प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग ११

शाखाप्रबंध (फांद्यांची मांडणी) :- मोहरीच्या खोडावर ज्या फांद्या उगवतात त्यांची मांडणी तपासून पाहिली असतां असें आढळतें कीं मुख्य खोड षेंड्यापर्यंत अनिर्बंध रीतीनें वाढलेलें असतें व सर्व फांद्या त्याच्या बाजूंपासून उत्पन्न झालेल्या असतात व तसेंच मुख्य खोडापेक्षां लांबीनें कमी असतात. अशा प्रकारची मुख्य खोडाची आणि फांद्यांची वाढ व मांडणी असली म्हणजे फांद्यांच्या त्या मांडणीस अनियमित अथवा अपरिमित, किंवा अमर्यादित, असें म्हणतात. सुरू, देवदार, कळक, महानिंब, युकालिप्टस वगैरें वृक्षांत फांद्यांची रचना वरील प्रकारें अनियमित अथवा अमर्यादित, किंवा अपरिमित तर्‍हेचीच असते. अपरिमित अथवा अमर्यादित शाखाबंधनास एकपादीय असेंहि म्हणतात. परंतु अंबा, रानशिशवी, कवठ इत्यादि मोठे वृक्ष व पांढरा चाफा, तगर, धोतरा वगैरे झुडपें यांचीं खोडें व फाद्याची मांडणी पाहिली असता असे दिसेल कीं मुख्य खोडाची वाढ त्यांच्यांत लवकर थांबून नंतर फक्त नव्या नव्या फांद्या फुटून झाडाची वाढ होत राहाते. मुख्य खोडाची वाढ खुंटल्यावर ज्या फांद्या फुटतात त्या मुख्य खोडाच्या अग्राच्या जरा खालच्या बाजूस जीं पानें असतात त्यांच्या कैचींतून उगवतात. कांहीं लांबीपर्यंत या फांद्यांची वाढ झाल्यानंतर मुख्य खोडाप्रमाणें त्यांचीहि वाढ खुंटते व पुन्हां त्यांच्या अग्राच्या खालीं ''कक्षस्थ'' फांद्या उत्पन्न होऊन वाढ सुरू होते. व त्यांच्या वाढीची तर्‍हा खालच्या फांद्याप्रमाणेंच होऊन पुन्हां नवीन फांद्या त्याच्या अग्राच्या खाली फुटतात व वाढ सुरू रहाते. याप्रमाणें वर दिलेल्या वनस्पतींच्या खोडाच्या व फांद्यांच्या वाढीची स्थिति असल्यामुळें या प्रकारास नियमित, मर्यादित किंवा परिमित असें म्हणतात.

मर्यादित (परिमित) शाखाप्रबंधाचे फांद्यांच्या संख्येनुरूप तीन भेद केले जातात:- (१) एकभुजी (एकभुज)- जेव्हा एक एकच फांदी प्रत्येक वेळीं वाढ खुंटल्यावर उत्पन्न होते (लहान दुधी). (२) द्विभुजी (द्विभुज) जेव्हां दोन दोन फांद्या प्रत्येक वेळीं उत्पन्न होऊन वाढ होत राहते (धोत्रा, तगर, पांढरा चाफा, मोठी दुधी) (३) बहुभुजी- जेव्हां दोहोंपेक्षां जास्त फांद्या उत्पन्न होतात. एकभुजी मर्यादित (परिमित) शाखाप्रबंधाच्या कांहीं वनस्पतींत फांद्या एकाच बाजूस फुटतात व कांहींत त्या आळीपाळींनें डाव्या उजव्या बांजूस उगवतात. फांद्या नेहमीं थोड्या तिरप्या दिशेनें वाढत असल्यानें या प्रकारांत खोड जणूंकाय नागमोडीप्रमाणें वाढलेलें दृष्टीस पडतें व त्याचीं कांडीं व पेरीं स्पष्टपणें दृष्टीस पडतात. प्रत्येक पेर्‍यावर झडून पडलेल्या कळीची किंवा फुलाची खूण किंवा तेथें प्रत्यक्ष उगवलेलें फूल सामान्यतः दृष्टीस पडतें व त्याच ठिकाणीं दुसर्‍या बाजूस गळून पडलेल्या पानाचा व्रण किंवा प्रत्यक्ष पान लागलेलें दृष्टीस पडतें. फुलें अथवा फुलांचे गुच्छ आळीपाळीनें डाव्या उजव्या बाजूस लागलेले दिसतात परंतु सर्व फांद्या जेव्हां एकाच बाजूस उत्पन्न होतात तेव्हां मात्र प्रत्येक पेर्‍यावर एक एकच पान उगवलेलें असलें तर सर्व पानें एका बाजूस लागलेलीं व उलट बाजूस फुलें उगवलेलीं दृष्टीस पडतात. एकभुजी मर्यादित (एकभुजी परिमित) प्रबंधाच्या या दोन्ही प्रकारांत जेव्हां सर्व फांद्या एकाच सरळ रेषेंत येऊन वाढतात तेव्हां खोडाची ठेवण हुबेहुब अपरिमित (अमर्यादित) शाखाप्रबंधांतील खोडाप्रमाणें दिसते, म्हणजे मध्यभागीं खोड सरळ वाढलेलें दिसतें व त्याच्या बाजूपासून पानें व फुलें उगवलेलीं दिसतात. परंतु हा केवळ आभास असतो. कारण अशा प्रकारें जें सरळ खोड मध्यभागीं दिसतें तें यथार्थतः अमर्यादित प्रबंधाच्या खोडाप्रमाणें एकाच शिखरस्थ कळीच्या सतत चाललेल्या वाढीपासून तयार झालेलें नसतें तर मुख्य खोडाची व त्यानंतर उगवलेल्या प्रत्ये फांदीची वाढ खुंटल्यावर ज्या नवीन नवीन कळ्या फुटतात त्या अनेक कळ्यांच्या वाढीचा तो संकलित परिणाम असतो. त्यामधील प्रत्येक ''कांडें'' स्वतंत्र कळीच्या वाढीनें तयार झालेलें असतें आणि म्हणूनच अमार्यादित वाढीच्या खोडांप्रमाणें दिसणारें हें जें खोड अशा वनस्पतींत दृष्टीस पडतें त्यावर फुलांच्या उलट बाजूस लागलेल्या पानांच्या कैचींत नेहमींप्रमाणें एकाहि कळीचा मागमूस दृष्टीस पडत नाहीं म्हणून अशा प्रकारच्या खोडास वेषधारी स्कंध (खोड सिंपोडियम) आणि फांद्यांच्या ज्या मांडणींमुळें हा आभास उत्पन्न होतो त्या रचनेस वेषधारीशाखा प्रबंध म्हणतात.

मर्यादित व अमर्यादित शाखाप्रबंधांत सर्व शाखा पानांच्या कैचींतून उत्पन्न होत असल्यामुळे त्या पार्श्र्वीय असतात. परंतु कांहीं अपुष्प वनस्पतींत (सेलाजिनेला, सायलोटम, डिक्टिओटा) अग्रभाग द्विखंड होऊन प्रत्येक खंडाच्या स्वंतत्र वाढीनें त्या तयार होतात. अशा रीतीनें त्या उत्पन्न होत अल्यामुळें पानांच्या कैचींत त्यांचा उगम होत नसतो. म्हणून त्यांनां पार्श्र्वीय शाखाप्रबंधाच्या सदरांत अंतर्भूत करतां येत नाहीं. या प्रबंधामध्यें अग्रभागी असलेल्या वर्धन स्थानाचे दोन तुकडे होऊन शाखा उत्पन्न होत असल्यामुळें त्यांस द्विखंडजन्य असें म्हणतात. सपुष्पवर्गांत शाखाप्रबंधाचा हा प्रकार आढळत नाहीं. द्विखंडजन्य शाखाप्रबंधांतहि कधीं दोन्ही खंड सारखे वाढून फांद्या चिमटयाच्या रचनेप्रमाणें वाढलेल्या दिसतात व दुरून वरवर पाहातां ही रचना द्विभुजधारी मर्यादित प्रबंधासारखी दिसते. परंतु जरा न्याहाळून पाहिलें तर दोन्ही फांद्यांच्या तळीं एका बाजूस गळून पडलेल्या पानांचे व्रण दिसत नाहींत व दोन फांद्यांच्या मध्यभागींहि खालच्या खोडाची वाढ खुंटल्याचें चिन्ह दिसत नाहीं. अग्रभागीं असलेल्या वर्धनस्थानाचे दोन खंड झाल्यावर त्यांपैकीं कधीं कधीं एकच जोरानें वाढून त्याची फांदी तयार होते व दुसर्‍या खंडापासून फांदी तयार होत नाहीं. अशा रीतींनें प्रत्येक वेळीं फक्त एक एक फांदी तयार झाल्यानें ही मांडणी एकभुजमर्यादित प्रबंधासारखी दिसूं लागते. ह्या शाखाप्रबंधांतहि अमर्यादित वाढीच्या स्कंधाप्रमाणें वाढ दिसण्यांत तरी होत असल्यामुळें त्यांच्या संबंधानेंहि वेषधारी स्कंध वेषधारी शाखाप्रबंध या पारिभाषिक शब्दांचा उपयोग करतात. अशा रीतीनें शाखाप्रबंधाचे जे प्रकार सांपडतात त्यांचें वर्गीकरण थोडक्यांत खालीं दिलें आहे.

