विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनस्पतिशास्त्र भाग २०
आर्द्रदेशीय झाडें:- जलस्य झाडांचे आकार आणि घटना हीं शुष्कदेशीय झाडांहून अगदींच भिन्न असतात. जलस्य झाडें पाण्यांत, जलाच्छादित जमिनीमध्यें किंवा चिखलामध्यें होतात. हवा आणि पाणी या दोहोंच्या संबंधानें त्यांचे स्वाभाविक तीन वर्ग होतात: (१) वादिवातस्य, (२) जलतरक आणि (३) पूर्णजलाच्छादित. वादिवातस्य प्रकारामध्यें पानांचा हवेशीं नेहमींप्रमाणें संबंध येतो. पानें हवेंत असून मुळें आणि स्तंभ हीं थोडीबहुत जलाच्छादित असतात. जलतरणकांमध्यें पानांच्या वरच्या पृष्ठभागाचा हवेशीं संबंध असून खालील पृष्ठभाग पाण्याला लागलेला असतो. उ. नारळीची भाजी, कमळ, कुमुदिनी, पाण्यावरील नील वगैरे. पूर्णजलाच्छादित प्रकारामध्यें पानें बहुधां पाण्याच्या पृष्ठभागाखालीं असतात. म्हणजे त्यांनां कर्बव्दिप्राणिद आणि प्राणवायु हे हवेंतून न मिळतां पाण्यांतून मिळतात. वादिवातस्याच्या पानाच्या दोन्ही बाजू आणि जलतरणकांच्या पानांची वरची बाजु यांचे स्वरूप शक्य तितकं पूर्ण बाष्पोत्सर्जन होऊं देण्यासारखें असतें. हें कार्य पूर्णजलाच्छादित पानांनां मुळींच करतां येत नाहीं. हवा खेळती ठेवण्यासाठीं वातस्यानांची परिणति वादिवातस्य आणि जलतरणक झाडांमध्यें पुष्कळशी झालेली असते. परंतु पुर्णजलाच्छादित झाडांमध्यें वातस्यानें बहुधां नसतात. कधीं त्यांचे फक्त अवशेष असतात. परंतु पूर्णजलाच्छादित झाडांनां मंदप्रकाश थोडाबहुत मिळतो. कारण पाणी बऱ्याच प्रकाशकिरणांनां शोषून घेतें. त्यांच्यामध्यें होणारीं प्रकाशकृत संघटना बरीचशी सावलींतील झाडासारख असून दुसरे दोन प्रकार हे जास्त प्रकाशांत होणारे आहेत. वादिवातस्य झाडांमध्यें तंतुवाहिनीमय घटनेची परिणति फक्त बेताचीच झालेली असते. जलतरणकामध्यें त्या घटनेचा त्याहूनहि बराच संकोच झालेला असतो. पूर्णजलाच्छादित झाडांमध्यें घटनेच्या अवशेषापलीकडे जास्त कांहीं नसतें.
