विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वराहमिहीर - आर्यभट्टांनतर दुसरा नामांकित ज्योतिषी वराहमिहीर झाला. यानें आपला काळ स्पष्टपणें कोठेंच सांगितला नाहीं. तथापि त्याचा जन्म इ. स. ४९० मध्यें झाल्याचें कोलब्रुक वगैरे मानतात. अलबेरूणीनेंहि हाच काल मानला आहे. उज्जैनीच्या विक्रमाच्या दरबारांतील ९ विव्दद्रत्नांतील हा एक होता असेंहि कविचरित्रकारादि कांहींजण म्हणतात. आदित्यदास हें त्याच्या पित्याचें नांव असून कापित्थक या गांवीं त्यास सूर्यापासून वरप्रसाद प्राप्त झाला अशी आख्यायिक आहे. वराहमिहीरानें यात्रा, विवाहगणितहोरा आणि संहिता या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. पंचसिध्दांतिका, बृहज्जातक, लघुजातक, योगयात्रा, विवाहपटल, समाससंहिता व बृहत्संहिता हे ग्रंथ त्याचे आहेत. बृहत्संहिता व लघुजातक यांचें अरबी भाषांतर अल्बेरूणीनें केलें आहे. भास्कराचार्यानें पुष्कळ ठिकाणीं याचीं वचनें आधारभूत घेतली आहेत. ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ पुष्कळांचे झालेले आहेत. परंतु त्याच्या अनेक शाखांवर विचार करणारा ज्योतिषी फक्त हाच झाला. याच्या जातक ग्रंथाचा जसा उपयोग होतो तसा संहिताग्रंथाचा मात्र फारसा होत नाहीं. वराहमिहीरानें आपल्या वेळच्या (किंवा पूर्वीच्या) हिंदुस्थानांतील एकंदर २८३ प्रांतांची यादी दिली आहे (ज्ञा. को. वि. ४, पृ. २१ पहा) [दीक्षित-भारतीय ज्योतिषशास्त्र; कविचरित्र; पिटर्सन रिपोर्ट, ४.]