शाखाप्रबंध:- १. पाÍर्वीय, (१) अमर्यादित व (२) मर्यादित (परिमित) (अ) - एकभुज अथवा वेषधारी, (आ) द्विभुज, (इ) बहुभुज. २. द्विखंडजन्य- द्विभुजधारी व एकभुज अथवा वेषधारी मुख्य खोडापासून जशा फांद्या फुटतात तशाच फांद्यांपासून नवीन फांद्या फुटतात. अशा रीतीनें वरच्या बाजूस ज्या लहान लहान फांद्या फुटतात त्यांस डाहाळ्या अथवा उपशाखा म्हणतात. मोहरीच्या झाडाचें खोड सर्वस्वी जमिनीबाहेर उभें वाढतें. परंतु निरनिराळ्या लहानमोठया वनस्पतींची तपासणी जरा बारकाईनें केली असतां असें दिसून येतें कीं खोडाच्या वाढीची जागा व दिशा सारखी नसते. कित्येक वनस्पतींची खोडें पूर्णतः किंवा अंशत: भूमिगत असतात व ज्यांचीं पूर्णपणे भूमिबाह्य असतात त्यांतहि सर्वांचीच मोहरीच्या खोडाप्रमाणें सरळ उभीं वाढत नाहींत; कांहीं तिरपीं तर कांहीं आडवी वाढतात. अशा रीतीनें वाढीची दिशा व स्थान या दोन्ही दृष्टींनीं खोडाचे जे भिन्न प्रकार आढळतात त्यांचें आतां वर्णन करूं.

वायुगत स्कंध व शाखांचे प्रकार :- मोहरीच्या खोडाप्रमाणें खोड सरळ उभें वाढलेलें असेल तर त्या खोडास उन्नतस्कंध म्हणतात. वृक्ष व विटपांत खोड बहुतकरून उन्नतच असतें. जेव्हां मुख्य खोड किंवा अगदीं जमिनीच्या पृष्ठभागाजवळून उगवणारी फांदी प्रथम तळाशीं कमानीप्रमाणें वांकडी वाढून नंतर पुन्हां सरळ उभी वाढलेली असते तेव्हां त्या खोडास किंवा फांदीस रोही (असेंडिग) असें म्हणतात. (निफेलियमसावा-गहूं). जमिनीच्या पृष्ठभागावर सरपटत वाढणार्‍या खोडास किंवा फांदीस प्रसारी अथवा प्ररोही म्हणतात (लहान दुधी, रानगोभी). प्रसारी खोडाचा किंवा फांदीचा अग्रभाग जमिनीवर सरपटत न वाढतां रोही खोडाप्रमाणें कमान करून सरळ उभा वाढलेला असल्यास त्या खोडास किंवा फांदीस शयान असें म्हणतात (पुनर्नवा). जमिनीच्या पृष्ठभागापासून थोड्या अंतरावर खोडापासून फांदी उत्पन्न होऊन व पुन्हां ती खालीं झुकून तिचें अग्र जमिनीवर पाहोचल्यावर त्याच्या खालच्या बाजूस उपरीं मुळे फुटून वरच्या बाजूस सरळ उभा वाढणारा नवीन पल्लव उत्पन्न झाला तर किंवा प्रसारी फांदीच्या अग्रापासून अशाच रीतीनें मुळें व नवपल्लव उत्पन्न झाले असले तर अशा फांदीस नम्र असे म्हणतात. खोडाचा किंवा फांदीचा खालचा भाग भूमिगत असून कांहीं वेळ आडवा किंवा तिरपा वाढून पुन्हां जमिनीवर वाढत येऊन वायुगत झालेला असेल तर त्या खोडास किंवा फांदीस भूरोही असें म्हणतात (घायपात, गुलाब). नम्र किंवा भूरोही फांद्या लांब न वाढतां आंखुड राहून दाटीनें वाढलेल्या असल्या म्हणजे त्या खोडास घनरोही असें म्हणतात. भूपृष्ठावर पसरणारी नम्र फांदी अग्राशिवायकरून सर्वस्वी भुंडी किंवा पर्णरहीत नग्न अशी वाढून अग्रकळीच्या खालच्या भागापासून उपरीं मुळें फुटून वरच्या बाजूस नवपल्लव वाढलेला असेल व पुन्हां पहिल्याप्रमाणें या पल्लवाच्यॉ खालच्या एखाद्या पानाच्या कैचींतून एक फांदी उत्पन्न होऊन तिचाहि अग्राच्या पाठीमागचा सर्व भाग पत्ररहित नग्न राहून अग्राजवळ पुन्हां नवीन पल्लव व उपरीं मुळें उत्पन्न होऊन पुन:मागच्याप्रमाणें सरपटणारी फांदी उत्पन्न होऊन वाढ सुरू राहील तर अशा प्रकारच्या प्रत्येक सुतळीप्रमाणें बारीक असणार्‍या फांदीस धावती फांदी अथवा धावक असें म्हणतात. सरळ न वाढणार्‍या खोडांचे आणखी दोन प्रकार लता अथवा वेलांत सांपडतात. घेवडा, मधुमालती व आकाशवेलाप्रमाणें कांहीं वेल आपल्या लवचिक स्कंधानें आश्रय देणार्‍या वस्तूस वळसे घालून सूर्यप्रकाशांत आपलीं पानें वर चढविण्याची खटपट करतात. अशा प्रकारच्या खोडास वळसेदार किंवा आपरिवेष्टी स्कंध असें म्हणतात.

वाटाणा, भोपाळा, द्राक्ष, काकडी वगैरे वनस्पतींचे वेल आश्रय देणार्‍या वस्तूवर आपल्या खोडानें वळसे न घालतां खोडापासून उगवणार्‍या प्रतानांनीं (मुळांनी) किंवा कांट्यांनीं त्यास धरून त्यावर चढतात. अशा खोडास किंवा फांदीस चढणारी किंवा आरोही असें म्हणतात. पोथॉस व आयव्ही या वनस्पतींचे वेल खोडापासून उत्पन्न झालेली आपलीं उपरी मुळें दुसर्‍या झाडाच्या सालींत घुसवून अशा प्रकारें आपल्या लवचिक शक्तिहीन खोडास आश्रय देऊन वर चढतात. द्राक्ष, भोपळा व प्लॅसीफ्लोरा या वेलांत ''प्रतानें'' पानांजवळ कक्षबाह्य अथवा कक्षस्थ रीतीनें उगवून तसेच वाटाण, लाख, ग्लोरिओझा, सोलॅनभ, जॅस्मिनॉयडीज, बिग्नोनिया व हिरवा चाफा या वेलांत पानें अंशतः अथवा सर्वथा प्रतानरूप होऊन व तीं प्रतानें जवळच्या आश्रय देणार्‍या वस्तूवर गुंडाळतात व अशा रीतीनें आधार घेत घेत ते वेल वर चढतात. मार्शलनील जातीचा गुलाब व बोगनव्हीलिया या दोन्ही वनस्पतींचे वेल आपले कांटे आश्रयाच्या वस्तूंत रोवून वर चढतात.

कांहीं वनस्पतींत खोड वायुगत नसून भूमिगत असतें. निदान शाखापल्लव उत्पन्न करणारा खोडाचा भाग सर्वस्वी भूमिगत असतो. अशा प्रकारें जमिनींत मुळांप्रमाणें वाढणारें खोड वर वर पहातां मुळांप्रमाणें दिसतें परंतु न्याहाळून पाहिलें तर त्यावर पातळ पातळ पापुदर्‍यासारखीं फिक्या किंवा भुर्‍या रंगाचीं पानें किंवा त्यांचे व्रण तसेंच कळ्या उत्पन्न झालेल्या दृष्टीस पडतात. जमिनींत राहिल्यानें त्यांमध्यें हिरवा रंग दृष्टीस पडत नाहीं पण पानें व कळ्यांच्या अस्तित्वानें तें मूळ नाहीं, खोड आहे हें ओळखतां येतें अशा प्रकारच्या भूमिगत स्कंधाची वाढ व अवयवरचना सर्व वनस्पतींत सर्वथा सारखी नसते. म्हणून भूमिगत स्कंधाचे रचनेच्या वैशिष्टयामुळें जे भेद होतात ते पुढें दिले आहेत:-

(१) मूलमूर्ती:- हें खोड जमिनीत सामान्यत: आडवें व क्वचित वनस्पतींत तें उभेंहि वाढतें व त्याचा विस्तार अन्न कलिकेच्या किंवा कक्षस्थ कळ्यांच्या वाढीनें झालेला असतो. अशा रीतीनें उत्पन्न झालेला फांद्यांचा किंवा खोडाचा कांहीं भाग जमिनीबाहेर वाढून त्यावर फुलें लागतात. कांहीं वनस्पतींत हा विस्तार वेषधारी शाखा-प्रबंधाप्रमाणें होतो. वेषधारी मूलमूर्तीमध्यें प्रत्येक वर्षाच्या वाढीचा हिस्सा जागजागीं पडलेल्या व्रणांनी किंवा विशिष्ट भागींच तेवढया झालेल्या संकुचित भागांनीं ओळखतां येतो. या जातीचें मूलमूर्ती अन्नसंग्रहामुळें बरेच पोसलेले असे दिसतात (उदा. आलें, हळद, कर्दळ, पांढरें कमळ इ.) परंतु कांस व पुदाण्यांत मूलमूर्ती वाळका अथवा रोड असल्यामुळें लांब वाढलेला असतो. दोन्ही प्रकारांत मूलमूर्तीच्या पृष्ठभागावर पेरीं व कांडयांचे भाग स्पष्ट दिसतात तसेचं अर्धवट गळून पडलेल्या ऊर्णामय पानांचे हिस्से व कळ्या आणि खालच्या पृष्ठभागापासून उत्पन्न झालेलीं उपरीं जटादार मुळेंहि दृष्टीस पडतात.