(१) वादिवातस्य झाडें:- या वर्गातील झाडांचें मध्यदेशीय झाडांशीं बरेंच साधर्म्य असतें. यांच्यामध्यें दुसऱ्या सर्व जलस्य झाडांपेक्षां कमी वैशिष्टय असतें. हीं झाडें बहुधां पाण्यानें थबथबलेल्या जमिनींत किंवा उथळ पाण्यांत होतात. बऱ्याच वेळां तीं पाण्याच्या कडेला होत असल्यामुळें त्या वर्गातील बऱ्याच झाडांनां आपली सोय भिन्न भिन्न प्रकारें करून घ्यावी लागते. वादिवातस्य झाडांनां कधीं कधीं मध्यमदेशीय झाडांप्रमाणें फक्त दमटसर जागीं राहावें लागतें तर कधीं कधीं कांहीसें जलाच्छादित होऊन रहावें लागतें. बऱ्याच उदाहरणांत त्यांचीं पानें नेहमीं पाण्याच्या वर असतात. कांहीं जातींमध्यें खालचीं पानें सामान्यत: किंवा पाणी वाढल्यामुळें जलाच्छादित होऊन त्या जातींतील पानांचा आकार आणि घटना यांचा अवलंब करतात (उ. परळ, शिंगाडा, तुरटी). कांहीं अपवाद सोडून दिल्यास या झाडांचीं पानें बहुधां मोठीं व त्यंच्या कडा अखंडित असून स्तंभाची वाढ चांगली झालेली व मुळें पुष्कळ असून बरींच पसरलेलीं असतात. त्वक्कवच पातळ असतें किंवा असतहि नाहीं. त्वचेवर केंस नसतात. त्वग्रंध्रें पुष्कळ असून खालच्या बाजूपेक्षां वरच्या बाजूवर जास्त असतात. उन्नतपेशीपाटवांत एक किंवा सुपरिणत थर असतात, परंतु त्या पाटवानें व्यापलेली जागा विरलपेशीपाटवानें व्यापिलेल्या जागेहून कमी असते. विरलपेशीपाटवांत मोठाले वातमार्ग किंवा विपुलवातकोष्ठ असून त्यामध्यें पेंशींचे सूक्ष्म पडदे असतात. स्तंभामध्येहि बऱ्योच वेळां उन्नतपेशीसंघ असून त्यामध्यें स्तंभसमांतर वातकोष्ठ असतात आणि त्यांच्यामध्यें मधून मधून बरेच पडदे पडतात.
(२) जलतरणक झाडें:- वरील पृष्ठभागाचा आकार आणि रचना यांच्या दृष्टीनें जलतरणक पानें बऱ्याच अंशी वादिवातस्य झाडांसारखीच असतात. आंत पाणी शिरून त्वग्रंध्रें बंद होऊं नयेत म्हणून पानावर बहुधां मेणाचा सूक्ष्म थर असतो. कांहीं अपवाद खेरीजकरून त्वग्रंधे्रं नेहमीं पानांच्या वरच्या बाजूस असतात, आणि तीं खालच्या बाजूवर कायम असलीं तरी निष्क्रिय असतात. पानांमध्यें विरलपेशीपाटवाहून उन्नतपेशी पाटवाची वाढ फारच कमी झपाटयानें झालेली असून विरलपेशीपाटवांत मोठाल्या वातकोष्ठांची गर्दी असते. स्तंभ किंवा पानांचे देंठ फार लांबलेले असतात व हवेचा संचार होण्याजोग्या घटनांची वाढ चांगली झालेली असून आधारदायक पाटव (तंतुवाहिनीमय गुच्छ) संकुचित झालेले असतात. तळयांतील निळीच्या निरनिराळ्या जातींमध्यें (हिरवा तवंग) मुळें हळू हळू नाहींशीं होत चाललेली असतात. व एका जातींत तर पान आणि स्तंभ हीं दोन्हीं नसून त्यांच्या ऐवजीं निरवयव असें एक सूक्ष्म पृष्ठ असतें.
(३) पूर्णजलाच्छादित झाडें:- या झाडांमध्यें स्तंभ व मूळ या दोहोंचाहि संकोच झालेला असता. त्यांचे कारण असें कीं, त्यांच्यामध्यें जलशोषणाचें काम मुळेंच करीत नसून त्यांच्या प्रमाणें संपूर्ण स्तंभ आणि पर्णपृष्ठ ही तें काम करीत असतात. हवेच्या मानानें पाणी जास्त घन असल्यामुळें आधाराचीहि जरूर कमी असते. म्हणून स्तंभ फारच लांबलेले आणि बारीक असून त्यांच्यामध्यें तंतुवाहिनीमय गुच्छांची वाढ यथातथाच झालेली असते. पानांचा आकार आणि जाडी पुष्कळ कमी असते. आणि पानें दिसावयास फितीप्रमाणें लांब, रेषातुल्य, वेत्रतुल्य, किंवा फार बारीक खंड झालेली अशीं दिसतात. या फेरफारींमुळें मुख्यत्वेंकरून वायुरूप पदार्थाचें शोषण करण्याजोग्या पृष्ठभागाचीं वाढ होण्याच्या कामीं व मंद प्रकाशाचें ग्रहण करण्याच्या कामीं त्यांचीं मदत होतेसें दिसतें. त्वग्रंध्रे कधीं कधीं कायम असतात परंतु तीं निष्क्रिय असतात. यांतील हरित्पेशीघटना बहुतांशीं छायाश्रित पानांप्रमाणेंच असते. ज्या थोडया उदाहरणांत उन्नत आणि विरलपेशीपाटव कायम असतात त्यांमध्यें ते फक्त पूर्वीच्या घटनेचा अविशिष्ट भाग म्हणून राहिलेले असतात. वातकोष्ठांचा पुष्कळ संकोच होतो किंवा तीं अजीबात नाहींशीं होतात. ती कायम असतात तेव्हां कदाचित त्यांच्यामध्यें पाण्यापासून मिळालेल्या हवेचा सांठा होत असावा.
