविद्येंतहि निष्णात होता.
सतराव्या शतकांत ज्याप्रमाणें वैद्यकांत शरीररचनाविज्ञान आणि जीवक्रियाविज्ञान यांचा विचार स्वतंत्र न करितां एकत्रच करीत त्याचप्रमाणें वनस्पतिशास्त्राच्या शरीररचनाविज्ञानाची आणि जीवक्रियाविज्ञानाचीहि गोष्ट होती, म्हणून माल्फिगी आणि ग्र्यू यांनीं शरीररचनेसंबंधानें लिहितांना इंद्रियांच्या उपयुक्ततेसंबंधानें म्हणजे जीवक्रियेसंबंधानेंहि लिहिलें आहे यांत कांहीं नवल नाहीं. माल्फिगीसारख्याकडून तो प्राणिशास्त्रज्ञ असल्यामुळें, वनस्पतींच्या जीवक्रियेची प्राण्यांच्या जीवक्रियेशीं तुलना होऊन चुकीचे सिद्धांत काढिले गेले असले तरी अशा तुलनेमुळेंच वनस्पतींच्या जीवक्रियाविज्ञानाच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळालें ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. नेहमेह ग्र्यू हा १६२८ सालीं जन्मला असावा. याचा धंदा वैद्यकीचा होता. याचा ऍनॅटॉमी ऑफ प्लँट्स नांवाचा ग्रंथ १६८२ सालीं समग्र प्रसिद्ध झाला. माल्फिगी व ग्र्यू यांच्या ग्रंथांचें एकंदरीत महत्व फार आहे. त्यांचे ग्रंथ केवळ वनस्पतिशास्त्रालाच लाभदायक झाले असें नसून ते सृष्टिशास्त्राच्या प्रगतीस कारणीभूत झाले. हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील १०० वर्षांत त्यांच्या तोडीचा एकहि ग्रंथ प्रसिद्ध झाला नाहीं. इतकेंच नव्हें तर त्या अवधीत शरीररचाविज्ञानाची कांहीशीं पिछेहाट झाली. अँटोन व्हान ल्यूवेनहॉक (१६३२-१७२३) नें मात्र अठराव्या शतकाच्या आरंभापूर्वी शरीररचनाविज्ञानाचा अभ्यास करून त्यासंबंधांत लिहिलें. परंतु त्यांत नवीन असें कांहीहि नव्हतें तथापि त्यानें माल्फिगी आणि ग्यू यांच्या वेळी जें सूक्ष्मदर्शक यंत्र ठाऊक होतें त्यांत पुष्कळ सुधारणा केली. यामुळें त्याला वनस्पतींच्या पेशींतील स्फटिकासारखे सूक्ष्म पदार्थ पहातां आले. उदाहरणार्थ त्यानें एरिस फ्लॉरॅटिना या वनस्पतीच्या पेशींतील स्फटिक पाहिले.
अठराव्या शतकांतील छेदशास्त्र:- माल्फिगीनंतर इटलींत शरीररचनाविज्ञानांत तत्तुल्य शोधक अठराव्या शतकांत कोणीहि झाला नाहीं. हुक आणि ग्र्यूनंतर इंग्लंडच्या संबंधांत व ल्यूवेहॉकनंतर हॉलंडच्या संबंधांतहि अशीच स्थिति झाली. अठराव्या शतकांत शरीररचनाविज्ञानाची जी ही पिछेहाट झाली तिचें कारण हुडकून काढणें हें सोपें काम नाहीं; तरी पण तसें होण्याचें कारण असें दिसतें कीं, अठराव्या शतकांतील शोधकांनी केवळ शरीररचनाविज्ञानाच्या अभ्यासाचें ध्येय पुढें न ठेवितां त्याचा अभ्यास जीवक्रियाविज्ञानाच्या संबंधांत दुय्यम या दृष्टीनें केला. इतकेंच नव्हें तर हेलेसनें सूक्ष्मदर्शकयंत्राच्या साहाय्यशिवाय जीवक्रियाविज्ञानांत शोध करणें शक्य आहे हें दाखविल्यामुळें बोनेट आणि ड हामेल सारखे जे थोडे शोधक वनस्पतींच्या जीवक्रियेच्या संबंधांत शोध करीत होते तेहि शरीररचनाविज्ञानाचा मार्ग सोडून प्रयोगाच्या मागें लागले. आतां बॅरन व्हॉन ग्लेइकन रशवर्म आणि कोएलर्यूटर यांचा सूक्ष्मदर्शकयंत्राशीं चांगला परिचय असल्यानें त्यांनां शरीररचनासंबंधांत कांहीं तरी करतां आलें असतें; परंतु त्यांनीहि वनस्पतीतील गर्भाधान आणि पुनरूत्पत्ति यांजसंबंधी शोध करण्याचें काम हातीं घेतलें होतें. एकंदरीत अठराव्या शतकामध्यें ज्यांनां खरे वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतां येईल असे लोक शरीरविज्ञानाची हेळसांड करीत. ही गोष्ट लिनियसनें शरीररचनाविज्ञानांत मुळीच आस्था दाखविली नाहीं यावरून उघड होते. इ. स. १७६० च्या सुमारास छेदशास्त्रासंबंधीं म्हणजे शरीररचनाविज्ञानावर जे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यांपैकी प्रत्येकाचा या ठिकाणी उहापोह करण्याचें कारण नाहीं; कारण त्या ग्रंथांतून नवीन असें विशेष कांहीं नाहीं आणि हेंच दाखविण्याकरितां त्यांपैकी थोडयांचा उहापोह केला म्हणजे पुरे सुप्रसिद्ध तत्त्व ज्ञानी ख्रिश्चन बेंरन व्हॉन वुल्फ यानें १७२३ त 'व्हर्ननफ्टाइज सेडंकन व्हॉन डेन वर्कनजेन डर नेचर' या नांवाचा म्याग्डेबर्ग या शहरीं आणि 'आलरहँड निटग्लिच व्हर्सक' या नांवाचा हेले शहरीं असे दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. या ग्रंथांतून सूक्ष्मदर्शकासंबंधी निरनिराळ्या प्रकारची माहिती असून त्याचा उपयोग कसा करावा तें सांगितलें आहे. यांत संयुक्त सूक्ष्मदर्शकयंत्राचेंहि वर्णन आहे. या ग्रंथांतून सूक्ष्मदर्शकांतून पाहिलेल्या निरनिराळ्या वस्तूंविषयीं उहापोह आहे. त्याजवरून असें दिसून येतें कीं वुल्फनें पिष्टाचे कण सूक्ष्मदर्शकांतून पाहिले होते, पण ते काय आहेत हें त्याला बरोबर समजलें नव्हतें, तरी पण त्यामुळें दळण्याच्या क्रियेमध्ये पिष्ट बनतें अशा प्रकारची पूर्वीची कल्पना मात्र दूर झाली. वुल्फचा शिष्य थमिग याच्या 'मेलेटमेटा' (१७३६) या ग्रंथावरून त्यानेंहि कांही सूक्ष्मदर्शकांतून पहाण्याचा प्रयत्न केला होता असें दिसतें. या दोघांनीं निदान स्वत: पाहून तरी लिहिलें आहे; परंतु त्यावेळच्या ल्युडविग या प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञाच्या 'इन्स्टिटयूशन्स रेग्नी व्हेजेटेबिलीस' या ग्रंथावरून त्यानें स्वत: कांहींहि न पाहातां तें पुस्तक लिहिलें असें दिसतें.