दृढकंद :- हा एक भूमिगत स्कंधाचा मूलमूर्तीसारखाच प्रकार आहे. फरक इतकाच कीं यामध्यें खोडाचा विस्तार फारसा होत नाहीं, तें आखुडच रहातें. व दोन चार पेरीं व कांडयांच्या खुणांपेक्षां जास्त खुणा बहुतकरून त्यावर आढळत नाहींत. सुरणाच्या भूमिगत खोडाप्रमाणें त्याचा आकार कांहीमध्यें चिकण्या सूपारीसारखा अनियमित रीतीनें वर्तुलाकार असून बसकट असतो. नव्या कळ्या उत्पन्न होऊन नवींन वाढ सुरू झाली म्हणजे जुन्या दृढकंदांत संग्रह केलेलें अन्न शोषून त्या कळ्या वाढतात. म्हणून नवीन वाढींत जुन्या दृढकंदाचा क्षय होत जात असल्यामुळे त्याचा विस्तार वाढत नाहीं. व वाढला तर रूंदींत वाढतो, लांबींत वाढत नाहीं. दृढकंदांत कळ्या बाजूपासून उत्पन्न न होतां बहुतकरून वरच्या बाजूस मध्यभागीं त्या असतात. कांहीं दृढकंदांत ऊर्णे सांपडतात व कांहींत तीं मुळींच नसतात (सुरण, गोराडू, अळूं).

गठिल:- भूमिगत स्कंधाच्या ह्या प्रकारांत खोड गांठीप्रमाणें अगदीं संकुचित विस्ताराचें असतें. त्यावर कांडीं, पेरीं किंवा ऊर्णांच्या खुणा दृष्टीस पडत नाहींत. कळ्या सुद्धां अत्यंत लहान असून सहज दृष्टीस पडत नाहींत. पृष्ठभागावर ठिकठिकाणीं जे खोलगट भाग असतात त्यांमध्यें ह्या बारीक कळ्या बृहद्ददर्शक कांचेच्या साहाय्यानें दृष्टीस पडतात. या कळ्यांस प्रचारांत डोळे म्हणतात. गठिल हा भूमिगत स्कंधाचा मुख्य भाग नसतो तर त्यापासून जमिनींतच उगवणार्‍या फांदीच्या टोंकाचा भरीव गांठीप्रमाणें फुगलेला भाग असतो (उदाहरण: बटाटे). सूक्ष्म कळ्यांच्या अस्तित्वांत शिवाय दुसरें कोणतेंच बाह्य चिन्ह इतर भूमिगत स्कंधाप्रमाणें ह्यांत आढळत नाहीं. ज्या मुळाप्रमाणें दिसणार्‍या भागांच्या टोकांवर गठिल लागलेले असतात त्यांची पेशीय अंतर्रचना अगदी स्कंधाच्या अंतर्रचनेप्रमाणें असते. म्हणून गठिल हा मूळचा भाग नसून तो भूमिगत स्कंधाचाच एक प्रकार आहे यांत संशय नाहीं. कळ्यापासून नवीन पल्लव उत्पन्न होत असल्यामुळें हे गठिल जममिनींत पेरून नवें पीक काढतां येतें.

कंद :- ह्या प्रकारांत वास्तविक रीतीनें स्कंधाचा भाग फारच थोडा वाढलेला असून त्यांवर लागलेली ऊर्णे जाड असून तीं कळींतील पानाप्रमाणें एकमेकांवर गुंडाळलेली असतात. जमिनीवर जीं हिरवी पानें दिसतात त्यांचा उगम खरोखर ह्या जमिनींतील छोटेखानी स्कंधापासूनच बहुतकरून झालेला असतो. जेवढा भाग जमिनीवर सूर्यप्रकाशांत आलेला असतो तेवढाच हिरवा होऊन बुडाचा भूमिगत भाग वर्णहीन पांढरा अथवा तांबूस रंगाचा असतो. अशा रीतीनें कंदाची जाडी कळीच्या जाडीप्रमाणें व उकललेल्या व एकमेकांवर गुंडाळलेल्या पानांच्या योगानें झालेली असते. ह्या पानांपैकीं कांहींच्या कैचींत नवीन कळ्या उत्पन्न होऊन त्यांच्या वाढीनें जुन्या कंदांपासून नवे कंद तयार होतात. कंदाचे दोन प्रकार आढळतात: अ) चोलधारी कंद:- ह्यांत कांदा व लसुणाच्या गड्डयाप्रमाणें ऊर्णें एकावर एक पूर्ण तर्‍हेनें गुंडाळलेलीं असतात.
(आ) ऊर्णखंडधारी अथवा खवलेदार कंद:- ह्यांत कंदाच्या पृष्ठभागावर लहान लहान ऊर्णें, घरावरील कौलांप्रमाणें पसरलेलीं असतात. वर दिलेल्या वायुगत आणि भूमिगत स्कंध व शाखांच्या प्रकाराशिवाय शाखांचे आणखी तीन प्रकार सांपडतात. या तिन्ही प्रकारांत शाखांचें बाह्यरूप अगदीं बदलून गेलें असल्यामुळें अशा शाखांनां विकृत अथवा रूपान्तरित शाखा असें म्हणतात.

रूपान्तरित शाखा कांटयासारखी कठिण, टोंकदार व पर्णरहित असली तर तीस कंटक म्हणतात; ती बारीक दोर्‍यासारखी असून स्पर्शचेतन किंवा स्पर्शवेदी असेल तर तीस सूत्रशाखा असें म्हणतात; तसेंच शाखेंचें किंवा स्कंधाचें रूपान्तर पानाप्रमाणें होऊन ती शाखा पानाप्रमाणें हिरवी होऊन पसरट वाढली असेल तर तीस पर्णशाखा असें म्हणतात. फांद्यापासून जशा डहाळ्या फुटतात त्याप्रमाणें कंटक व सूत्र (प्रतान) शाखांपासून सुद्धां नवीन कांटे व सूत्रें (प्रतानें) उत्पन्न होतात. कधीं कधीं कटंकशाखेवर तिची कांहींशी वाढ झाल्यावर पानें उत्पन्न होऊन तीस सामान्य शाखेचें स्वरूप प्राप्त होतें. परंतु अशीं पानें नसलीं तरी पानांच्या कैचीतून त्यांची उत्पत्ति झाली असल्यानें त्या खुरटया, टोंकदार, पर्णरहित व रूपान्तरित अथवा विकृत शाखा आहेत हें ओळखतां येतें.

गुलाबाच्या खोडावर जे कांटे आढळतात त्यांकडे न्याहाळून पाहिलें तर असें आढळून येईल कीं, ते कांटे कक्षस्थ नसून खोडाच्या सालीपासूनच कक्षबाह्य असे वाढलेले आहेत व फांद्याप्रमाणें स्कंधांच्या काष्ठमय भागाशीं त्यांचा सांधा झालेला नाहीं. सालीपासून सहज रीतीनें ते काढतां येतात. अशा प्रकारच्या टोंकदार भागास वनस्पतिशास्त्रांत कंटक न म्हणतां दुसर्‍या नांवानें संबोधितात. आपण त्यास शूक असें नांव देऊं. वांग्यांच्या पानावर व फळावर, वेताच्या खोडावर, पानावर निवडुंगाच्या फणेवर व फळावर सूक्ष्म व लवचिक कांटे केवळ पृष्ठभागापासून उत्पन्न झालेले असतात. कंटकशाखाप्रमाणें ते कक्षस्थहि नसतात व शूकाप्रमाणें सालींत रूतलेलेहि नसतात. अशा प्रकारच्या पृष्ठभागाशीं संलग्न असलेल्या कांटयास स्वंतत्र नांवानें संबोधणें शास्त्रदृष्टया जरूर असतें म्हणून आपण अशा कांटयास शल्य हें नांव देऊं. याप्रमाणें कंटक, शूक व शल्य अशा तीन प्रकारचे कांटे असतात; त्यांपैकीं हेच तेवढे विकृत शाखांच्या कोटींत येऊं शकतात.

पर्णशाखा पानाप्रमाणें दिसल्या तरी ऊर्णासारख्या सूक्ष्म पानांच्या कैचींत त्यांची उत्पत्ति झालेली असल्यामुळें व तसेंच त्यावर फांद्यांप्रमाणें हंगामांत फुलेंहि उत्पन्न होत असल्यामुळें हे पानाप्रमाणें दिसणारे भाग विकृत शाखा आहेत हें सिद्ध करतां येतें. निवडुंग, रसकस, झिलोफिला इत्यादि वनस्पतीत अशा पर्णशाखा आढळतात.

अयोनिज अथवा नग्नबीज वर्गांत स्कंध वायुगत असतो व ह्या वर्गांतील पाइन जातीच्या वनस्पतींत तो सरळ व खवलेदार सोटाप्रमाणें वाढून त्यापासून कांहीं लांब व कांहीं आखूड फांद्या फुटतात. या आंखूड फांद्यावरचीं पानें लांब सुयाप्रमाणें बारीक असून हिरवीं असतात. याशिवाय इतर सर्व पानें ऊर्णाप्रमाणें फिक्या किंवा तपकिरी मळक्या रंगांची असतात. ह्यापैकी निटॅसी कुलांतील झाडांच्या स्कंधांचीं कांडीं व पेरीं स्पष्टपणें दृष्टीस पडतात. सायकॅडॅसि कुलांतील झाडांचे स्कंध नारळ, शिंदी, पोफळ इत्यादि झाडांप्रमाणें सुळकेदार व शाखारहित असतात. मात्र त्याच्या पृष्ठभागावर गळून पडलेल्या पानांच्या बुडांचे भाग खवल्याप्रमाणें चिकटलेले रहातात व त्यामुळें खोडाचा पृष्ठभाग नारळ किंवा पोफळीप्रमाणें गुळगुळीत न रहाता खडबडीत असतो (उदा. साबुदाण्याचें झाड).