पंकाश्रितशुष्क झाडें अथवा कर्दमीयशुष्क झाडें:- खताळलेल्या दलदलींतील, तळयांतील व जलप्रवाहाच्या कांठी होणारीं बरींच झाडें पाण्यांत वाढत असूनहि दिसण्यांत शुष्कदेशीय झाडांसारखीं दिसतात. त्यांच्या पानांचा थोडाबहुत संकोच झालेला असून ती कधीं कधीं लुप्त झालेलीं असतात. त्वक्कवचाची जाडी वाढलेली असून उन्नतपेशीपाटव सुपरिणत स्थितींत असतो. दलदलींत असलीं झाडें होण्याचें कारण हें कीं, पाण्यांत जीवाम्लें असतात, त्यांच्यायोगानें मुळांनां पाणी आणि हवा हीं घेतां येत नाहींत. त्या जीवाम्लामुळें तीं तशा ठिकाणीं उत्पन्न होतात. म्हणजे एकंदर जलांश अतिशयित असला तीर प्राप्य जलांश कमी असतो. परंतु जमिनींत अम्लाचें अस्तित्व असल्यास जलशोषण वाढतें हें पूर्वी सांगितलेंच आहे. म्हणून थोडयाशा जीवाम्लामुळें तळयांत आणि दलदलींत शुष्कदेशीय झाडें उत्पन्न होणें अवश्य आहे. कारण तीं अम्लें पाण्यांत असल्यास जलस्य झाडें उलट जास्त आर्द्रदेशीय होण्यास मदत होईल. शिवाय बऱ्याचशा तळ्यांत आणि दलदलींत ज्या ठिकाणीं पर्णहीन लव्हाळे वगैरे उगवतात तेथें अम्लांचा गंधहि नसतो. बरीचशीं स्थिर आर्द्रदेशीय झाडें नेहमी या शुष्कदेशीय समजल्या जाणाऱ्या झाडांबरोबरच होत असतात. एकाच निवासांत आर्द्रदेशीय आणि शुष्कदेशीय झाडें उत्पन्न होणें अशक्य आहे. शिवाय ज्यांनां पंकाश्रित शुष्कदेशीय झाडें असें म्हणतात, त्यांच्यामध्यें वातमार्ग, पडदे वगैरेंसारख्या आर्द्रदेशीय झाडांमध्येंच सांपडणाऱ्या घटना असतात, व ही गोष्ट विशेषेंकरून मुळाचा आकार आणि घटना या बाबतींत तरी अक्षरश: खरी आहे. म्हणून दलदलींतील झाडांनां शुष्कदेशीय म्हणणें चुकींचें आहे. त्यांच्यामध्ये त्या दृष्टीनें कांहीं पुरावा असल तरी ती झाडें खास आर्द्रदेशीय आहेत. दलदलींतील झाडांमध्यें शुष्कदेशीय झाडांचें ध्योतक असें वैशिष्टय असण्याचें कारण असें की, त्या जाती स्थिर असतात. म्हणजे त्यांनां बदललेल्या परिस्थितींतहि आपल्या घटनेंत तदनुरूप फेरफार न करतां आपली सोय करून घेण्याचे सामर्थ्य असतें. कांहीं प्रकाशस्य झाडांची घटना त्यांनां सावलींत वाढविलें असतांहि विशेष बदलत नाहीं. तशाच कांहीं जाती-ज्यामध्यें जलांशाचें मान निरनिराळें आहे अशा-दोन किंवा अधिक निवासांत लाविल्या असतां बदलत नाहींत. यावरून कांहीं वादिवातस्य झाडांमध्यें शुष्कदेशीय झाडांत सांपडणारे जे विशेष सांपडतात. तें त्यांचे स्थिर घटनांविशेष कायम राहिल्याचें ध्योतक असण्याचा संभव आहे. हे घटनाविशेष पूर्वी त्या जाती शुष्कानिवासांत रहात असतांना उत्पन्न झालेले असून त्यांच्या सध्याच्या आर्द्रनिवासामुळें झालेले नाहींत. एकदलवनस्पती व विशेषंकरून तृण आणि लव जाती यांतील झाडें बदललेल्या परिस्थितींत आपणामध्यें शारीरिक फेरफार करण्याच्या कामीं अतिशय मंदगति म्हणजे स्थिर असतात. यावरून कांहीं परंपरागत गुणधर्म अत्यंत बदललेल्या परिस्थितींतहि कसे कायम रहातात हें समजेल.
