विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनस्पतिशास्त्र भाग १०
स्कंध अथवा खोड:- चढत्या अक्षाच्या मुख्य भागाचें (कळीचें) वर्णन झाल्यावर ज्या काठीसारख्या भागावर त्या लागलेल्या असतात त्यासंबंधानें येथें विचार केला आहे. बीजगर्भाची तपासणी करतां यांत गर्भमूल, गर्भपल्लव व गर्भदल असे तीन भाग सांपडतात. त्यामध्यें गर्भपल्लवास शिरावर धारण करणारा काठीसारखा भाग दृष्टीस पडत नाहीं पण जरा वाढलेल्या लहानशा रोपडयांत तो स्पष्टपणें दिसतो. गर्भांमध्यें हा काठीसारखा वाढणारा व पानें व कळ्या धारण करणारा भाग मुळीं अस्तित्वांतच नसता तर गर्भापासून उत्पन्न होणार्या लहान रोपडयांतहि तो दृष्टीस न पडता. वस्तुतः ह्या काठीसारख्या वाढणार्या भागाचा वाढीस न लागलेला अंश प्रत्येक गर्भाच्या कळींतच असतो. मोहरीच्या गर्भाप्रमाणें त्याची वाढ प्रत्येक वनस्पतींत उगमस्थानाच्या किंचित खालच्या बाजूपासून सुरू होते, व म्हणून गर्भदलांच्या खालचा अक्षभाग वरच्या दिशेनें वाढून लांब झाला म्हणजे तो जमिनीच्या बाहेर दिसावयास लागतो व त्याबरोबर गर्भदलेंहि जमिनीवर आलेलीं दृष्टीस पडतात. कांहीं वाढ अशा रीतीनें गर्भदलांच्या उगमस्थानाच्या खालच्या बाजूस होऊन ती जमिनीवर आल्यानंतर कांही वेळानें ती थांबते व नंतर गर्भपल्लवाच्या मध्यभागी असलेल्या अक्षभागाची वाढ होण्यास आरंभ होऊन त्या पल्लवाच्या कळीमधून एक एक पान सुटूं लागतें. याप्रमाणें मोहरीच्या झाडाप्रमाणें कित्येक वनस्पतीमध्ये चढत्या अक्षाचा काठीसारखा भाग ज्यास स्कंद अथवा खोड म्हणतात. बीजदलांच्या खालीवर दोन्हीं बांजूस वाढ होऊन तयार होतो. अशा रीतीनें चढत्या अक्षभागाचा जो हिस्सा बीजदलांच्या खालच्या बाजूस वाढून स्कंधाचा खालचा भाग बनतो त्यास दलाधराक्ष किंवा अधराक्ष व दलाधराक्षाची वाढ खुंटल्यावर बीजदलांच्या उगमस्थानाच्या वरच्या बाजूस असलेल्या गर्भपल्लवाच्या अक्षभागांतच प्रत्यक्ष वाढ होऊन स्कंधाचा पहिल्या पानापर्यंतचा जो हिस्सा तयार होतो त्यास दलोत्ताराक्ष अथवा उत्ताराक्ष असें म्हणतात.
मोहरीच्या झाडाचें खोड वाढीच्या दृष्टीनें याप्रमाणें अधराक्ष व उत्ताराक्ष ह्या दोन्हीं भागांची वाढ होऊन तयार होतें. सर्व वनस्पतींच्या स्कंधांची स्थिति अशी नसते. वाटाणा, हरभरा इत्यादि कांहीं झाडांच्या बिया रूजवून त्यांचीं लहान लहान रोपटीं तयार झाल्यावर तपासणी केली असतां आढळून येईल कीं डाळिंब्या अथवा गर्भदलें जमिनीबाहेर स्कंधाच्या वाढीबरोबर येत नाहींत. तीं जमिनींतच रहातात. बियांच्या सालामधून सुद्धां त्यांची सुटका होत नाहीं. अशा प्रकारें मोहरीच्या चढत्या अक्षाच्या वाढींत व वरील दोन वनस्पतींच्या चढत्या अक्षाच्या वाढींत जो फरक दिसतो त्याचें कारण असें कीं वाटाणे व हरबरे यांत दलोधराक्ष मुळींच वाढत नाहीं. त्याचें खोड प्रारंभापासूनच दलात्तराक्षाच्या वाढीस सुरवात होऊन तयार होतें. तेव्हां कांहीं वनस्पतींचे स्कंध या पद्धतीनें केवळ उत्ताराक्षाच्या वाढीपासून तयार होतात. एकदल वनस्पतींचे स्कंध सामान्यतः अशाच रीतीनें वाढतात.