हंसराजवर्गांतील हंसराजांत खोड भूमिगत असून मूलमूर्तीसारखें असतें. सिलाजिनेलांच्या मुग्दलोपवर्गांत खोड व फांद्या बहुतकरून जमिनीवर प्रसारी खोडाप्रमाणें पसरलेल्या असतात. अश्वपुच्छांच्या उपवर्गांत खोड मूलमूर्ती असून याचा कांहीं भाग वायुगत होऊन सरळ वाढतो. आणि त्या पासून वर्तुळवर्ती फांद्या फुटतात. फांद्यापासून डाहाळ्याहि वर्तुळवर्ती रीतीनेंच फुटतात. वायुगत खोडाचा मुख्य भाग व त्यावरील फांद्या व डाहाळ्या बारीक कांड्याप्रमाणें असल्यामुळें हा भाग घोड्याच्या शेपटीप्रमाणें दिसतो आणि म्हणूनच ह्या उपवर्गास अश्वपुच्छ हें नांव दिलें आहे.

शैवालवर्गांत स्कंध फक्त खर्‍या शैवालांतच तेवढा आढळतो व तोहि सुतासारखा बारीकच असतो. व त्यावरचीं पानेंहि सूक्ष्मच असतात. शैवालवर्गापासून खालच्या सर्व वर्गांत वनस्पतीचें मुख्य शरीर हंसराजसपुष्पवर्गाप्रमाणें स्वयंस्फुटधारी अवस्थेंत नसून संभोगस्फुटधारी अवस्थेंत असल्यामुळें यथार्थतः या वर्गांतील स्कंधाचें व उच्च वर्गांतील स्कंधाचें खरें साम्य नसतें.

पाणवनस्पतींत कालेरपा नांवाच्या हिरव्या, मॅक्रोसिस्टिस नांवाच्या बदामी रंगाच्या व चारा नांवाच्या हिरव्या पाण्वनस्पतींत बारीक सुतासारखा स्कंध असतो व त्यावर बारीक पानासारखे भाग लागलेले असतात. फ्यूक्स नांवाच्या बदामी व काँड्रस, गिगार, टिना इत्यादि तांबड्या पाणवनस्पतींत द्विंखडज रीतीनें वाढणारे पसरट पर्णशाखाप्रमाणें भाग असतात किण्व वनस्पतींत फक्त भूछत्रांतच त्यांच्या छत्रीच्या खालीं सरळ खोडाप्रमाणें भाग असतो. परंतु तो केवळ तंतुमय असल्यामुळें त्यांत खर्‍या स्कंधाप्रमाणें अंतर्रचना असत नाहीं. त्यांत काष्ठयुक्त भाग नसतो इतकेंच नव्हे तर त्याच्या आडव्या किंवा उभ्या छेदांत जी पेशिमय रचना दिसते ती केवळ आभासरूप असते, खर्‍या पेशी तेथें नसतात.

(३) पर्ण- वनस्पतीच्या चढत्या अक्षाचा तिसरा मुख्य भाग पानांचा असतो. कळीमध्यें खोड व पानें हे दोन्ही भाग असतात परंतु त्यांची वाढ झालेली नसल्यामुळें वरवरच्या चांचणींत ते स्पष्टपणें दृष्टीस पडत नाहींत. कळीची वाढ होऊन तिची फांदी झाली म्हणजे खोड व पानें हे दोन्ही भाग स्पष्टपणें दिसूं लागतात.

खोडावर पानें पेर्‍यापाशीं उगवतात. सामान्य व्यवहारांत प्रत्येक लहानमोठया हिरव्या चपटया भागास आपण पान म्हणतो. परंतु शास्त्रदृष्टया ज्या भागास पुरें पान किंवां पर्ण म्हणतात तो नेहमीच केवळ एकाच हिरव्या चपटया भागाचा बनलेला असतो असें नाहीं. पुरें पान एकापेक्षां अधिक चपटया भागांचेहि झालेलें असूं शकतें. उदाहरणार्थ आंब्याची एक डाहाळी व बेलाची एक डहाळी तोडून त्यावर लागलेल्या पानांची चांचणी केली तर असे आढळून येतें कीं, आंब्याचें पुरें पान एकाच लांबट चपटया हिरव्या भागाचें झालेलें आहे व बेलामध्यें असे तीन चपटे भाग एकाच पानाच्या देंठावर लागलेले असतात. अशा रीतीनें पान जेव्हां अनेक चपटया भागांचें झालेलें असतें तेव्हां पानाचा उगम खरोखर कोठून झाला आहे हें समजण्यास एकच साधन असतें, तें हें कीं, पानाचा उगम खरोखर ज्या ठिकाणी झालेला असतो त्या ठिकाणीं त्याच्या कैचींत किंवा कक्षेंत एखादी कळी किंवा नुकतीच वाढीस लागलेली फांदी सांपडतें. अशा रीतीनें पानें आंब्याप्रमाणें साधीं असोत किंवा बेल, तूर, अंबूशी, हरभरा, वाटाणे, बाभूळ व शेवगा इत्यादि वनस्पतींच्या पानाप्रमाणें अनेक चपटया भागांचीं झालेलीं असोत, कक्षस्थ कळी किंवा कोंवळी फांदी कोठें उगवलेली आहे हें पाहून पुर्‍या पानाचा उगम व विस्तार निश्चित करतां येतो. बेलाच्या किंवा तुरीच्या प्रत्येक चपटया भागाच्या कक्षेंत कळी किंवा डाहाळी नसते तर ज्या देंठावर तीन तीन चपटे भाग लागलेले असतात त्या देंठाच्या तळापाशी खोड व देंठ यांच्यामध्यें झालेल्या वरच्या कोणांत ती आढळते. अशा रीतीनें पानांचे २ प्रकार आढळतात: (१) केवळ एकच चपटया भागांची झालेलीं अथवा सरळ किंवा साधीं. (२) एकापेक्षां जास्त स्वतंत्र असे चपटे भाग असलेली अथवा संकीर्ण किंवा संयुक्त; यांपैकीं प्रथम आपण साध्या पानांचाच विचार करूं.

साधें पान अथवा सरळ पर्ण:- सण किंवा जास्वंदीच्या पानांची तपासणी, तीं फांद्यावर किंवा मुख्य खोडावर लागलेलीं असतांना केली असतां असें दिसतें कीं, प्रत्येक नवीन पानांत निरनिराळ्या बाह्यरूपाचे तीन भाग स्पष्टपणें वाढलेले असतात: (१) देंठ किंवा दंड- वरचा चपटा हिरवा भाग आपल्या शिरावर धारण करणारा मुठीसारखा भाग (२) दल-(वरचा चपटा भाग) पत्र. (३) कर्ण-देंठाच्या बुडाशीं लागलेले दोन बारीक पानासारखे भाग. आदर्शभूत पर्णाची बाह्यरचना वरील प्रकारची असते. देंठ बारीक व चिंचोळा असतो; दल अखंड असतें व कर्णहि बारीक व हिरवे असतात. दलामध्यें मध्यभागी एक सर्वांहून जाड शीर असून त्यापासून असंख्य बारीक शिरा (रेषा) फुटून त्यांचें जाळें हिरव्या भागांत पसरलेलें असतें. दलाच्या वरच्या टोंकास अग्र म्हणतात, व अग्रापासून दलाच्या तळापर्यंत दोहों बाजूंस ज्या कडा असतात त्यांस धारा म्हणतात. याप्रमाणे नमुनेदार पानामध्येंजे भाग असतात ते सर्व सर्वप्रकारच्या वनस्पतीच्या पानांमध्यें सांपडत नाहींत इतकेंच नव्हे तर अग्र, धारा व शिरा यांचीहि रचना व ठेवण सर्व जातींच्या पानांत एकाच प्रकारची आढळत नसल्यामुळें या प्रत्येक भागाविषयीं जी भिन्नता आढळते ती विचारांत घेंऊन पानांचे जे अनेक प्रकार शास्त्रदृष्टया केले जातात त्यांचें आतां वर्णन करूं.