प्रकाशामुळें झाडांमध्यें होणाऱ्या अनुघटना.- प्रकाशकृत प्रक्षोभनामुळें झाडांचीं कार्यात्मक प्रतिवर्तनें होऊं लागतात, त्यामुळें झाडाच्या आकारांत किंवा अंतर्रचनेंत किंवा दोहोंतहि फरक पडतो. अंतर्रचनेत फरक पडला म्हणजे पुढें आकारांतहि फरक पडतो. आणि इतर अवयवांहून पानांमध्यें जास्त विशेष उत्पन्न होतात.त्यामुळें प्रकाशाश्रित आणि छायाश्रित प्रकारांमध्यें फरक पडतो. स्तंभावर पानें असतात म्हणून, त्याचप्रमाणें त्याच्यामध्यें बहुधां हरित्कण असतात त्यामुळें त्यामध्येंहि विशेष उत्पन्न होतात. मूळ हें प्रकाशाच्या कार्यापासून अलिप्त असतें म्हणून त्यामध्यें फक्त कमीजास्त वाढीमुळें उत्पन्न झालेल्या अप्रत्यक्ष परिणामासारखेच परिणाम घडलेले दिसतात. पानांचा किंवा स्तभाचा आणि मूळाचाहि लोप होणें या गोष्टी अति मंदप्रकाशामुळें किंवा अंधकारामुळें घडूं शकतात. परंतु असल्या गोष्टी होणें जीवोपजीवी किंवा शवोपजीवी वृत्तीच्या झाडांमध्येंच जास्त संभवतें.
हरित्कणांचें महत्तव:- प्रकाशाचा, पानांच्या आकारांवर व अंतर्रचनेवर जो परिणाम घडतो तो जाणण्याचें साधन हरित्कणांची मांडणी होय. ही मांडणी प्रकाशाच्या प्रखरतेप्रमाणें बदलते. सूर्यप्रकाशांत ही मांडणी किरणसमांतर रेषेंत होते व मंद प्रकाशांत त्यांच्या पंक्ती सूर्यकिरणांशी काटकोन करून माडल्या जातात. पानांची प्रकाशजन्य प्रक्षोभनें ज्या नियमांनीं होतात ते नियम: (१) हरित्कणांची संख्या प्रकाशाच्या प्रखरतेप्रमाणें बदलते. (२) मंद प्रकाशांत (सावलींत) हरित्कण अशा स्थितींत रहातात कीं, त्यांपैकीं पुष्कळ कणांवर प्रकाश पडेल. (३) सूर्यप्रकाशित निवासामध्यें हरित्कण आपली मांडणी अशी करतात कीं, त्यांचें प्रकाशन आणि त्यायोगानें होणारें बाष्पीभवन हीं कमी होतील. हरित्कण हें पेशिकोशाच्या आंतल्या बाजूस आस्तरण रूपानें असणाऱ्या चिद्रसाच्या थराला अगदीं चिकटून असतात. पेशीकोश स्वत: लवचिक असून प्रसरणशील असतो आणि तों एक प्रवाही किंवा थलथलीत द्रव्यानें वेष्टिलेला असतो. त्यामुळें पेशीचा आकार