मूळ कोणत्या भागांत वाढ होऊन निरनिराळ्या वनस्पतीचीं खोडें बनतात हें समजल्यावर, स्कंधाच्या बाह्य रूपाची तपासणी केली तर निरनिराळ्या दृष्टींनीं ही भिन्नता दृष्टीस पडते. मोहरी, तुळस, गुलबाक्ष, मका व जोंधळा हीं पांच प्रकारचीं झाडें फुलल्यावर उपटून त्यांच्या खोडावरचीं पानें तोडून खोडाची तपासणी केली तर असें दिसतें कीं, तुळस, गुलबाक्ष, मका व जोंधळा यांच्या खोडावर प्रत्येक पानाच्या ठिकाणीं एक सांधा स्पष्टपणें दिसतो. मोहरीच्या खोडावर अशा प्रकारचे सांधे दृष्टीस पडत नाहींत. पान व खोड यांचा सांधा ज्या ठिकाणीं झाला असतो- मग तो मक्याच्या खोडावरील सांध्याप्रमाणें स्पष्ट दिसत असो अथवा मोहरीच्या सांध्याप्रमाणें स्पष्ट दिसत नसो-त्यास पेरें म्हणतात व जवळजवळच्या दोन पेर्यां मधील स्कंधाचा जो भाग त्यास कांड किंवा टिपरू म्हणतात. याप्रमाणें खोड हें कांडी व पेरी याचें झालेलें असते. सामान्यत: द्विदलवनस्पतींच्या खोडांची कांडी व पेरीं एकदलवनस्पतींच्या खोडाप्रमाणें स्पष्ट असत नाहींत. एकदलवनस्पतींमध्यें पानांचा खालचा बुडाचा भाग खोडावर घट्ट गुंडाळलेला असतो म्हणून ज्या ठिकाणीं त्याचा उगम असतो त्या ठिकाणीं अंगठीसारखी वाटोळी खूण पडते व त्यामुळें पानांचे खोडावरील हे सांधे स्पष्ट उठावाने दृष्टीस पडतात. द्विदलवनस्पतीमध्यें पानें पेर्यावर सभोंवार अशा रीतीनें गुंडाळलेलीं नसतात म्हणून त्यांच्या खोडांचीं ''पेरी'' स्पष्टपणें दृष्टीस पडत नाहींत. खोडावर किंवा फांद्यांवर पानें फक्त पेर्या पासूनच उत्पन्न होतात, कांड्यावर तीं कधींहि लागत नाहींत. म्हणून खोडाच्या ज्या भागापासून पानें उगवतात त्यास तो स्पष्ट-खुणेनें दृष्टीस पडत असो वा नसो- ''पेरें'' म्हणतात. खोडाची लांबी कांडयांच्या लांबीवर व संख्येवर अवलंबून असते. खोडाची लांबी व उंची जास्त होते, ती कांड्यामध्येंजी व्यक्तिशः वाढ होते तिचा परिणाम होय. मूळाप्रमाणें खोडाची वाढ फक्त अग्राजवळच्या भागांतच तेवढी होत नाहीं तर अग्रापासून दूरदूरच्या कांडयांतहि ती कांहीं काळपर्यंत होत असते. म्हणून खोडावर व फांदीवर पानें खालच्या जुन्या भागावर दूरदूर लागलेलीं व वरील अग्रापाशीं जवळ जवळ लागलेलीं असतात व कळ्यांत तर तीं एकमेकांवर चढलेलीं असतात याचें कारण असें कीं, खालच्या कांडयांची लांबी जास्त असते व वरच्या कांडयांत वाढ पूर्ण झाली नसल्यामुळें त्यांची लांबी फार कमी असते. तसेंच कळीच्या मध्यभागीं जो स्कंधाचा अग्रभाग असतो त्याच्या कांडयांची वाढ तर मुळीच झालेली नसल्यामुळें सर्व ''पेरीं'' अतिशय जवळ जवळ असतात व त्यामुळें पेर्यापासून उत्पन्न झालेलीं पानें हीं एकमेकांस चिकटलेलीं असतात.
मोहरीच्या झाडाच्या खोडाकडे त्याच्या टणकपणाच्या दृष्टीनें पाहिलें तर असें आढळून येतें कीं, पूर्ण वाढलेल्या झाडाचें खोड सुद्धां जरा लवचिक असून त्याच्या सालींतील हिरवा रंग बाहेरून स्पष्ट दृष्टीस पडतो व खोडाच्या आंतील काष्ठमय कठिण भाग फारसा वाढलेला नसतो. अशा प्रकारच्या खोडास ''हरितकीय'' म्हणतात. हरितकीय खोड जेव्हां स्पष्टपणें पेरेदार असून पोकळ असतें तेव्हां त्यास धाट असें म्हणतात. याच दृष्टीनें तूर, कापशी तसेंच आंबा, फणस, बाभूळ, इत्यादि उंच वाढणार्या झाडांकडे पाहिलें तर असें आढळतें कीं, त्यांच्या अगदी नवीन फुटलेल्या वरच्या फांद्या व खोडाचा अग्रभाग जरी लवचिक असला तरी जुना खालचा भाग फार कठिण असून त्याची सालहि वरून हिरवी दिसत नाही. तसेच खोडाच्या आंतील काष्ठमय भाग पुष्कळच वाढलेला असतो. अशा प्रकारच्या खोडास काष्ठमय खोड अथवा स्कंध म्हणतात.