दंड अथवा देंठ:- देंठाचा आकार भरीव सळईसारखा असून सामान्यत: त्याच्या वरच्या पृष्ठाची बाजू थोडी खोलगट किंवा सपाट असते. खालच्या तळाकडची बाजू जाड असते व वरच्या म्हणजे दलाकडच्या बाजूस तें निमुळतें किंवा बारीक होत जातें. अंबा, रानशिशवी, बहावा इत्यादि झाडांच्या पानांचे देंठ बुडाशीं भरीव गांठीसारखे जाड झालेले असतात. अशा प्रकारच्या जाड बुडास देंठाचा ''तुंबा'' असें म्हणतात. कांहीं पानांचा तुंबा भरीव गांठीसारखा न वाढतां पोकळ होऊन स्कंधास कवटाळतो. ह्या स्थितीत अर्थातच स्कंधाचा सुळका तुब्यांमधून वर आलेला दिसतो. अशा पानास आलिंगी (स्कंधालिंगी) पान म्हणतात. मका, गहू, नारळ, पोफळ इत्यादि झाडांच्या पानाचें देंठ भरीव मुठीप्रमाणें न वाढतां पसरट होतात. व त्यामुळें देंठाची सुरळी पेर्‍यापासून कांड्यावर कांहीं अंतरापर्यंत गुंडाळलेली असते-जणूं काय या पसरट देठाचें म्यानच कांड्यावर चढलेलें दिसतें-म्हणून अशा प्रकारच्या देंठास ''म्यानदार'' म्हणतात. पपनस, कागदी लिंबु, ऑस्ट्रेलिया देशांत सांपडणार्‍या कांहीं बाभळी यांच्या पानांच्या देंठाच्या दोहों बाजूंस दलाच्या हिरव्या भागासारखे पातळ पसरट हिरवे भाग वाढलेले असल्यामुळें खर्‍या दलाखालीं हें एक दुसरें दलच लागल्यासारखें दिसतें व त्यामधील जोड स्पष्ट दिसतो. अशा प्रकारच्या दलरूपी देठास पंखाचें देंठ म्हणतात. देंठ असलेल्या पानास देंठाचें पान म्हणतात. परंतु कांहीं झाडांच्या पानांस देंठच नसतात. त्यांचीं प्रत्यक्ष दलेंच खोडावर चिकटलेलीं असतात. अशा बिन देंठाच्या पानास बसकें पान म्हणतात (उदा. पिंवळा धोत्रा) बसकें पान असून त्याच्या दलाच्या कांहीशा रूंद हिरव्या कडा पानाच्या बैठकीच्याहि खाली स्कंधावर चिकटलेल्या असल्या तर त्या पानास अधोधावी पान म्हणतात (उदा. बालकंद).

शिरसू, अफू, म्हातारा इत्यादि हरितकांचीं पानें बसकीं असून त्यांच्या दलांचीं खालचीं दोहों बाजूंची पाळीं जास्त वाढून पानाच्या उलट बाजूंस जणुं काय हत्तीच्या कानाप्रमाणें पसरलेली असतात. अशा पानांस कर्णाकार म्हणतात. कर्णाकार पानांच्या सुटया पाळीं आपल्या आंतील व बाहेरील कडांनी एकमेकांस चिकटून त्यांचा पक्का सांधा झाला असतां दलामधूनच खोड जणूंकाय वर आल्यासारखें दिसतें. अशा पानास भिंग्रीदार पान म्हणतात (ब्ल्युपेरम). कधीं कधीं एकमेंसमोर एकाच पेर्‍यावर लागलेल्या दोन बसक्या पानांच्या पाळीं एकमेकास चिकटून त्यांच्या कडांचा सांधा पक्का हाऊन हीं दोन दलें पेर्‍यावर दोन वल्ह्यांप्रमाणें पसरलेलीं असतात. अशा पानास वल्हेदार (क्षेपण्याकार) म्हणतात (हनी सकल). पानाचा देंठ दलाच्या तळाला मध्यभागी सामान्यतः लागलेला असतो. परंतु कमळ, अळू, नॅस्टरटिअममध्ये तो तळाशीं लागलेला नसून पानाच्या पाठीस मध्यभागी किंवा मध्यभागाजवळ लागलेला असतो. अशा स्थितींत दल वाटोळे असलें म्हणजें देठावर दलाची ढाल अडकवल्यासारखी दिसते. अशा पानास ढालदार किंवा छत्राकार म्हणतात. पानाच्या दलाचा आकार वाटोळा नसला तरी देंठ पाठीस चिकटलेला असल्यास त्या पानास सुद्धां ढालदार म्हणतात (उ.अळू).

पानाचे कर्ण सामान्यत: पानाच्या देंठाच्या बुडाशीं डाव्या उजव्या बाजूस एक एक अशा रीनीनें दोन लहान लहान दलांप्रमाणे लागलेले असतात. हे कर्ण प्राय: सुटे असतात. परंतु कांही वनस्पतीत यांचे स्वरूप निरनिराळ्या कारणांनी पालटलेलें असतें. अशा कर्णास त्यांच्या स्थित्यनुरूप निरनिरांळी नांवें देतात. वाटाण्याचे कर्ण मोठे व रूंद असल्यामुळें ते स्वतंत्र पानाप्रमाणेंच दिसतात. म्हणून अशा कर्णास पर्णरूप म्हणतात. बोर व बाभळींत ते कांटयासारखे टोकदार व कठिण झालेले असतात. म्हणून त्यांस शल्यरूप म्हणतात.


स्मायलॅक्स नांवाच्या वनस्पतींत कर्ण खालच्या बाजूंस देंठास चिकटून त्यांचा अग्रभाग प्रतानाप्रमाणें सूत्राकार झालेला असतो. म्हणून त्यास प्रतानरूप म्हणतात. गुलाबाच्या कर्णाप्रमाणें ते देंठास चिकटलेले असले तर त्यांस आसंगत म्हणतात. जास्वंदीप्रमाणें तीं लहान व सुटी असलीं म्हणजे त्यांस स्कंधेय किंवा शाखेय म्हणतात. कांही वनस्पतींत कर्णांच्या बाहेरच्या कडांचा संयोग झाल्यानें एक धाकटेसें जणुं काय स्वतंत्र असें बारीक पानच खर्‍या पानाच्या देंठाच्या उलट बाजूस उगवलेलें दिसतें. अशा कर्णास संमुखी म्हणतात. कांहीं वनस्पतींत कर्ण एकमेकांस चिकटून देंठाच्या कैचींत कळीप्रमाणें उगवलेले दिसतात. म्हणून त्यास कक्षस्थ म्हणतात. कूटूच्या झाडाच्या कुलांत कर्णांच्या कडांचा संयोग होऊन पेर्‍याच्या वरच्या बाजूस कांहीं अंतरापर्यंत त्यायोगें झालेल्या नळीचें म्यान स्कंधावर चढलेलें आढळतें. अशा कर्णास मोजेदार म्हणतात. कदंब-डिकेमाली इत्यादि झाडांच्या कुलांत प्रत्येक पेर्‍यावर परस्पर समोरासमोर दोन पानें उगवतात.व त्यांचे कर्ण एकमेकांस चिकटून जणूं काय समोरासमोरील दोन देठांच्या मध्यभागी दोन्हीं बाजूस एक एक कर्ण उगवल्यासारखा दिसतो, अशा कर्णास अंतर्वर्ती, अंतराळी किंवा दंडान्तराली म्हणतात.

पानाचा तिसरा व सर्वांत महत्त्वाचा भाग दलाचा असतो. दलाचें वर्णन त्याच्या अग्रकडा (शिरा), पृष्ठभाग व संख्या व व्यवस्था इत्यादि कित्येक निरनिराळ्या दृष्टीनीं करतां येतें. ज्या पानास एकच दल असतें त्यास साधें पान म्हणतात व ज्यास एकाहून जास्त दलें असतात त्यास संयुक्त पानें म्हणतात. प्रथम आपण साध्या पानांचा विचार करूं. साध्या (सरल) पानांचे शिरांच्या रचनेप्रमाणें २ प्रकार आढळतात. (१) करतलाकार व (२) पक्षाकार. करतलाकार साधें पान हाताच्या पंजाएवढें रूंद असून त्यामध्यें एकाहून जास्त जाड शिरा दलाच्या तळापासून निघून त्या दलामध्यें हाताच्या बोटाप्रमाणें पसरलेल्या असतात. या जाड शिरांपासून अनेक बारीक, सूक्ष्म व अतिसूक्ष्म असे फांटे फुटून त्यांचे जाळें हिरव्या मृदु भागांत पसरलेलें आढळतें. दालचिनी व स्मायलेंक्स या वनस्पतींच्या दलामध्येंहि एकाहून जास्त शिरा तळापासून पसरलेल्या असतात व त्यांस अनेक फांटे फुटून त्यांचे जाळेहि झालेलें असतें. परंतु मुख्य जाड शिरा दलाच्या कडाकडे न पसरतां षेंड्याकडें पुन्हां एका जागीं केंद्रीभूत होतात. या रचनेस बरगडीदार रचना म्हणतात.

पक्षाकार शिरांची रचना असलेल्या साध्या पानांत एकच मुख्य जाड शीर असते व तीपासून दोहों बाजूंस पिसाच्या केंसाप्रमाणें फांटे फुटलेले असतात. पानहि पिसाप्रमाणें लांबट असून रूंदीनें कमी असतें (अंबा व पेरू) यामध्येंहि बारीक सूक्ष्म शिरांचें जाळें झालेले असतें. परंतु केळ, कर्दळ, नारळ, पोफळ व शिंदी या झाडांची पानें पाहिलीं असतां असें आढळून येईल कीं, यामध्येंहि दलाची ठेवण पिसाप्रमाणें असून मध्यें एक जाड शीर व तिच्यापासून बारीक शिरा पिसाच्या केंसाप्रमाणें फुटलेल्या असतात. परंतु आंबा, पेरू व कण्हेराच्या पानाप्रमाणें त्यास आणखी बारीक फांटे फुटून त्यांचें जाळें झालेलें नसून त्या समान्तरच रहातात.