बदलतो. हरित्कणांची हालचाल होऊन ते रांगेनें सर्व पेशीभर पसरल्यामुळें त्या रांगा ज्या दिशेनें पसरतील त्या दिशेनें पेशी लांबते. अशा तऱ्हेनें उन्हामध्यें प्रकाश किरणांच्या दिशेनें पानांच्या पृष्ठभागाशीं काटकोन करून पेशी लांबते व तिची उन्नतपेशी बनते. सावलीमध्यें प्रकाशकिरणांशीं काटकोन करून आणि पानांच्या पृष्ठभागाशीं समांतर अशा तऱ्हेनें पेशी लांबत असून तिची आडवी विरळपेशी बनते. शिवाय वातस्यानांची उत्पत्ति झाल्यानेंहि विरळपेशीच्या आकारांत आणखी फरक पडतो. कांहीं जातींतील (एकदलवनस्पतींतील) हरित्कण आपल्या पंक्ती करून प्रकाशप्रखरतेंतील न्यूनाधिक्यानुरूप प्रतिवर्तन करीत नाहींत. अशा झाडांच्या पानांतील सर्व पेशी थोडयाबहुत वाटोळयाच रहात असून त्यांमध्यें उन्नत आणि विरल असा भेद होत नाहीं. उन्न्तपेशींचा उग्दव होणें हा हरित्कणांच्या प्रकाशाबाबत होण्याऱ्या प्रतिवर्तनाचा स्वाभाविक परिणाम आहे. तसेंच विरळपेशींचा उग्दव हां हरित्कणांवर होणाऱ्या मंद प्रकाशाच्या किंवा छायेच्या कार्याचा परिणाम आहे. सावलीमध्यें बहुधां उन्नतपेशीची विरळ पेशी बनते किंवा उन्हामध्यें विरळपेशीची उन्नतपेशी होते. या उत्तारोत्तार गोष्टीचा अनुभव ज्या पानांनां खालच्या बाजूनें थोडाबहुत प्रकाश मिळतो त्यांच्यामध्यें दृष्टीस पडतो. या पानांमध्यें उन्नतपेशीपाटव पानांच्या दोन्ही बाजूंनां असतात. जीं झाडें इतर झाडांच्या सावलींत होतात, त्यांच्यामध्यें त्या मंद प्रकाशामुळें विरळपेशीपाटव तयार होणें हाहि परिणाम स्वाभाविकच होय. हीच गोष्ट लहानमोठया झाडांची जीं पानें त्या झाडांच्या वरच्या पानांच्या गर्द छायेंत असतात, त्यांची आणि तळ्यांतील किंवा इतर जलसंचयांतील मंद प्रकाशांत होणाऱ्या पानांची होय. क्षितिजसमांतर पानांच्या जाडीपैकीं वरच्या अर्ध्या भागाची छाया खालच्या अर्ध्या भागावर येऊन त्या पानांतील विशिष्ट असा उन्नत आणि विरळपेशीभेद उत्पन्न होतो. त्याचप्रमाणें केसांच्या जाड आच्छादनाच्या उन्नतपेशीपाटवावर छाया येऊन त्याचा विरळपेशीपटाव होतो.