वाढ, उंची व कठिणपणा या तिन्ही गुणांच्या दृष्टीस दृष्टीनें मोहरीच्या खोडाकडे पाहिलें तर असें आढळतें कीं, हीं झाडें चार पांच फुटांपेक्षां जास्त वाढत नाहींत. खोड लवचिक असतें, व वाढ फारशी होत नसल्यामुळें तें विशेष रूंद किंवा लांब होत नाहीं. सर्व वनस्पतींची उंची त्यांच्या खोडाच्या उंचीवर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक जागेचें सृष्टिसौंदर्य विशेषें करून तेथील वनस्पतींच्या वाढीवर व उंचीवर अवलंबून असतें. कित्येंक ठिकाणी आकाशास भिडूं पहाणारीं झाडें दृष्टीस पडतात तर कांहीं ठिकाणीं असलेल्या वनस्पतींचे स्कंध उंच न वाढतां जमिनीवर फार थोड्या उंचीपर्यंत वाढले असल्यामुळें जमिनीवर एक प्रकारचा हिरवा गालिचा दुरून पाहाणारास दृष्टीस पडतो. वनस्पतीच्या खोडाची उंची, वाढ, कठिणपणा व आयुर्मान इत्यादि गुणांनुरूप वनस्पतींचे निरनिराळे वर्ग केले जातात ते असें:- वृक्ष (ट्री) - यांचें खोड कठिण व दहा फुटांपेक्षां जास्त उंच असतें (अंबा व फणस). विटप(श्रब)- खोड कठिण व दहा फुटांपेक्षां जास्त उंच नसतें व त्याच्या फांद्या बर्याच खालपासून फुटतात (कापशी आणि तूर). गुल्म (बुश) - विटपाप्रमाणेच बहुतेक स्थिति असते परंतु फांद्या फारच खालून उगवून फार दाट अशा एकमेकांत गुंतलेल्या असतात (करवंद, टंटणी). लता (क्रीपर) - खोड मृदु किंवा कठिणहि असतें परंतु तें उभें वाढलेलें नसून जमिनीवर पसरलेलें किंवा दुसर्या झाडावर किंवा आश्रयावर चढलेलें किंवा गुंडाळलेलें असतें (भोपळा, कांकडी, द्राक्ष, मधुमालती इ.) हरितक (हर्ब)- खोड मृदु, लवचिक असून चार पांच फुटांपेक्षां जास्त उंच नसतें (मोहरी, मुळा, गाजर, भाजीपाला इ.). वनस्पतींचे वयावरून ३ भेद होतात. मोहरीप्रमाणें एक हंगाम अथवा फार फार तर पूर्ण वर्षपर्यंत जिवंत रहाणार्या वनस्पतीस एकवर्षायु म्हणतात. ज्या वनस्पतींचें जमिनीवरील खोड फांद्या व पानें यांच्यासकट एका हंगामानंतर मरून जातें परंतु जमिनींतील भाग मात्र जिवंत राहून वंसतकाळीं पुन्हां नवीन फांद्या, पानें, फुलें व फळें इत्यादि भाग उत्पन्न होऊन दुसर्या वर्षी झाड मुळासकट मरून जातें त्यांस द्विवर्षायु असें म्हणतात. दोन वर्षांपेक्षां जास्त वर्षें जिवंत राहून प्रत्येक वर्षीं किंवा आयुष्याच्या शेवटच्या वर्षीं तेवढें फुलें व फळें उत्पन्न करणार्या वनस्पतींस बहुवर्षायु असें म्हणतात. वृक्ष, विटप, आणि गुल्म हे बहुतकरून बहुवर्षायु असतात. लता व हरितकें एकवर्षायु किंवा बहुवर्षायूहि असतात.कांहीं थोडीं हरितकें द्विवर्षायु असतात. बहुवर्षायु हरितकांचे जमिनीवरील अवयव दर वर्षी मरतात परंतु भूमिगत भाग जिवंत राहिल्यानें अनुकूल कालीं ते पुन्हां जमिनीवर डोकें काढून वाढूं लागतात व फुलें, फळें व बीं उत्पन्न करून पुन्हां अंतर्धान पावतात. अशा रीतीनें कित्येक वर्षें जिवंत राहून सरतेशेवटीं ती वनस्पति एखाद्या वर्षी मरून जाते.