गहूं, बाजरी, मका इत्यादि एकदल धान्य देणार्‍या वनस्पतीच्या पानांची या दृष्टीनें परीक्षा केली असतां असें आढळतें कीं, दलाचा आकार पक्षाकार पानाप्रमाणें दिसतो. परंतु शिरांची रचना मात्र मात्र पक्षाकार नसते. सर्व शिरा लांब असून तळापासून षेंड्याकडे जवळ जवळ सरळ समांतर अशाच पसरलेल्या असतात. ताडाच्या कांही जातीत दलाच्या सर्व शिरा तळापासून निघून किरणाप्रमाणें दलाच्या कडाकडे समांतर पसरलेल्या असतात. पानाची ठेवण करतलाकार असते परंतु त्यामध्यें शिरांचे जाळें झालेलें नसतें. याप्रमाणें शिरांच्या रचनांचे दोन मुख्य प्रकार आढळतात:(१) जाळीदार व (२) समांतर; पैकी पहिल्या प्रकारांत तीन पोटभेद सांपडतात: (अ) पक्षाकार, (आ) करतलाकार व (इ) बरगडीदार. दुसर्‍याचेहि दोन पोटभेद सांपडतात: (अ) सरळ शिरादार (गंहू, मका, खारीक) व (आ) वक्र शिरादार (केळ, कर्दळ) साध्या पानांच्या अग्राचे पुढें दिल्याप्रमाणें कित्येक प्रकार सांपडतात:
(१) लघुकोणाकार:- अग्रभागीं दलाच्या कडामधील भाग लघुकोणाकार असतो व अग्राचा भाग लहान असतो (अंबा, कण्हेर). (२) वर्तुल, स्थूल (वाटोळें):- अग्र निमुळतें नसून दलाचा वरचा भाग कमानीप्रमाणें वाटोळा असतो (घोळ). (३) कांटेदार कंटकिताग्र टोंकदार होऊन काटयासारखें कठिण असतें. (घायपात). (४) पुच्छाकार:- अग्रभाग षेंपटीप्रमाणें लांब वाढलेला असतो (पिंपळ). (५) निम्न:- अग्रभाग खालच्या बाजूस दबलेला असतो (मोठे करवंद) (६) चर्वित:- अग्रभाग जनावरानें खाऊन कुरतडल्यासारखा वांकडातिकडा असतो (भिरली, माड). (७) रोमाग्री:- दलाचा वरचा भाग स्थूल असून मध्यभागीं एक बारीक केंसासारखें शल्य असतें.

पानांच्या कडामध्येंहि बरीच विविधता आढळतें: (१) अखंड:- पानाची कड खाचेदार नसून सरळ असते, (अंबा, जांभूळ). (२) तरंगित (लाटाकार):- कडा वास्तविक अखंड असतात परंतु त्या सरळ ताणलेल्या नसून पाण्याच्या लाटांप्रमाणें नागमोडीसारख्या दिसतात (उदा. अशोक). (३) दंतुर (दांतेदार):- कड अखंड नसून करवतीच्या दांत्याप्रमाणें दांताळलेली असते व हे दांते जवळ जवळ आडवे असतात. (४) क्रकचाकार अथवा करवती:- कड दांतेदार असून दांते अग्रभागाकडे झुकलेले असतात (गुलाब, ज्यूट). (५) स्थूलदंतुर- कड दांतेदार असते परंतु दांते टोंकदार नसून बोथट वाटोळे झालेले असतात (ब्रायोफायलम). (६) शल्यमय:- कडांवर कांटे असतात (घायपात) (७) कराल (कुरळी):- कड फारच वांकडीतिकडी व अव्यवस्थित रीतीनें करवडलेली असते. तिसर्‍या , चवथ्या व पांचव्या प्रकारांत जेव्हां दांत्यावर दांते फुटलेले असतात तेव्हां त्या प्रकारास द्विगुण अथवा दुहेरी असें म्हणतात. उदाहरणार्थ दुहेरी (द्विगुण) दंतुर; (द्विगुण क्रकचाकार) अथवा दुहेरी करवती (द्विगुण स्थूल-दंतुर).

क्रकचाकार (करवती) कडेचे दांते जेव्हां अग्राकडे वळलेले नसून बुडाकडे वळलेले असतात तेव्हा अशा कडेस उलट करवती अथवा प्रतिलोम क्रकचाकार म्हणतात. कडांवर पडलेले खांचे खोल असले म्हणजे त्या कडांस व पानांस पाळीदार पान म्हणतात. पाळीदार पानें करतलाकार व पक्षाकार शिरारचनांच्या साध्या पानांत सांपडतात व या खाचांच्या कमीअधिक खोलीप्रमाणें पाळीदार पानांचे पुढील तीन भेद बनतात:-
(१) शकलयुक्त पक्षाकार करतलाकार- या पानांचे खांचे कडापासून मध्यशिरेपर्यंतच्या किंवा करतलाकार पानांत दलाच्या बुडापर्यंतच्या जास्तीत जास्त अर्ध्या अंतराइतके खोल असतात. (२) खंडयुक्त पक्षाकार करतलाकार:- या पानांचे खांचे मध्यशीर किंवा दलाच्या बुडापपासून तीनचतुर्थांश अंतराइतके खोल असतात. (३) भागयुक्त पक्षाकार (करतलाकार):- या पाळीदार पानांचे खांचे जवळ जवळ मध्यशिरेपर्यंत किंवा दलाच्या बुडापर्यंत खोल झालेले असतात. पाळीदार साध्या पक्षाकार पानांच्या खालच्या बाजूच्या पाळी लहान असून षेंड्यावरची पाळी सर्वांत मोठी व वाटोळ्या आकाराची असली म्हणजे त्या पानास वीणाकार म्हणतात (सलगम). परंतु षेंड्यावरची ही मोठी पाळी त्रिकोणीकार असून दांते बुडाकडे वाकडे वळलेले असले म्हणजे त्यास त्रिकोणशीर्षवक्रदंतुर असें म्हणतात. अशा रीतीनें खांचे मध्यशिरेपर्यंत किंवा दलाच्या अगदीं तळापर्यंत खोल झाले म्हणजे सर्व पाळी एकमेकापासून अगदी स्वंतत्र रीतीनें मध्यशिरेवर अथवा पानाच्या देंठाच्या डोक्यावर लागलेल्या असल्या म्हणजे त्या पानास अनुक्रमें पक्षाकार संयुक्त व करतलाकार संयुक्त (संयुक्त पक्षाकार व संयुक्त करतलाकार) असें म्हणतात. व अशा स्वतंत्र पाळीस पत्रकें म्हणतात. संयुक्त पक्षाकार पानांचे चार प्रकार केले जातात: (१) एकगुण पक्षाकार:- पत्रकें प्रत्यक्ष मध्यशिरेवर लागलेलीं असतात (कडुलिंब, शिशवी). (२) द्विगुण पक्षाकार-पत्रकें मध्यशिरेपासून फुटलेल्या पहिल्या वर्गाच्या शिरावर लागलेलीं असतात. यामध्यें मध्यशीर व पहिल्या वर्गाच्या उपशिरांवर दलाचा हिरवा भाग प्रत्यक्ष फुटलेला नसतो (बाभूळ, संकासूर). (३) त्रिगुण पक्षाकार:-पत्रकें दुसर्‍या वर्गाच्या उपशिरावर लागलेलीं असतात व मध्यशीर व पहिल्या व दुसर्‍या वर्गाच्या शिरा भुंड्या असतात (शेवगा). (४) बहुगुणसंयुक्त यांत पत्रकांची रचना त्रिगुण पक्षाकार पानापेक्षां जास्त संकीर्ण असते म्हणजे पत्रकें तिसर्‍या , चवथ्या इत्यादि वर्गाच्या उपशिरांवर चिकटलेली असतात. व निसर्गत:च तीं आकारानें फार संकुचित झालेलीं असतात. पक्षाकार पानांचीं पत्रकें दोन दोन अशीं सामान्यत: जोडीजोंडीने मध्य शिरेवर लागलेली असतात. परंतु रानशिशवीप्रमाणें ती कांहीं वनस्पतींत एकएकटींच लागलेलीं सुद्धा आढळतात.

ज्या पक्षाकार पानांत पत्रकें जोडीजोडीनें लागलेलीं असतात त्यांमध्यें सुद्धां कांहींच्या मध्यशिरेच्या डोक्यावर मध्यभागीं एक पत्रक असतें व कांहींच्या नसतें. अशा रीतीनें ज्या पक्षाकार पानांच्या पत्रकांची संख्या एक स्वंतत्र पत्रक षेंड्यावर उगवल्यानें विषम होतें त्यास विषमपक्षाकार व ज्यामध्यें पत्रकांच्या जोड्या षेंड्यावर एक पत्रक न फुटल्यानें कायम रहातात व त्या योगें पत्रकांची संख्या सम असते त्यास समपक्षाकार म्हणतात (उदा. बहावा). पक्षाकार पानांची पत्रकें लहान मोठीं असलीं म्हणजे त्या सभंग पक्षाकार म्हणतात. सभंग पक्षाकार पानांच्या खालच्या जोड्या लहान असून षेंड्यावरचें पत्रक सर्वांत मोठें व कांहींसें वाटोळ्या आकाराचें असलें म्हणजे त्यास वीणाकार म्हणतात. संयुक्त पानांच्या उपशिरा सामान्यत: अपरिमित शाखाप्रबंधाप्रमाणें फुटलेल्या असतात, परंतु क्वचित क्वचित पानांमध्यें त्या परिमित शाखांप्रमाणें फुटलेल्या आढळतात (इंगाउल्सिस = विलायती चिंच)