हरित्पेशीसंघांतील विशेष. - हरित्पेशींचे उन्नत आणि विरल असे दोन प्रकार होणें ही गोष्ट पानांच्या दोन्ही पृष्ठभागांचें विषमप्रकाशन होण्यानें घडून येते. सामान्यत: क्षितिजसमांतर असणाऱ्या पर्णप्रकाशामध्ये ही गोष्ट नेहमी होते. याला अपवाद फक्त एकदलवनस्पतीमध्यें सांपडतो. सांप्रत मंद प्रकाशामध्यें सांपडणाऱ्या अशा कांहीं स्थिर जातीमध्येंहि जो उन्नत आणि विरलपेशीपाटव सांपडतो त्याची वाढ छायेमुळें झालेली नसून बदललेल्या परिस्थतींतहि त्यांचें तें परंपरागत स्वरूप कायम राहिलेलें असतें. पानाच्या दोन्ही बाजूंनां मिळणाऱ्या प्रकाशमानांतील फरक किती मोठा असावयाचा ही गोष्ट पानांच्या मांडणीवर अवलंबून असते. जीं पानें ताठ किंवा जवळजवळ उभीं किंवा लोंबतीं असतात त्यांच्यामध्यें बहुधां दोन्ही बाजूंचें प्रकाशन साधारण सारखेंच होतें. उदा. पिंपळाचीं पानें; परंतु पिंपळामध्यें उन्नत आणि विरळ असा फरक असतोच. मात्र त्यांतील पेशी आडव्या नसून उथळ असतात. त्यांच्यामध्यें मोठीं वातस्थानें असतात म्हणून त्यांनां समप्रकाशन पानें म्हटलें असतां चालेल. जीं पानें स्तंभाशीं कांहींसा काटकोन करून असतात त्यांच्यामध्यें बहुधां खालच्या बाजूपेक्षां वरच्या बाजूलाच पुष्कळ जास्त प्रकाश मिळतो. त्यांनां वास्तविक पाहतां दोन निरनिराळ्या प्रखरतेचे प्रकाश मिळतात. म्हणून त्यांनां व्दिविध प्रकाशित पानें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु कांहीं क्षितिजसमांतर किंवा भिन्न मुखपृष्ठाकित पानांची खालची बाजू वरच्या बाजूइतकाच प्रकाश ग्रहण करते. या गोष्टीची सत्यता ज्या प्रकाशाश्रित पानांमध्यें केंसांचें जाड आच्छादन असल्यामुळें पानाच्या वरच्या बाजूवर पडणाऱ्या प्रकाशापैकीं बराच प्रकाश अडविला जातो अशा पानांमध्यें दिसते. जीं शुष्कदेशीय झाडें पांढुरक्या पुळणीमध्यें किंवा वाळूमध्यें होतात त्यांच्या पानांच्या खालच्या बाजूवर प्रकाशाचें परावर्तन होत असल्यामुळें त्यांच्यामध्येंहि ही गोष्ट कांहीं अंशी पहावायास सांपडते. शिवाय गर्द छायेमध्यें पानांच्या खालच्या वरच्या बाजूंनां मिळणाऱ्या प्रकाशप्रखरतेमध्यें फारच थोडा फरक असतो म्हणून असल्या छायेंतील पानेंहि बऱ्याच वेळां समप्रकाशित असतात. छायांकित निवासामध्यें नेहमीं समप्रकाशित पानें सांपडतात. परंतु ती उन्हांतहि सांपडतात. व्दिविध प्रकाशनिर्मित घटना, छाया फार दाट नसल्यास तेथेंहि दिसते. शिवाय समप्रकाशित अशा प्रकाशाश्रित पानांमध्यें मुख्यत्वेंकरून किंवा सर्वच उन्नतपेशीपाटव असतो. आणि समप्रकाशित अशा छायाश्रित पानांमध्यें तयाऐवजीं विरलपेशीपावट असतो. अशा तऱ्हेनें प्रकाशाच्या दिशेवरून पानें समप्रकाशित किंवा व्दिविधप्रकाशित असावयाचीं हें ठरतें, तर प्रकाशाच्या प्रखरतेवरून पानांमध्यें कोणत्या प्रकारचा पाटवा तयार व्हावयाचा हें ठरतें.
विरलपेशीपाटव:- वरील सर्व उदाहरणांवरून विरलपेशीपाटवाची वाढ मुख्यत्वें प्रकाशग्राहक पृष्ठभागाची वाढ करण्यासाठींच होते हें लक्षांत येईल. कोणत्याहि कारणानें जेथें प्रकाश नेहमी मंद असतो तेथील सर्व पानांमध्यें विरल पेशीपाटव उत्पन्न होतो. नेहमी दाट जंगलांत सांपडणारीं लहान झुडपें आणि मृदु वनस्पती यांच्या पानांमध्यें विशेषें करून किंवा सर्वस्वी विरलपेशीपाटवच असतो. त्यांच्या पानांपैकीं आंतील पानांमध्यें त्याच झाडाच्या सूर्यप्रकाशित पानांपेक्षां पुष्कळ जास्त विरलपेशीपाटव असतो. प्रकाशांत होणाऱ्या झाडांनां गर्द सावलींत वाढविलें असतां त्यांतील बराचसा उन्नतपेशीपटाव नाहींसा होतो. व त्याऐवजीं विरलपेशीपाटव उत्पन्न होतो. हीच गोष्ट वादिवातस्य किंवा जलतरणक जातींच्या जालच्छादित पानांमध्यें घडून येते. त्याप्रमाणें जलाच्छादित झाडांच्या पानांमध्यें सर्वस्वी विरल किंवा विरलतुल्य पेशीपाटव सांपडतो. विरलपेशीपाटव हा प्रकाशप्रखरता कमी झाल्यामुळें उत्पन्न होतो याविषयीं जास्त पुरावा व्दिविधप्रकाशित आणि केशाच्छादित पानांमध्यें सांपडतो. सामान्य व्दिविधप्रकाशित पानांमध्यें उन्नत पेशींतील हरित्कणांच्या प्रकाशग्रहणपध्दतीमुळें प्रकाशाची प्रखरता इतकी कमी होते कीं, पानाच्या खालच्या अर्ध्या भागांतील हरित्कणांवर अगदी मंद प्रकाश पडतो. म्हणून ते ज्या पेशींत असतात, त्या आडव्या लांबून त्यांचा विरलपेशीपाटव तयार होतो. जेथें सर्व हरित्पेशीसंघ इतर पानांच्या किंवा इतर झाडांच्या छायेंत असतो अशा उदाहरणाप्रमाणें या उदाहणांतहि विरलपेशीपाटवाची उत्पत्ति होणें ही गोष्ट म्हणजे मंद प्रकाशाबाबत होणारी अनुघटनाच होय. त्याचप्रमाणें केंसांच्या आच्छादनामुळें प्रकाशापैकीं बऱ्याच भागाचें परावर्तन आणि अपहरण होत असल्यामुळें आंतील भागांत फरक होऊन विरलपेशीपाटव उत्पन्न होतो. म्हणून धनकोशयुक्त अशा प्रकाशांत होणाऱ्या पानांमध्यें बहुधां छायेंतील संघाप्रमाणेंच हरित्पेशीसंघ असतो. विरलपेशीपाटवाचा उपयोग मुख्यत्वेंकरून जेथें जेथें प्रकाशग्राहक किंवा हरित्पृष्ठभागाची वाढ करणें फायदेशीर असते, अशा कोणत्याहि स्थितीमध्यें त्याची वाढ करण्याच्या कामीं होतो. शिवाय पानांत हवा खेळती ठेवण्याशीं त्याचा निकट संबंध असतो. यांचें मुख्य कारण तो पाटव पानांच्या ज्या बाजूला जास्त त्वग्रंध्रें असतात, अशा खालच्या बाजूच्या त्वचेला लागून असतो. वास्तविक या पाटवाचें विरलस्वरूप त्यांतील पेशींमधील वातस्थानांमुळेंच उत्पन्न होतें. व हीं वातस्थानें म्हणजे हवा खेळती ठेवण्याचें उत्ताम साधनच होय. ज्या जलाच्छादित पानांमध्यें पेशींचा आकार आणि हरित्कणांची मांडणी विरलपेशीप्रमाणें असते. अशा जलाच्छादित उदाहरणांत या गोष्टीचा अनुभव चांगला येतो. परंतु येथें नेहमींचीं वातस्थानें अजिबात लुप्त झालेलीं असतात. कारण येथें हवा मिळावयाची ती पाण्यांत विरलेली अशी मिळते. अखेरीस विरलपेशीपाटवांतील विपुल वातस्थानांमुळें व त्यांच्या आकारामानामुळें विरलपेशीपाटव कांहीं अंशी त्यावर बाष्पोर्त्सनाचें ठरीव कार्य होण्याजोगा होतो. प्रकाशाचा अभाव हा विरलपेशीपाटव उत्पन्न करण्याच्या कामीं अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या गोष्टीचें प्रत्यंतर हेंच कीं, पानाच्या वरच्या बाजूवर त्वग्रंध्रें विपुल असलीं म्हणजे त्या पानाच्या खालच्या बाजूवर तो पाटव नेहमीं उत्पन्न होतो.