संयुक्तकरतलाकार पानांस पत्रकांच्या संख्येनुरूप द्विदल, त्रिदल, चतुर्दल, पंचदल, षड्दल, सप्तदल, बहुदल, द्विगुणत्रिदल, द्विगण चतुर्दल इत्यादि नांवें देण्यांत येतात. दलाचा आकार निरनिराळ्या वनस्पतींच्या पानांत निरनिराळ्या प्रकारचा आढळतो. कांहीं पानें लांबीला जास्त व रूंदींत कमी असतात. लांबट पानांच्या आकाराचें मुख्य प्रकार असे:- (१) सुचिरूप (सूच्याकार -) हें पान सुईप्रमाणें अगदीं अरूंद असून बरेंच लांब असतें (चीर). (२) रेषाकार:- हें पान सूच्याकार पानांपेक्षां थोडें जास्त रूंद असतें व त्याची लांबी रूंदीपेक्षां बरीच जास्त असते (गवताचीं पानें). (३) शूलाकार:- ह्या पानाची लांबी रूंदीच्या तीन चार पटीपेंक्षां जास्त असते व पान षेंड्याकडे व बुडाकडे निमुळतें असून मध्यभागीं त्याची रूंदी सर्वांत जास्त असते. (पांढरा किंवा लाल कण्हेर) (४) आयताकार:- हें पान लांबीनें रूंदीपेक्षां थोडें जास्त असतें व त्याचा वरचा व खालचा भाग वाटोळा असतो. (५) शराकार:- ह्या पानाचा आकार कांहींसा त्रिकोणाकार असून बुडाच्या दोहों बाजूस दोन त्रिकोणाकार पाळी सरळ खालच्या दिशेस लोंबलेल्या असतात. एकंदर आकार कांहीसा बाणाच्या टोंकाप्रमाणें दिसतो. (६) तोमराकार:- ह्या पानाचा आकारहि कांहीसा शराकार पानासारखा असतो. परंतु त्याच्या बुडाकडच्या त्रिक़ोणाकार दोन पाळी सरळ खालच्या बाजूस न वाढतां आडव्या वाढलेल्या असतात. (७) नलाकार:- हें पान नळाप्रमाणें पोकळ असून लांबट असतें (कांदा). (८) चमचाकार:- ह्या पानाचा आकार चमच्याप्रमाणें असतो. षेंड्याकडचा भाग रूंदट व बुडाकडचा त्यांपेक्षां अंरूद व चपटा असतो. (९) शंक्वाकार (पाचरदार):- हें पान रूंदीपेक्षा लांबीनें थोडेसेंच जास्त असतें आणि षेंड्याकडील भाग रूंद व बुडाकडील पाचरेप्रमाणें अरूंद व निमुळता असतो.

रूंदट पानाचे पुढीलप्रमाणें आकार:- (१) पिप्पलपत्राकार:- हें पान पिंपळाच्या पानाप्रमाणें बुडाशीं जास्त रूंद असून षेंड्याकडे कांहींसें निमुळतें असतें. (२) हृदयाकार- ह्या पानाचा आकार पिप्पलपत्राकार पानाप्रमाणेंच असतो परंतु ह्याच्या बुडाच्या दोहों बाजूंस दोन वाटोळ्या पाळी असतात. एकंदर आकार साधारणपणें हृदयासारखा दिसतो (समुद्रशोक). (३) प्रतिपिप्पलपत्राकार:- पिप्पलपत्राकार पानाच्या उलट आकाराचें हें पान असतें अर्थात त्याचा रूंद भाग षेंड्याकडे असून निमुळता भाग बुडाकडे असतो (फणस) (४) प्रतिहृदयाकार:- ह्या पानाचा हृदयाकाराच्या उलट आकार असतो. (५) मूत्रपिंडाकार (गुदाकार) - हें पान लांबीपेक्षां रूंदीनें थोडें जास्त असतें व वरचा भाग वाटोळा असून बुडाकडे दोन वाटोळ्या पाळी असतात (ब्राह्मी). (६) चक्राकार (बिंबाकार):- या पानाचा आकार चाकाप्रमाणें किंवा तबगडीप्रमाणें वाटोळा असतो. (७) छत्राकार (ढालदार):- हे पान चक्राकार पानाप्रमाणें वाटोळें असून त्याचा देंठ त्याच्या खालच्या पृष्ठाच्या मध्यभागीं लागलेला असतो व त्यामुळें पानाचा आकार छत्रीप्रमाणें दिसतो (कमळ).
(८) अर्धचंद्राकार:- अर्धचंद्राप्रमाणें या पानाचा आकार असतो. ह्याप्रमाणें कांही वनस्पतींचीं पानें जरी स्पष्ट आकाराचीं आढळतात तरी इतर वनस्पतींचीं पानें अशा रीतींनें विशेष प्रकारच्या स्पष्ट आकाराचीं नसतात. अशा पानांचा आकार ज्या दोन स्पष्ट आकारांच्या जवळजवळ येत असेल त्या दोहांचा नामनिर्देश करून उल्लेखण्याची इंग्रजीत चाल आहे. उदाहरणार्थ रेषारूपशूलाकार, छत्ररूपहृदयाकार इत्यादि.

पानांचा उगम:- कांहीं वनस्पतींचीं पानें भूमिगत खोडापासून तर कांहींचीं वायुगत भागावर उगवलेलीं असतात. तसेंच वायुगत खोडाचीं पानें कांहीं प्रत्यक्ष मुख्य खोडावर तर कांहीं त्यापासून फुटलेल्या शाखांवर लागलेली असतात. अशा रीतीनें पानांच्या उगमस्थानाची भिन्नता दर्शविण्याकरितां त्यांस निरनिराळी नावें देतात:- (१) मूलज (मूलीन)- हीं भूमिगत खोडापासून उत्पन्न झालेलीं असल्यामुळें जणूं काय मुळापासूनच उत्पन्न झाल्यासारखीं दिसतात व त्यामुळें जमिनींतून वर आलेलीं असतात (कांदा, घायपात, सुदर्शन). (२) स्कंधज (स्कंधेय) - हीं मुख्य खोडावर लागलेलीं असतात. (३) शाखाज, शाखेय (शाखाजन्य) - ही पानें फांद्यापासून उत्पन्न झालेलीं असतात.

पर्णव्यवस्था अथवा पानांची मांडणी:- खोडांवर व फांद्यांवर पानें ज्या व्यवस्थेनें लागलेली असतात ती व्यवस्था सर्व वनस्पतींत सारखी नसते. ह्या व्यवस्थेचे मुख्य तीन प्रकार आढळतात: (१) पर्यायी एकांतरित, (२) चक्ररचित व (३) शेखरित. पर्यायीव्यवस्थेत पानें प्रत्येक पेर्‍यावर एक एक अशीं लागलेलीं असतात; व चक्ररचित व्यवस्थेंत प्रत्येक पेर्‍यावर एकापेक्षां जास्त पानें वर्तुलाकार रीतीनें पेर्‍यासभोंवतीं व्यवस्थित रीतीनें लागलेली असतात. (कण्हेर-पांढरा-तांबडा). चक्ररचित व्यवस्थेमध्यें जेव्हां दोनच पानें समोरासमोर उगवलेलीं असतात तेव्हां त्या व्यवस्थेस सन्मुखपर्णव्यसस्था म्हणतात (उदा. मोगरा, तगर)

पृष्ठभाग:- पानाचा पृष्ठभागहि निरनिराळ्या प्रकारचा आढळतो. कांहीं पानांचा पृष्ठभाग कातड्याप्रमाणें गुळगुळीत असतो. जसें अंबा, लिंबू, जांभूळ, कांहीचा खरखरीत असतो. जसें टंटणी (घाणेरी), पारिजातक, कित्येक पानांच्या पृष्ठभागावर बारीक केंसांची तुरळ अशी लव असते. अशा पृष्ठभागास केंसाळ म्हणतात; जसें कापूस, दुधाभोपळा, पोपटवेल वगैरे. कांहीं पानांच्या पृष्ठभागावर लांब केंसांची दाट लव असल्यामुळें तीं मखमलीसारखीं मऊ लागतात. म्हणून अशा पृष्ठभागास मखमली म्हणतात; जसें पांढर्‍या पानाच्या सूर्यकमळाचीं पानें. कित्येक पानांच्या पृष्ठभागावर कांटे असतात म्हणून त्यास कांटेरी किंवा शल्ययुक्त पृष्ठ म्हणतात (उदा. वेत, रानवांगी, पिंवळा धोत्रा)

सन्मुख पर्णव्यवस्थेमध्यें एकावर एक असलेल्या पेर्‍यावरच्या पानांच्या जोड्या समान्तर पातळीमध्यें पसरलेल्या नसतात तर सामान्यत: एकावर एक नसलेल्या कोणत्याहि दोन जोड्या एकमेकांस लंबरेषेंत कापणार्‍या पातळींत स्वतिकच्या रेघाप्रमाणें पसरलेल्या असतात सन्मुख पर्णांच्या जोड्यांच्या या व्यवस्थेस स्वस्तिकाकार’ सन्मुख पर्णववस्था म्हणतात. (३) शेखरित व्यवस्थेंत सुद्धां एकाच पेर्‍यावर एकापेक्षां जास्त पानें उगवलेलीं असतात परंतु ती चक्ररचित व्यवस्थेप्रमाणें पेर्‍याभोंवतीं व्यवस्थित उगवलेली नसतात तर पेर्‍याच्या एकाच बाजूस त्यांचा एक अव्यवस्थित असा पुंजका लागलेला असतो. खरें पाहिलें असतां हीं पानें पेर्‍यावरच्या पानाच्या कक्षेंत उगवलेल्या फांदींची असतात. ती फांदी वाढून लांब होत नसल्यामुळें तिचीं पेरीं कळींतील पेर्‍याप्रमाणें अगदीं जवळजवळ असतात म्हणून सर्व पानें अगदीं जवळजवळ गर्दींनें उत्पन्न झाल्यासारखीं दिसतात. (कवठ-क्रेजोन्शिया कलाबश)

पर्यांयी अथवा एकांतरित पर्णव्यवस्थेमध्यें पानें खोडावर अव्यवस्थित रीतीनें लागल्यासारखीं जरी दिसलीं तरी सूक्ष्म दृष्टीनें परीक्षा केली असतां असें आढळतें कीं त्यामध्यें सुद्धां एक प्रकारची शिस्त आढळून येते. साधारणपणें पानांची व्यवस्था अशा प्रकारची असते कीं, त्यामुळें सर्व पानांस पुरेसा प्रकाश मिळूं शकतो. चक्ररचित व सन्मुखव्यवस्थेंतहि एकावर एक असलेल्या दोन जवळजवळच्या पेर्‍यावरचीं पानें एकावर एक सरळ रेषेंत लागलेली नसतात तर तीं एकमेकांस आलटून पालटून लागलेलीं असतात. कोणत्याहि एका पेर्‍यावरचीं पानें पाहिलीं तर असें आढळतें कीं, तीं खालच्या किंवा वरच्या पेर्‍यावर असलेल्या पानांच्या अनुक्रमें बरोबर डोक्यावर किंवा सरळ नसतात तर खालच्या किंवा वरच्या पेर्‍यावरच्या प्रत्येक दोन पानांमधील रिकाम्या जागेच्या सरळ रेषेंत त्यावरील एक एक पान टाकून एक अशा पेर्‍यावरील पानें एकमेकांच्या बरोबर डोक्यावर सरळ रेषेंत असतात.

सन्मुख आणि चक्ररचित पर्णव्यवस्थेत ज्याप्रमाणें दोन जवळजवळच्या पेर्‍यावरील पानें एकमेकांच्या डोक्यावर येऊन वरच्या पानांनीं खालचीं पानें झांकलीं जाऊन त्यांस पुरेसा प्रकाश मिळूं शकणार नाहीं अशी नसते; त्याचप्रमाणें पर्यायी अथवा एकान्तरित व्यवस्थेंतहि तशीच कांहीशी स्थिति आढळते.

कुरणांतील गवताची एखादी लांब काडी, किंवा कडब्याचें अथवा बाजरीचें धाट पानासकट कापून पाहिलें तर असें आढळून येईल कीं, कोणत्याहि एका पानापासून मोजण्यास आरंभ करून वर मोजीत गेलें तर पहिलें, तिसरें, पांचवें, सातवें, नववें याप्रमाणें एक टाकून एक असलेलीं पानें सरळ रेषेंत एकावर एक आहेत व दुसरें, चवथें, सहावे इत्यादि एका दुसर्‍या सरळ रेषेंत परंतु अनुक्रमें पहिल्या, तिसर्‍या , पांचव्या इत्यादि पानापासून एक बाजूस लागलेलीं आहेत. अशोकाची फांदी तोडून पाहिली असतां पानांची व्यवस्था वरीलप्रमाणेंच आढळून येईल. याप्रमाणें गवताच्या जातीच्या सर्व वनस्पतींत व अशोकाप्रमाणें कांहीं थोड्या द्विदल वनस्पतींत पर्यायी पर्णव्यवस्था असली तरी सर्वच पानें अव्यवस्थित रीतीनें एकमेकांपासून एका बाजूस लागलेली नसतात तर फांदीवरच्या पानांत जणुं काय दोन दोन पानांचे मजले असतात व अशा प्रत्येक मजल्यांतील दोन पानेंच फक्त एकमेकांच्या बाजूस हटून उगवलेली असतात व अशा सर्व मजल्यांचीं पहिली पानें एकमेकांच्या डोक्यावर एक सरळ रेषेंत असतात. कर्दळ, घायपात, केनी, गुलछबू व केवडा एकदलवनस्पतींत पर्णव्यवस्था पर्यायी असून प्रत्येक मजल्यांत तीन तीन पानें असतात व कोणत्याहि पानापासून आरंभ करून पहिलें, चवथें, सातवें, दहावें, इत्यादि पानें एका सरळ रेषेंत असलेलीं आढळतात. नीळ, कापूस, जास्वंद या झाडांच्या ''एकांतरित'' पर्णव्यवस्थेंत प्रत्येक मजल्यांत पांच पांच पानें असून, पहिलें, सहावें, अकरावें इत्यादि पानें सरळ रेषेंत असलेलीं आढळतात. पोपया व गुलाबाच्या झाडाचीं पानेंहि पर्यायी असतात परंतु प्रत्येक मजल्यांत आठ पानें असून पहिलें, नववें, सतरावें हीं पानें सरळ रेषेंत असतात. तसेंच पिंवळा कण्हेर अथवा बिट्टयांच्या झाडाच्या पर्यायी पर्णव्यवस्थेत एकेका मजल्यांत तेरा तेरा पानें आढळतात. याप्रमाणें पर्यायी पर्णव्यवस्थेंतहि भिन्न भिन्न वनस्पतीत निरनिराळे प्रकार आढळतात. या व्यवस्थेंत वर वर्णन केल्याप्रमाणें जे मजले असतात त्यांतील पानें मात्र एकामेकापासून आजूबाजूस असतात व त्यायोगे मजल्याच्या तळाच्या पानापासून आरंभ करून सर्वांत जवळच्या दिशेनें दोरा फिरवीत नेला असतां मजल्याच्या शेवटच्या पानापर्यंत तो सारखा नागमोडींने वळवावा लागतो व अखेर त्या वरच्या मजल्याच्या तळच्या पानाच्या जागीं तो पुन्हां खालच्या मजल्याच्या तळाच्या पानाच्या सरळ रेषेंत येतो. प्रत्येक मजल्यांतील जवळ जवळच्या दोन पानांतील वक्र रेषांचें अंतर सारखें असून तें स्कंधाच्या परिघाच्या एका अंशाइतकें असतें व हें अंतर गणितानें व भूमितीच्या नियमानें काढतां येतें. वक्ररेषेचें हें अंतर कळल्यानें सहजच अशा दोन पानांच्या उगमस्थानापासून स्कंधाच्या मध्यबिंदूपर्यंत जाणार्‍या त्रिज्जांमधील कोणहि काढतां येतो. ती रीत अशी:- कोणत्याहि पानासून सुरवात करून जवळच्या रस्त्यानें खोडावरील पानास लागून सुरवातीच्या पानाच्या सरळ रेषेंत असलेल्या पानापर्यत गुंडाळीत दोरा न्यावा व असें करण्यांत दोर्‍याचे पूर्ण फेरे खोडाभोंवतीं किती वेळां झाले ते पहावे व तो आंकडा लिहून ठेवावा. नंतर सरळ रेषेंत असलेल्या या दोन पानांमध्यें आरंभीचें किंवा शेवटचें यापैकीं कोणतेहि एक पान मोजून एकंदर किती पानें आहेत हें पहावें व जी संख्या येईल तिचा आंकडाहि लिहून ठेवावा याप्रमाणें जे दोन आंकडे मिळाले असतील त्यांपैकी दोर्‍याच्या फेर्‍यांचा आकडा अंशस्थानी मांडून मजल्यांतील पानांच्या संख्यांचा आंकडा छेदस्थानीं मांडावा व याप्रमाणें जो अपूर्णांक येईल त्यानें खोडाच्या परीघास गुणून परीघाचा जो अंश येईल त्याइतकें अंतर प्रत्येक दोन जवळजवळच्या पानांमध्यें आहे असें समजावें; उदाहरणार्थ अशोकाच्या किंवा कडब्याच्या धाटाच्या पानांतील हें अंतर १/३ परीघाइतकें, गुलछबू, कर्दळ यांच्या पानांतील अंतर १/३ परिघभागाइतकें, जास्वंदीच्या पानांचें अंतर २/५ भागाइतकें, गुलाबाच्या पानांतील अंतर ३/८ भागाइतकें व पिवळ्या कण्हेराच्या पानांतील अंतर ५/१३ परीघभागाइतकें असतें. याप्रमाणें पर्यायी अथवा एकान्तरित पर्णववस्थेच्या कांहीं झाडांच्या फांद्यांची तपासणी करून पानांमधील जीं अंतरें सांपडतात त्यांची पुढें दिल्याप्रमाणें श्रेणी किंवा माला बनते:- १/२, १/३, २/५, ३/८, व ५/१३ आणखी कांहीं दुसर्‍या झाडांची तपासणी केली तर १/४, १/५, २/९, ३/१४ अशा प्रकारच्या श्रेणींचीं अंतरेहि सांपडतात. याप्रमाणें परीघाच्या अंशभागाच्या रूपांत पानांतील अंतर निघाल्यावर तेवढया अंतरामध्यें कोणत्या कोनाचा समावेश होतों हें सहज काढतां येतें. अंतर दर्शविणार्‍या अपूर्णांकानें पूर्णपरीघामध्यें समाविष्ट होणार्‍या ३६०० अंशाच्या कोनास गुणावें म्हणजे जो कोन येईल तो दोन जवळजवळच्या पानांतील अंतरामध्यें समाविष्ट होणारा म्हणजे त्या अंतराचा कोन होय असें समजावें. उदाहरणा र्थ १/२ पर्णांतरामध्यें येणारा कोन १/२ x ३६०० = १८०० अंशाचा असतो. १/३ पर्णांतरामधील येणारा कोन १/३ x ३६० = १२० अंशाचा असतो. याप्रमाणें पर्यायी पर्णव्यवस्थेंत जी काल्पनिक सर्पिल रेषा एका मजल्यांतील प्रत्येक पानास स्पर्श करून खोडाभोंवतीं वेढलेली असते तीस वर्गीय सर्पिल रेषा म्हणतात व एकावर एक असलेल्या पानामध्यें ज्या सरळ रेषा काढतां येतात त्यांनां उर्ध्वरेषा असें म्हणतात.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .